Top Post Ad

धुळे जिल्ह्यात जातीवादाचा उद्रेक... गावगुडांनी घातला सामाजिक बहिष्कार


धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे पोळा सण साजरा करताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी येथील दलित तरुणांनी काढलेली बैलांची मिरवणूक अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दलित तरुणांनी काढलेली मिरवणूक काही जातीयवादी लोकांनी अडविली. तसेच जबर मारहाण करत लाठीकाठ्यांनी हल्ला केला.  सदर प्रकरणी गावातील 10 जणांविरुध्द अ‍ॅक्ट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कुणालाही अटक करण्यात आली नाही. 

इतकेच नव्हे तर या गावगुंडांनी गावात बैठक घेवून पोलिस प्रशासनावर दबाव टाकून बौध्द समाजाच्या तरुणांवर ३९५ सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला.' तसेच  या जातीयवादी लोकांनी गावातील त्या वस्तीवर बहिष्कार टाकण्याइतपत मजल मारली आहे. त्यांना किराणा देऊ नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, न्हाव्याने त्यां लोकांची दाढी, कटींग करु नये, जो दुकानदार किराणा देईल त्याला गावात बोलावून चौकात ठोकायचे आणि त्याच्याकडून एक ते पन्नास हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय येथील गावगुंडानी घेतला आहे. दलित समाजातील एका तरुणाने नाभिक दुकानदाराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून केलेल्या संवादाची ऑडीओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. किराणा दुकानदार आणि शेतीसंदर्भातही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. यात गावकर्‍यांचा सामुहीक निर्णय झाला असून तुम्हाला सहकार्य न करण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा आम्हाला मारहाण केली जाईल. आम्ही कोणतीही वस्तू देवू शकत नाही. कारण आम्हाला गावात रहायचे आहे, अशा अर्थाचा संवाद व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले

या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पीडितांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे मांडली.  यासंदर्भात जिल्हाप्रशासनाला  लेखी निवेदनही देण्यात आले.  अशा जातीयवादी मानसिकतेच्या लोकांवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, धुळे तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी देखील शिक्षण घेणाऱ्या बौद्ध तरुणांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम केले आहे. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायद्याला शह देण्यासाठी जाणीवपूर्वक कलम 395 अन्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करुन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.संतोष जाधव, राज चव्हाण, प्रवीण साळवे, आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, मंगेश जगताप, संजय बैसाणे, रामकृष्ण नेरकर, देवेंद्र बनसोडे, प्रेम अहिरे, भैय्या वाघ यांच्यासह कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते.

जिल्हा पोलीस प्रमुख प्रविण पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन देवून चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, मेहेरगावात यापुर्वी अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरुन वाद झालेले असतांना देखील सामुहीक बहिष्कारापर्यंतची वेळ कधी आली नाही. मात्र पोळ्याच्या दिवशी जाणीवपूर्वक तरुणांना अडवून बैल मिरवणूक घेवून जावु नका असे व्देष भावनेतून व जातीवादी मानसिकतेतून सांगण्यात आले. यातूनच लाठ्या-काठ्या व लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर या गावगुंडांनी गांधी चौकात बैठक घेवून या समाजाशी संबंध तोडण्याचा तसेच त्यांना किराणा देवू नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, नाभिक समाजाने त्यांची दाढी, कटींग करु नये असा निर्णय घेतला. जो व्यावसायीक दलित समाजाला मदत करेल त्याला चौकात आणून मारहाण करायची व त्यास रोख स्वरुपाचा दंड आकारायचा असाही सामुहीक निर्णय झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे  

जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस प्रमुख प्रविण पाटील यांनी फौजफाट्यासह यांनी गावात भेट दिली. दोन्ही गटाची समजूत घालून बहिष्कारासारखे प्रकार करु नये, असे सांगितले. सरपंच महेंद्र भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्यासह काही जबाबदार नागरिकांनी गावात प्रत्यक्ष फिरुन व्यावसायीकांना आवाहन करीत आपापले व्यवहार सुरु ठेवण्याचे आणि पिडीत समाजालाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. सध्या व्यवहार पुर्ववत असले तरीही गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे

------------

धुळे तालुक्यातील एका गावात बैल पोळ्याला मारोतीला बैल फिरविण्याच्या वादातुन दलित समाजावर बहिष्कार टाकण्याची कारवाई केली गेली.तशी हि काही आता पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रासाठी नविन बातमी नाही आहे.अधुम मधुन कायमरित्या मारहाणीच्या आणि अत्याचाराच्या बातम्या येत असतात काही बातम्या बाहेर येतात तर बऱ्याच झुंडशाहीपुढे दबल्या जातात. या अशा बातम्या आल्यानंतर आपण भावनिक होतो उद्वीग्न होतो.

पण आपण एक विचार करत नाही आम्ही कधी पर्यंत प्रतिक्रियावादी होणार.आम्ही आता तरी या अशा प्रसंगा नंतर प्रतिक्रिया देण्यापेक्षा क्रियावादी होउन काम करण्यास प्रवृत्त व्हायला हवे. खरं तर आम्ही यांचे आभार माणायला हवे कि खऱ्या अर्थाने हे जातीवाद आणि जाती मिटविण्याचे कार्य करत आहेत.ते तुम्हाला वांरवांर अन्याय अत्याचार करुन हेच सांगत आहेत कि या शुद्रतेतुन बाहेर पडा कारण प्रबोधनातुन तर आम्ही दलित आणि शुद्र ओळख सोडायला तयार नाही निदान अन्याय आणि अत्याचार तरी आम्हाला प्रवृत्त करतील कि आम्ही या व्यवस्थेतुन बाहेर पडु.बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करुन दिल्या शिवाय तो बंड करुन उठणार नाही म्हणुन मग हे जातिय माणसिकतेने ग्रासीत लोक गुलामांना गुलामीची जाणीव करुन देत आहे.

या गोष्टी आता तरी आम्ही  नकारात्मक घेण्यापेक्षा सकारात्मक घ्यायला हव्यात ते तुम्हाला तुम्हाला वांरवांर जाणीव करुन देत आहेत कि या धार्मिक गुलामगिरितुन बाहेर पडा तर पडा बाहेर. ते बहिष्कार यासाठी टाकत आहे कि तुम्ही तुमची स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण कराल. ते तुम्हाला चक्कीवर पिठ दळुन देत नाही तुम्ही स्वतःची चक्की चालु करा, ते तुम्हाला किराणा देत नाही तर तुमचे दुकान उभारा, ते तुमचे केस कापत नाही तर तुम्ही तुमच्या समाजातील न्हावी तयार करा पण जागे व्हा. आज आयु.राजरत्न आंबेडकर पोटतिडकिने सांगत आहेत कि आमची स्वतःची व्यवस्था निर्माण करायची आहे ति याचसाठी कि आमची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अस्तित्व निर्माण व्हायला हवे. त्याच साठी प्राथमिकतेने ठाणे जिल्ह्यातुन बुद्धिस्ट बॅंक आणि नागपुर मधुन बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी हे विषय प्राथमिकतेने घेतले आहेत. आंदोलन आम्ही एक दिवस करु दोन दिवस करु त्यानंतर परिस्थिती जैसे थे यावर कायमस्वरूपी इलाज करायचा असेल तर आम्हाला बुद्धांचा मार्ग स्विकारुन आमची स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण करणे हाच एकमेव पर्याय आहे. 

  • व्हि पि निरभवणे
  • कल्याण तालुका आध्यक्ष
  • दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
  • दि. ३०-०८-२०२२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com