Top Post Ad

सांस्कृतिक दिवाळखोरी... ऐतिहासिक पुराव्याची मोडतोड


शालेय किंवा विद्यापीठीय स्तरावर अनेक वेळा आपण वाचले असेल की धनानंद राजाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्त मोरियाला योग्य ते शिक्षण देऊन, त्याला राज्य स्थापन करून दिले. म्हणजेच चाणक्य हा चंद्रगुप्त मोरियाचा गुरू होता! पुढे असेही लिहिले आहे की चाणक्यामुळे मोरियांची सत्ता वाढली आणि चंद्रगुप्त मोरिय एक दिग्विजयी राजा झाले.

भारतात आमच्या शिवाय इतर कुठलीही संस्कृती श्रेष्ठ नसून, आम्हीच इथले करते धरते आहोत असा समज इथल्या काही लोकांचा आहे! त्यामुळे इतर संस्कृतीतील अनेक संदर्भ "ह्यांनी" हवे तसे बदलले आणि लिहिले देखील. त्याच बरोबर अनेक शतकांचा प्रचार केल्यामुळे लोकांच्या मनात हे "श्रेष्ठत्वाचे" चित्र रंगविले गेले आहे.
वर्तमान काळात नवीन संशोधन होत असल्यामुळे, या लोकांनी स्वतःच्या काल्पनिक नायकांचे अथवा संस्कृतीचे ओढून ताणून जे श्रेष्ठत्व दाखविले होते, त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे!
चाणक्य बद्दल जी काही माहिती मिळते ती त्याने लिहिलेली तथाकथित "अर्थशास्त्र", "चाणक्य नीती" हे ग्रंथ, 11व्या शतकात हेमचंद्र याने लिहिलेला "स्थाविरावली चरित्र" ग्रंथ, विशाखादत्तने 8व्या शतकात लिहिलेले "मुद्राराक्षस नाटक" आणि "महावंस" मधील एक पुसटसा संदर्भ.
आता खरा प्रकार पाहू यात -
असे सांगितले जाते की चाणक्याने जेव्हा चंद्रगुप्तला शिकवायला सुरुवात केली तेव्हा चाणक्य जवळपास 40 वर्षाचा होता तर चंद्रगुप्त 11 वर्षांचा. पुढे असेही सांगितले जाते की राजकुमार अशोक 14-15 वर्षाचा असताना, चाणक्याचे निधन झाले. आता जर आपण चाणक्य, चंद्रगुप्त, बिंदूसार आणि अशोक यांच्या वयाचे calculation केले तर लक्षात येईल की चाणक्य वयाच्या 175 किंवा 206 वर्षी निधन पावला!!! जगातल्या इतर कोणीच प्राचीन प्रवासी अथवा इतिहासकाराने या "दीर्घायु" व्यक्तीची दखल घेऊ नये? किती हा द्वेष ना!!! मुळात एखादी व्यक्ती एवढ्या वर्षांचे आयुष्य जगली असेल याचा ना कुठला पुरावा ना कुठला दस्तऐवज!
ग्रीक इतिहासकार मेगेस्थेनेसने भारतातील अनेक आचार्य, राजे, तत्वज्ञानी, मंत्री यांच्याबद्दल लिहिले आहे. मॅगेस्थेनेसने चंद्रगुप्त मोरियांच्या पाटलीपुत्राचे वर्णन केले आहे, मोरिय सेनेचे, त्यांच्या प्रशासनाचे वर्णन केले आहे, संपूर्ण भारताचे वर्णन केले आहे, मात्र चाणक्य बद्दल एक चुकार शब्द देखील नाही!!! जर चाणक्य एवढे मोठे व्यक्तिमत्व होते तर त्यांचा साधा उल्लेख नाही?
समजा क्षणभर चाणक्याचे अस्तित्व मान्य केले तर त्याच्या संभाषणाची भाषा काय असेल? त्याच्या तथाकथित लिखाणावरून तो संस्कृत मध्ये बोलत असावा असे वाटते, पण चंद्रगुप्तांच्या काळात तर पालि प्राकृत भाषा सर्वदूर प्रचलित होती! संस्कृत भाषा तर त्याकाळात तयार पण झाली नव्हती, मग या दोघांचा संवाद कोणत्या भाषेत होत असेल?
वर नमूद केलेले ग्रंथ पाहू यात - अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती हे ग्रंथ आर्थिक आणि राजकीय किंवा शासकीय पद्धतीचे काही विचारांचे संकलन आहे, मात्र हे चाणक्याने लिहिले आहे याचा कुठलाही लिखित अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही.
काही अभ्यासकांच्या मते, "अर्थशास्त्र" ग्रंथ हा विष्णुगुप्तने लिहिला असावा कारण काही भागांच्या शेवटी लेखक म्हणून ते नांव आले आहे! तर काहीजण म्हणतात की लेखक विष्णुगुप्त असून त्यांचे गोत्र चाणक्य होते! म्हणजे लेखकाने जरी फक्त विष्णुगुप्त असे स्वतःचे नांव लिहिले असले तरी त्याचे गोत्र चाणक्य होते असा "ह्यांचा" जावई शोध आहे!! कारण ओढून ताडून चाणक्याचे नांव यायला हवे !!!
मुद्रराक्षस हे नाटक 8व्या शतकात लिहिले गेले आहे. या नाटकात इतिहास कमी आणि कल्पनिकता भरपूर आहे त्यामुळे यातील प्रसंग कुठल्याही अर्थाने ऐतिहासिक म्हणता येणार नाहीत.
