ठाण्यातून नवी मुंबई, पुणे मार्गावरून जाण्यासाठी कळवा पुलाशेजारी साकेतकडील बाजूस खाडीवर पूल उभारण्याचे प्रयोजन ठाणे महानगर पालिकेच्या वतीने २०१४ साली करण्यात आले. सदर पुलासाठी सुमारे १८० कोटी रुपये अपेक्षित असलेल्या खर्चासाठी निविदा काढण्यात आल्या. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जे. कुमार या कंत्राटदाराला सदर पुलाचे काम देण्यात आले. यामध्ये पुलाचे संपूर्ण काम ३६ महिन्यात पुर्ण करणे ही अट असतानाही आज सात वर्षाचा कालावधी होऊन देखील हे काम अद्यापही पुर्ण झालेले नाही. तसेच आणखी किती वर्ष लागतील याबाबतही काही ठोस उत्तर ठेकेदार तसेच या कामाची पाहणी करणारे संबंधित अधिकारी देत नाहीत. चार डेडलाईन संपल्या तरीही या पुलाचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही. याबाबत ठेकेदारावर कारवाई का करण्यात येत नाही?
कार्यदेश - TMC/PWD/CE/55 दि. १२-०९-२०१४ नमुद स्वाक्षरी City Engineer, TMC Thane. हे M/s SUPREME J. Kumar JV [यांना] विषयांकित काम 183,66,61,353/-या रक्कम मध्ये दिले आहे. काम अधिकृत स्विकारताना M/s Supreme-J.Kumar JV यांना ठाणे महानगरपालिकेने TMC/7/Kalwa/Thane/CR. DR /FEA/RET/BN/702/21/2014 रोजी Flexibility Report ही देण्यात आला होता. सदर रिपोर्टचा संबंधित ठेकेदाराने अभ्यासपूर्वक विचार करूनच काम स्वीकारले असताना आज सात वर्ष झाली असतानाही मुदतीत काम झालेले नाही. विविध कारणे सांगुन वेळकाढूपणा केला जात आहे. विहीत मुदतीत काम पूर्ण न केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई का होत नाही. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून सदर प्रकरणाचा विस्तृत सर्व अभिलेख मागवुन या दिरंगाईला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांना तसेच इतर आस्थापनाना लिखीत देण्याचे आदेश करावे. तसेच याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संजीव दत्ता यांनी पत्राद्वारे ठाणे महानगर पालिका आयुक्तांना केली आहे.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी नुकताच याबाबत दौरा केला. आणि प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी या पुलाच्या पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदाराना दिले. तसेच पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक आणि ठाणे बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम २५ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही संदीप माळवी यांनी दिला. मात्र एकुण बांधकामाला झालेल्या दिरंगाईबाबत अतिरिक्त आयुक्तांनी कोणतीही वाच्यता करण्याचे टाळले. ३६ महिन्यात बनणारा पूल आज सात वर्षे झाले तरी पुर्ण झाला नाही. याबाबत अति.आयुक्तांनी मौन बाळगल्याबाबत ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याआधी देखील मार्च २०२१ मध्ये कळवा पूलाचा १०० मीटर लांब व १७.५ मीटर रुंदीचा १०५० टन वजनाचा सांगाडा १४ मीटरपर्यंत उचलून पुलाच्या पीलरवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सांगाड्यात कॉक्रिट टाकून पूल तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी या पुलाच्या कामाची मार्च महिन्यात आयुक्तांनी पाहणी केली. पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत ठाणे स्टेशनकडून येणारी आणि शिवाजी हॉस्पिटल समोर उतरणारी किमान एकेरी मार्गिका तरी सुरु करा असे आदेश डॉ. बिपीन शर्मा यांनी प्रशासनाला दिले होते. त्या आदेशालाही ठेकेदाराने हरताळ फासला आहे.
कळवा गाव आणि ठाणे शहराला जोडण्यासाठी इंग्रज सरकारने १८६३ साली ऐतिहासिक पूल बांधला होता. परंतू हा पूल आता दुरूस्तीपलिकडे गेला आहे. तसेच तो हेरीटेज घोषीत करण्यात आला असल्याने पुलावरून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाला समांतर नवा पूल १९९५ ला बांधण्यात आला. मात्र नव्या पुलावर मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, पुणे या शहराकांडे जाण्यासाठी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा वाहतुकीचा मोठा ताण पडत आहे .पहाटेपासून रात्री उशीर पर्यंत या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तरीही कळवा खाडीवर २.२ कि.मी लांबीचा सिलिंक बांधण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे . २०१४ साली सुरू झालेल्या या पुलाचे २०१७ साली 36 महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, त्यानंतर पाच वर्षे होऊन गेले तरी तारीख ते तारीख सुरू आहे. मार्च २०१८ त्यानंतर सप्टेंबर २०१९ नन्तर डिसेंबर २०१९ चा वायदा करण्यात आला होता. मग गेल्या वर्षीच्या ऑगस्ट 2021 महिन्यात ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात येत होते. मे 15 2022 ही डेडलाईनदेखील पुढे ढकलली आहे. जून 2022 पर्यंत एक मार्गिका खुली करण्याची पाचव्यांदा डेडलाईन मिळाली मात्र अद्यापही मार्गिका खुली करण्यात आलेली नाही. या सर्व डेडलाईनना कंत्राटदाराने केराची टोपली दाखवून देखील प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही पुन्हा पुन्हा डेडलाईन देण्याचे सौजन्य मात्र पालिका प्रशासन दाखवत आहे. यामध्ये कोणाकोणाचे खिसे भरले जात आहेत. संभवित पुलाच्या खर्चात देखील प्रचंड वाढ झाली आहे. तरीही आता पुन्हा अति.आयुक्तांनी २५ ऑगस्टची डेडलाईन देऊन कंत्राटदाराला चरायला कुंपण मोकळे सोडले असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
0 टिप्पण्या