थोडी अक्कल असलेल्या तमाम मराठी माणसाला सध्या अनेक प्रश्न पडलेआहेत. प्रश्न राजकीय स्वरूपाचे नाहीत.राजकारण चालत राहते .सत्तांतरे होत राहतात. पण एक वेगळाच मुद्दा राज्यभर सध्या चर्चेला जातो आहे. आणि तो मुद्दा म्हणजे , शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे !
थोडं दहा वर्ष मागे जाऊ या . महाराष्ट्रातल्या एका खास वर्गाचे लाडके नेते, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी विरोधात महाराष्ट्र पेटवला . पेटवला म्हणजे विचाराने पेटवला. काँग्रेस -राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पळता भुई थोडी करून ठेवली. विधानसभेचे सभागृह असो की सभागृहा बाहेर, देवेन भाऊंनी आपल्या प्रखर आणि अभ्यासू शब्द बाणाने विरोधकांना घायाळ केले. राज्यात युतीची सत्ताही आणली. तेव्हा हे देवेंद्र भाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस इतके लोकप्रिय झाले की, त्यांना समाजातल्या एका विशिष्ट वर्गाने डोक्यावरच घेतले. टीव्हीवर देवेंद्र, वर्तमानपत्रात देवेंद्र ,फलकावर देवेंद्र, पुस्तकात देवेंद्र ,गप्पा देवेंद्र ,चर्चेत देवेंद्र,चहा टपरीवर देवेंद्र, जिकडे जावे तिकडे देवेंद्र !
आता थोडा विषय समजून घ्या.मराठी माणसाचा स्वभाव, आकलन शक्ती, माध्यम समर्पण, या गोष्टीचा विचार केला तर , देवेंद्र फडणवीस हे कोणी साधे राजकारणी नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या कल्याणासाठी अवतरलेले महापुरुषच आहेत , असे मराठी माणसावर बिंबवले गेले.पुराण कथा बिंबवल्या गेल्या तसे. मराठी माणसानेही डोळे झाकून त्यांना स्वीकारूनच टाकले. असो .लोकशाहीत लोकसंख्या आणि लोकमत महत्त्वाचं असतं.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
आता हे बघा. पुढे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीसांना सरकार बाहेर राहावे लागले.सरकार बाहेर राहिल्यानंतरची फडणवीस साहेबांची कारस्थाने आठवा . पत्रकार परिषदा आठवा. जाहीर सभा आठवा.. सीबीआय आठवा.ईडी आठवा. आठवले ना ? आणि पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखालील शिंदे - भाजपाचे सरकार स्थापन झालं. हेही चालायचं.सत्तांतरे लोकशाहीचे सौंदर्य असतात.
शिवसेना फुटल्यानंतर, शिवसेना घायाळ झाल्यानंतर,शाहू -फुले -आंबेडकर चळवळीच्या नेत्या सुषमाताईंनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि आपल्या अभ्यासाच्या बळावर, वक्तृत्वाच्या बळावर ,जनसंपर्काच्या बळावर, प्रभावी संवाद कौशल्याच्या बळावर ,कायदे ज्ञानाच्या बळावर, भाजपा आणि शिंदे गटाची फेफरी गुंग करायला सुरुवात केली. भाजपा आणि शिंदे गटाच्या लोकांचा जाहीर पंचनामा महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुरू केला. राज्यभरात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूतीची लाट निर्माण करायला सुरुवात केली,तेव्हा सुषमा अंधारे हिंदू विरोधी ठरवल्या जाऊ लागल्या. देवविरोधी ठरवल्या जाऊ लागल्या.नवरा सोडून दिलेल्या बाई वाटू लागल्या. तिने आजोबांचे नाव कसे लावले , यावर चर्चा झडू लागल्या.सुषमाताईंचे जुने, लोकप्रबोधनाच्या चळवळीतले व्हिडिओ बाहेर काढून ,कीर्तनकार महिलांच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याची मोहीम उघडली गेली.
राजे छत्रपती,क्रांतीबा ज्योतिबा , बाबासाहेबांच्या अवमानाचा विषय गुंडाळून ठेवला गेला. सुषमा अंधारे ना टार्गेट केलं जाऊ लागलं. देवळा देवळात शपथ देण्याच्या आणि घेण्याच्या नाटुकल्यांची सुरुवात झाली. कारण एकच...सुषमा अंधारे नावाचं वादळ ! हे वादळ, मनुवादी विचारसरणीच्या सत्तेला गाढून , समताधिष्ठित समाज निर्मिती करीत , संविधानिक मूल्यांचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणणार .ह्या एका खूप मोठ्या भीतीने, फडणवीस स्नेही वर्गाने अकांड-तांडव सुरू केलं. सुषमा अंधारे यांना बदनाम करण्यासाठी राज्यव्यापी मोहिम चालवली.पण घडले मात्र उलटेच. बहुजनांची पोरं , सुषमा अंधारे यांच्या पाठीशी खंबीर उभी राहू लागली. त्यांना भाजपाचा डाव कळाला.आणि आता तर ते भाजपाला सवाल करू लागली," भाऊ बोलले की देहाला गुदगुल्या , आणि ताई बोलल्या की बुडाला आग? हे कोणत्या ग्रंथात लिहिले आहे बुवा?
--- राजू पाटील.........,औसा.
0 टिप्पण्या