Top Post Ad

वन हक्क कायद्याची अंमलबजावणी आणि सद्यस्थितीबाबत जमीन हक्क परिषद संपन्न


 अखिल भारतीय किसान सभा आयोजित जागतिक आदिवासी दिन विशेष जमीन हक्क परिषद, ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सभागृह, जिल्हा परिषद विश्रामगृह, जुना डाक बंगला मध्ये १३ ऑगस्ट  रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या परिषदेत आदिवासी, दलित, मराठा, आगरी, कुणबी या सर्व समाजांतून शेतकरी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. १९४३-४४ साली कॉम्रेडस् शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी मुरबाड, कल्याण आणि शहापूर तालुक्यात किसान सभेची मुहूर्तमेढ रोवली होती, आणि ७ जानेवारी १९४५ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे स्थापना अधिवेशन येथून जवळच असलेल्या टिटवाळा येथे झाले होते. त्याच्या अनेक दशकांनंतर मुरबाड तालुक्यात किसान सभेची या परिषदेतून पुन्हा सुरुवात झाली. या परिषदेचे अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे (पाॕलिट ब्युरो सदस्य, CPI(M), राष्ट्रीय अध्यक्ष, AIKS) होते व परिषदेचे उद्घाटन कॉ. विनोद निकोले (आमदार CPI(M), डहाणू विधानसभा) यांनी केले. या परिषदेमध्ये पक्ष व जनसंघटनांच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले, त्यामध्ये

कॉ. किरण गहला (जिल्हा सचिव, CPI(M) ठाणे-पालघर) वन हक्क कायदा: अंमलबजावणी आणि सद्यस्थिती. कॉ. संजय ठाकूर (राज्य समिती सदस्य, AIKS, महाराष्ट्र) जमीन अधिग्रहण प्रक्रिया: इतिहास आणि वर्तमान. कॉ. रामचंद्र म्हात्रे (जिल्हा सचिव, CPI(M) रायगड) प्रकल्प, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा : स्वरूप आणि वास्तव. कॉ. प्राची हातिवलेकर (राज्य सरचिटणीस, अ भा ज म सं, महाराष्ट्र) अन्न सुरक्षा कायदा आणि सरकारची जनता विरोधी भूमिका. कॉ. भरत वळंबा (राज्य समिती सदस्य, CPI(M) महाराष्ट्र) इको सेन्सिटिव्ह झोन - स्वरूप आणि स्थानिकांचे हक्क  या जमिनीसंबंधित सर्व विषयांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. 

या परिषदेचे स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष कॉ. पी. के. लाली यांनी केले, प्रास्ताविक कॉ. डॉ. कविता वरे यांनी केले, सूत्रसंचालन कॉ. दिलीप कराळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन कॉ. दिनेश जाधव यांनी केले.  या परिषदेत जमीन हक्क चळवळीची भूमिका मांडून पुढील काळात ज्या विषयांवर लढा उभारायचा आहे त्या विषयांचे ठराव मांडण्यात आले. परिषदेने सर्व ठराव एकमताने मंजूर केले.  या परिषदेने २५ जणांची अखिल भारतीय किसान सभा, मुरबाड तालुका समिती निवडली. कॉ. दिनेश जाधव यांची अध्यक्षपदी, कॉ. डॉ. कविता वरे यांची सचिवपदी, तर ४ उपाध्यक्ष व ४ सहसचिव निवडण्यात आले, तसेच १५ जण समिती सदस्य म्हणून निवडण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य किसान सभेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "वह सुबह कभी तो आयेगी - गाणी चळवळीची" या आकर्षक आणि आशयपूर्ण पुस्तिकेची महाराष्ट्रातील पहिली विक्री या परिषदेत करण्यात आली.   या परिषदेमध्ये कॉ. डॉ. कविता वरे यांनी जमीन मालकी हक्क विषयावर संशोधन करून भागीदारी तत्त्व संशोधित केले म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दक्षिण ठाणे शहर तालुका समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिकारी घोषणांच्या निनादात परिषदेची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com