Top Post Ad

बंडाचा झेंडा फडकवला.... पण मतदारसंघ ...?


ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी इडीच्या चौकशीतून आणि अटक होण्यापासून सुटका मिळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले. या बंडामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले. भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्या मागचा इडीचा ससेमिरा काहीसा संपुष्टात आला. त्यांना दिलासा मिळाला मात्र हा दिलासा काही काळापूरताच मर्यादीत ठरत असल्याचे दिसत आहे. इडीपासून मुक्तीच्या या दिलासाचा आनंदोत्सव साजरा करीत असतानाच ओवळा माजिवडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी 
 सरनाईक यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकायला सुरुवात केली असल्याची कुजबूज आता चव्हाट्यावर आली आहे.   

 ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे म्हणूनच एकनाथ शिंदेवर भाजप दबाव टाकत असल्याचा आरोपही सध्या होत आहे. ओवळा माजीवाडा मतदारसंघ बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचा आहे मात्र हा आणि इतर दोन मतदारसंघ भाजपला हवे असून त्यादृष्टीने भाजप रणनीती आखत असल्याचे  मध्यंतरी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या तिन्ही मतदारसंघात भाजपचे मेळावे घेतले यावरून दिसून येते. त्याच वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप डोळा ठेवल्याचे बातम्या आल्या होत्या. आता ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे तिन्ही मतदारसंघ भाजपला हवे असून त्यात प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघाची डील झाल्याने एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्यात धुसफूस होणे स्वाभाविकच आहे. 

सत्तेसाठी करण्यात आलेल्या बंडामध्ये एकेकाळचे शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून मानले गेलेले प्रताप सरनाईक आघाडीवर होते. विविध प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढल्याने सरनाईक शिंदे सोबत गेल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सरनाईक यांना शिंदे गटाचे प्रमुख नेते मानले जाते. त्यातच दसरा मेळावा हा शक्ती प्रदर्शनाचे माध्यम ठऱ्ला असल्याने  यासाठी गर्दी जमण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. असे असताना मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.  

शिंदेगटाने भाजपसोबत घरोबा करून राजकीय टोपी बदलली असली तरी  तरी या टोपीखाली काय दडलय हे सध्या तरी त्यांनाही ठाऊक नसावे. सत्तांतराला उणेपुरे चार महिन्याचा कालावधी झाला आहे. आणि भाजपने आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. इकडे कल्याणची सुभेदारकी अर्थात खासदारकी भाजपकडे यावी म्हणून विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांची बदली ठाण्यात करण्यात येणार असल्याचेही आता लपून राहिलेले नाही. तर दुसरीकडे लगेच ठाण्यातील आमदारकीचे मतदारसंघही भाजप आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याची सुरुवात प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघाने करण्यात आली आहे. यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच सरनाईक यांच्याशी आग्रह धरल्याने आता वादाला तोंड फुटले आहे.   

खरं तर   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद नवा नाही. याआधीही अनेक वेळा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या पोस्टरवरूनच प्रताप सरनाईकांना गायब करण्यात आले होते. मात्र आता ओवळा माजीवाडा मतदारसंघावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. हा मतदार संघ सोडला नाही तर  केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असलेल्या सरनाईक यांच्या विरोधात पुन्हा एकदा चौकशीचा फार्स आवळण्याच्या हालचाली सुरू होण्याची धमकी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली आहे.  

नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानभवनात केली. सरनाईक आणि शिंदे यानंतर अनेक कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र दिसून आले. एकमेकांचे विरोधक असलेल्या शिंदे आणि सरनाईकांमध्ये आता सगळं आलबेल असल्याचे यामुळे सर्वत्र दिसून येत होते.  मात्र, दोघांमधील शीतयुद्ध आता नव्याने धुमसत आहे.ओवळा- माजीवाड़ा मतदारसंघात पकड 1997 ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा- माजीवाडा मतदारसंघातून आमदारही झाले.   

याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही. तर मीरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील त्याचा काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर शास्त्राrनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात येतात. येथे सरनाईक यांची मजबूत पकड आहे.  

ओवळा माजीवाड़ा मतदार संघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. सरनाईक यांना ही बाब कळताच, त्यांनी थेट शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. . शिवसेनेतील बंडखोरी नंतर प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने एकाच मंचावरती उपस्थित असायचे. सध्या दोघांमध्ये बिनसल्याने दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला होता. शिवसेना आणि शिंदे गटाचे संबंध ताणले गेले असताना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र, बंडखोरीनंतर एकत्र दिसणारे सरनाईक आणि शिंदे कुठेही सोबत दिसले नाहीत. यावरून प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापासून फारकत घेऊन चार हात लांब राहत असल्याचे दिसत आहे. मात्र राजकीय पटलावर आदलाबदल केलेल्या या टोपीखाली अजून काय काय दडलंय हे येणारा काळच सांगेल.  बंडाचा झेंडा तर फडकवला पण मतदारसंघ हातचा निसटला असं म्हणण्याची वेळ सरनाईक यांच्यावर येऊ नये...?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com