Top Post Ad

रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?


  आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष कोणाचा आहे असे विचारले तर काय उत्तर मिळेल?.ते ऐकण्याची तयारी कोणाचीच नसणार, कारण त्यांच्या आजू बाजूच्या नगरातील विभागातील कार्यकर्ते नेते दररोज सकाळी कुठे भेटतात आणि संध्याकाळी काय करतात. त्यांचे उधोगधंदे व उत्पन्नाची साधन व मार्ग कोणते यांची पूर्ण कल्पना विभागातील समाजाच्या लोकांना असते.त्यांनी जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहतात.कारण क्रांतिकारी विचाराचे आचरण त्यांच्यात कुठेच दिसत नाही. दलाली,गुलामगिरी आणि लाचारी नसानसात भरलेली माणस जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट करतात तेव्हा जवळची लोकच त्यांच्याकडे संशयाने पाहतात.ते तसे जगण्यासाठीच एकाच नगरात एकाच गटाशी प्रामाणिक राहत नाही,तथागत बुद्ध वाचनालय काढतील पण त्यावर बुद्ध आंबेडकर यांच्या फोटोपेक्षा राष्ट्रवादी नेत्याच्या भाऊ,वहिनी,आईचा फोटो किती महत्त्वाचा आहे हे नगरातील विभागातील लोकांना दाखवुन देतील त्याला स्वाभिमानी,आंबेडकरी विचारांचे माणस विरोध करण्याचे धाडस कधीच करणार नाहीत. मागे जरूर बोलतील पण समोर नाही.मूर्ख आहे तो त्यांच्या कशाला नादी लागावे असे म्हणूनच त्याला सोडून देतील.पुढे जयंतीला, वर्षावास समारोप, महापरिनिर्वाण दिनाला भोजन दान व बॅनर त्यांच्या कडुन मात्र न चुकता घेतील. यामधूनच रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?.याचे उत्तर मिळते.

         नगरात विभागात रिपब्लिकन कार्यकर्ता नेता जातीने व कार्याने ओळखला जातो.आज माझी मुले मला विचारतात रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट काय होते?. ते कुठे दिसतात काय? प्रत्येक नेत्याचे समाजा बाबत काय मत आहे हे जर ऐकले तर लढावे की रडावे हाच प्रश्न पडतो.क्रांतिकारी विचाराचा शब्द रिपब्लिकन आणि बहुसंख्येने असलेला समाज म्हणजे हत्ती सारखी शक्ती तीच आपली निशाणी.कुठे आहे?.म्हणूनच जाहीरपणे विचारतो रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला?.भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणाऱ्या समाजाचा हा राजकीय पक्ष होता.आणि होऊ शकते. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.आज तो सत्ता मिळवुन देणारा समाज म्हणूनच ओळखला जातो.

              शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.त्याच्या महापरीनिर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाईची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज "रिपब्लिकन" हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या ऐतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल. त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अंतिम उद्धिष्ठा पर्यंत पोचला नाही. भारताला आणि भारतीयांना कठीनातील कठीण प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लोकशाही दिली.संविधानाची योग्य अमंलबजावणी केली तर कोणत्याही समस्या सुटू शकते.पण रिपाई ने त्याला महत्व न देता स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.म्हणून आज ही यांची संपूर्ण इमारत त्यावरच उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यांनी संविधान मान्य केले असते तर आज रिपब्लिकन समाज रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ठ गाठण्याच्या स्पर्धेत असता.  

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली.म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर.डी.भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर डी भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आता पर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.आंबेडकर अनुयायाची आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्या मुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली "व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येउच शकत नाही ?" अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण केली.