स्थाविरावलीचरित्र हे काव्य हेमचंद्रांनी 11व्या शतकात जैनांचा इतिहासासाठी लिहिले मात्र त्यात चंद्रगुप्ताचा पुसटसा उल्लेख येतो आणि चाणक्य हा त्याचा समकालीन होता असे लिहिले आहे.
आता ऐतिहासिक संदर्भ पाहू यात -
चंद्रगुप्त मोरिय आणि विष्णुगुप्त मोरिय हे दोघे सख्खे भाऊ होते. चंद्रगुप्त हा अतिशय महत्त्वाकांक्षी व शूर योद्धा होता तर त्याचा भाऊ, विष्णुगुप्त हा कणखर प्रशासक व दूरदृष्टीचा होता. राज्य चालविण्यासाठी दोघांचे गुण एकमेकांना पूरक होते. या दोघांनी मिळून धनानंदचा पराभव केला आणि राज्य स्थापन केले. नंतर राज्याचा विस्तार वाढवत एक अखंड भारत राज्य स्थापन केले! याचे एक महत्वाचे प्रमाण म्हणजे सम्राट अशोकांचे पुत्र, बौद्ध आचार्य महिंद यांनी श्रीलंकेत असताना (इ.स.पूर्व 3रे शतक) लिहिलेली "उत्तर विरहट्ट" ही कथा. या कथेचे भाषांतर आयु. सिद्धार्थ वर्धन सिंह यांनी केले आहे.
या कथेमध्ये पालि भाषेमध्ये चंद्रगुप्त व विष्णुगुप्त मोरिय यांचे वर्णन करताना म्हटले आहे -
आदिच्चा नाम गोतेन साकिया नाम जातिया
मोरियानं खातियानं वंसजातं सिरिधरं
चन्दगुप्तो ति पज्जातं विण्हुगुप्तो ति भातुको ततो
म्हणजेच सूर्य सारख्या तेजस्वी घराण्याचा, शाक्य गणात जन्मलेल्या, मोरिय वंशाच्या क्षेत्र रक्षकांमधील सिरी चंद्रगुप्त आणि त्यांचा भाऊ विष्णुगुप्त हे प्रज्ञा संपन्न होते.
जेव्हा ही कथा भारतामध्ये,10व्या शतकात, संस्कृत भाषेमध्ये भाषांतरित करण्यात आली त्यावेळेस हे पद कसे लिहिण्यात आले ते पहा -
मोरियानं खतियानं वंशे जातम् सिरिधरं
चन्द्रगुप्तो ति पज्जातं चाणक्यो बाम्हणो ततो
म्हणजे पालि भाषेमधून संस्कृत भाषेत भाषांतर करत असताना मोठ्या चलाखीने विष्णुगुप्तच्या ऐवजी चाणक्य ब्राह्मण हे नांव घालण्यात आले आणि आता त्याचा अर्थ असा करण्यात आला की मोरिय वंशाने जरी राज्य स्थापित केले असले तरी त्यामागे प्रज्ञासंपन्न चाणक्य ब्राह्मणाचा हात होता!
म्हणजेच चंद्रगुप्त मोरिय याचा शूरपणा आणि त्याचे बंधू विष्णुगुप्त यांचे कर्तृत्व शून्य आणि सगळा विचार किंवा डोकं हे फक्त ब्राह्मण चाणक्याचेच! हेच ते ऐतिहासिक तथ्यांचे रूपांतरण! हीच ती सांस्कृतिक दिवाळखोरी!! आपल्याला हवं तेवढेच बदलून त्याचा जोरदार प्रचार करायचा... जेव्हा नंतर चाणक्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले तेव्हा मग असे म्हणण्यात येऊ लागले की विष्णुगुप्तचेच नांव चाणक्य अथवा कौटिल्य होते!! आणि हे नांव त्याला त्याच्या गोत्रावरून पडले!! पण याला पुरावा काय? जर विष्णुगुप्त आणि चंद्रगुप्त हे सख्खे भाऊ होते आणि ते प्रज्ञावान व शूर होते असा त्यांचा पणतू म्हणजे आचार्य महिंद स्वतः लिहीत असेल, तर तो इतिहास बदलणारे "हे" कोण?
याचे कारण स्पष्ट आहे - मोरिय वंश म्हणजे चंद्रगुप्त मोरिय ज्यांनी अखंड भारताचे राज्य स्थापन केले, त्यांना हे श्रेय न देता, एका ब्राह्मणाला द्यायचे होते. आणि म्हणूनच "काल्पनिक चाणक्य ब्राह्मण" निर्माण करण्यात आला! मात्र जेव्हा चाणक्याचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले, तेव्हा लगेच विष्णुगुप्तच्या नावाच्या मागे साळसूदपणे चाणक्य किंवा कौटिल्य लावले आणि ते त्यांचे गोत्र होते असे सांगितले!
जर चंद्रगुप्त मोरियांचे गोत्र खरोखरच चाणक्य किंवा कौटिल्य असते, तर आचार्य महिंद यांनी तसे नमूद केले नसते का?
हीच आहे त्यांची सांस्कृतिक दिवाळखोरी...ऐतिहासिक पुराव्याची मोडतोड करून स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा टेंबा मिरावण्याचा......असाच प्रकार या तथाकथित इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल्पनिक गुरू विषयी लिहिताना केला होता!
म्हणूनच खऱ्या संस्कृतीचा अभ्यास, संशोधन, लिखाण आणि प्रचार महत्त्वाचा आहे...
अतुल मुरलीधर भोसेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com