ठाण्यातील महत्त्वाचा पुल असलेला माजिवडाच्या पुलाखाली केवळ दुचाकी, चारचाकी नाही तर येथील बहुतांश जागा स्कूल बसेसने व्यापली आहे. ही वाहने इथे पार्किगकरिता कोणाच्या आदेशाने केली जातात याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पाहणारा दिवसागणिक हजारो रुपये या पार्किंगमधून कमवत आहे. यामागे कोणत्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. या पुलाखाली ही मोठी वाहने उभी करण्यास कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली. यामध्ये कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत याबद्दल ठाणेकरांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. मात्र या पार्किंगचा मलिदा मात्र दिवसागणिक वाढत आहे. पालिकेला कोणतेही शुल्क न भरता महत्वाचा रस्ता वाहन मालकांकडून बंदिस्त केला जात असल्याने याबाबत तात्काळ कारवाई करून येथील बेकायदा पार्किग बंद करावी अशी तक्रार ठाणेकर करीत आहेत. पुलाखाली वाहन मालक मालकी हक्काप्रमाणे वाहने उभी करत आहेत. पालिका त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न आकारता अशा वाहन मालकांना मुख्य रस्त्यावरील पुलाखाली वाहने उभी करण्यास कशी देते, असे प्रश्न शहरातील जागरूक रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. शहरातील अनेक खाजगी बसेस या ठिकाणी बिनदिक्कतपणे पार्किग केल्या जात आहेत. पालिकेच्या मोक्याच्या जागेचा वापर वाहन मालक फुकट करत आहेत याची कोणतीही माहिती पालिकेच्या मालमत्ता प्रभाग साहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्तांना तसेच वाहतूक विभागाला नसल्याचे कळते.
उड्डाणपुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाखालील वाहनतळ पूर्णपणे बंद करून पुलाखाली सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती तत्कालिन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली होती. उड्डाण पुलाखाली होत असलेले वाहनतळ बंद करण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीच्या संदिप बाजोरिया यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. मात्र २०१६ पासून अद्यापही या बाबत कोणतीही ठोस भूमिका शासनाने घेतलेली नसल्याने अनेक उड्डाणपुलाच्या खाली अवैधरित्या पार्किग करण्यात येत आहे. केवळ टु-व्हीलरच नव्हे तर फोर व्हीलर आणि मोठ्मोठ्या बसेस देखील या उड्डाणपुलाखाली पार्किग करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
0 टिप्पण्या