          प्रा.जोगेंद्र कवाडे सरांसारखा प्रामाणिक नेते मागच्या दराने आमदार झाले. आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला. रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमकी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्स्त झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात.त्यातच  रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?.यांचे उत्तर दडलेले आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी 'प्रबुध्द भारत' मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता. त्यात न्याय,समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील,पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन,आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, 'हा पक्ष देशातील सर्व कष्टकरी मागासवर्गीय समाजातील शोषित,वंचित,पिडीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल. अनुसूचित जाती-जमाती,बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल.शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान,ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा. पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृती मधिल प्रतिक तर, अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.हा इतिहास आजचा तरुण वाचायला तयार नाही.म्हणून तो इतिहास वाचून इतिहास घडविण्यास तयार नाही.तो दिशाहीन झाला आहे.कारण समाज विकला जातो.त्याला कारण कार्यकर्ता आहे.कार्यकर्ता विकला जातो त्याला जबाबदार नेता असतो.आणि नेता नालायक असतो त्याला हाच समाज जबाबदार आहे.समाजाने भारतीय सविधाना नुसार किंवा बुद्ध धम्माच्या संघाच्या पंचाशिलेचे आचरण केले तर अशी पिलावळ जन्माच येणार नाही.यामुळेच रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला?. हे विचारण्याचा अधिकार समाजाला,कार्यकर्त्याला आणि नेत्याला राहिला नाही.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर १९५६ महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते. त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती, त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर, शेतमजूर,कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता.पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली,बलाढ्य एकसंघ असलेली संघटना,रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर,दिशाहीन बनत गेले. गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन देशातील तमाम कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांच्या एकजूटीमुळे आदरणीय जे.एस पाटील यांचं कुशल त्यागी नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणत उभी राहिली आहे. ४७ क्षेत्रात आणि २२ राज्यात ती देशातील ७ टक्के संघटीत ९३ टक्के असंघटीत कामगार मजुरांचे प्रबोधन करून यशस्वीपणे घौडदौड करीत आहे. शासन कर्ती जमात बनायचे असेल तर सर्व कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाने स्वतंत्र मजदूर युनियन सोबत जोडून घेतले पाहिजे.अन्यता भविष्यात सर्वात जास्त शोषण हे कामगारांचे होणार आहे.त्याला कोणताही राजकीय पक्ष वाचू शकणार नाही.बाबासाहेबांनी १२ व १३ फेबुर्वारीला १९३८ ला मनमाड येथे दोन दिवशीय कामगार परिषेदत दोन शत्रूची ओळख करून दिली होती.एक ब्राम्हणशाही दुसरी भांडवलशाही आज तीच हातात हात घालून देशात संविधानाची धाज्जीया उडवत आहे.आपण हताश पणे पाहत आहोत. राजकीय पर्याय नाही.तर राष्ट्रीय ट्रेड युनियन हा पर्याय होऊ शकतो.

            देशातील १९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी,कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनियर नव्हता. तर सर्व असंघटीत कामगार मजूर असतात.हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही. रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल.अहंकार,मतभेद,प्रलोभन,अमिषापायी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक,राजकीय निष्ठा गौण ठरत आहे. आज आपला सामाजिक,राजकीय पाया काय आहे?. ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे,क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर, चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?.असे अनेक प्रश्नचिन्ह आहेत. 

            अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय?. संविधाना नुसार ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडणुका होऊन निकाल लागतो. त्याकरिता भारतीय नागरिक म्हणून नांव नोंदणी झाली तरच मतदानाचा अधिकार असतो ,ग्रामपंचायत सदस्य ते आमदार,खासदार कोण कोणाला कसे निवडून देते हे उठता बसता भारतीय घटनेच्या शिल्पकारांचे नांव घेणाऱ्या समाजाला सांगणे मला शोभणारे नाही.   डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे? पक्षाची राजकीय मान्यता, निवडणूक चिन्ह ही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत.अत्याचार,अन्याय,भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण आपण सर्व करणार आहोत?. राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत.आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना, आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय, सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर?.  राजकारण कशासाठी, कोणासाठी आणि का करायचे?.यातच रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?. याचे उत्तर आहे.

     ३ ऑक्टोबर २०२२ रोजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६६ वर्ष पुर्ण होत आहेत. एकाही रिपाई गटाची मान्यता नाही.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे. मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे.तर कोणताच नाही.त्यामुळेच  रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?.हा गंभीर प्रश्न उभा राहतो.

     रिपब्लिकन गटाचे नेतृत्व करणारे एक नंबर नेतृत्व सोडल्यास राज्यात दोन,तीन चार पाच नंबर राज्याचे नेतृत्व करणारे नेते नाहीत. प्रशिक्षित कार्यकर्ते नाहीत.लेटर हेड वर जगणारे कार्यकर्ते समाजाला स्वाभिमानी बना सांगु शकत नाही. सरकारी योजनांची अभ्यासपूर्ण माहिती नाही.समाजाचा आणि जनतेला कसा लाभ मिळवुन द्यावा यावर जनांदोलन उभे न राहता स्वतःला किती कमिशन अथवा दलाली भेटलं यावर सर्व लक्ष केंद्रित असलेले कार्यकर्ते, नेते पक्षाला कोणती दिशा दाखवून पुढे नेतील. त्यामुळेच असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही.लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?. रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?. हा प्रश्न उभा राहतो.

        म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील स्वार्थी,अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी.आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या वर्धापन दिना निमित्य एक संकल्प करूया आणि रिपाईला संविधान मान्य असेल.त्याची अमंलबजावनी करून रिपाई अहंकार मुक्त करून येणाऱ्या ६५ व्या वर्षात रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ? ते ठरवुन काम केले पाहिजे. आणि ते करण्यासाठी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून तरुणांना संधी दिली पाहिजे.रिपब्लिकन पक्षाचा इतिहास घडविता येईल.अन्यता कोणता रिपब्लिकन पक्ष आणि तो रिपब्लिकन पक्ष कोणी संपविला ?. हे दरवर्षी आठवावे लागेल.

 रिपब्लिकन पक्षाच्या (३ ऑक्टोबर १९५७) वर्धापन दिना निमित्त आत्मचिंतन करणारा विशेष लेख 

सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडूप मुंबई,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com