Top Post Ad

यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली- बालसंस्कार


 कोरोना महामारीमुळे सरकारने लावलेल्या लॉकडाऊन नंतर प्रत्येकाच्या घरातील समस्या म्हणजे मुलांना ॲक्टिव करणं फार कठीण झालं आहे. लॉकडाऊन पूर्वी बाल संस्कार केंद्रांमध्ये किंवा इतर उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना ॲक्टिव ठेवलं जात होतं. मात्र, लॉकडाऊन नंतर सर्व गोष्टी बदलल्या आहेत. जास्तीत जास्त पालकांचा भर मुलांना घरामध्येच किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी पाठवण्यावर आहे. तो  तसा योग्यही आहे; याच सर्व गोष्टी विचारात घेता, योग विद्या निकेतन संस्थेच्या योग शिक्षिका मंजिरी फडणीस यांनी “यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली- बालसंस्कार” हे पुस्तक लिहिले आहे. १४ नोव्हेंबर, २०२२ म्हणजे बालदिनाच्या दिवशी सदर पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. वयम् मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर यांच्या शुभहस्ते “यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली- बालसंस्कार” या मंजिरी फडणीस लिखित पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये होणार आहे.

योग विद्या निकेतन 1995 पासून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बालसंस्कार शीबीर घेतात. लेखिका मंजिरी फडणीस या उत्स्फूर्तपणे या शिबीरातील मुलांसाठी बालसंस्कार वर्ग अगदी न चुकता घेत असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या पुढील पिढी सक्षम व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र, कोरोना काळात या सर्व गोष्टी बंद झाल्या. काय करायचं हा विचार सुरू असतानाच, लेखिका मंजिरी फडणीस यांनी “यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली- बालसंस्कार” हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सूचली. आपण कुठेही असलो, तरी संस्कार करण्यासाठी पुस्तकरुपी गोष्टी असणं महत्त्वाचं, हे हेरून त्यांनी सदर पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये बालसंस्कारांसह, विद्यार्थ्यांसाठी योगासनांचे प्रकारही विस्तृतरित्या सांगण्यात आले आहेत.

५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी सदर पुस्तक उपयुक्त असून पालकांनी आवर्जुन विद्यार्थ्यांसाठी सदर पुस्तक आपल्या संग्रहालयात ठेवावे असे लेखिका सांगतात. हे पुस्तक लिहिण्यामागे मंजिरी फडणीस यांनी योग विद्या निकेतनच्या गुरुवर्यांचे आशिर्वाद लाभल्याचे सांगितले. मुकुंद बेडेकर, सुधाताई करंबेळकर, प्रदीप घोलकर, कृष्णमूर्ती, सरोज आठवले, उमा परुळेकर, अनिता कुलकर्णी व जागृती शहा हे सर्व तज्ज्ञ योगशिक्षक बालसंस्कार शिबिरांचे आयोजन उत्तम व्हावे, यासाठी झटत असल्याचे त्या म्हणाल्या. 

तसेच, या पुस्तकाच्या निर्मीतीमध्ये श्रीधर परब, उज्ज्वला करंबेळकर, जया तावडे यांनी वेळ देऊन हे पुस्तक सर्वांगाने उत्तम व आकर्षक व्हावे म्हणून उत्स्फूर्तपणे मदत केल्याचेही त्या सांगतात. या पुस्तकातील सर्व चित्र मंजिरी फडणीस व त्यांच्या योगसाधक शताक्षी ऊरणकर यांनी काढली आहेत. या पुस्तकाच्या लेखनासाठी कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याबाबतही त्यांनी आभार व्यक्त केले. या पुस्तकामुळे छोटी मुले- मुली व त्यांचे पालक यांच्या चेह-यावर कायम आनंद व समाधान झळकत राहील, अशी आशा मंजिरी फडणीस यांनी व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com