Top Post Ad

कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी? याचा विचार तुम्ही करा


प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे  यांनी शिनसेनेत  प्रवेश केला आहे. याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की,  युद्ध सुरू असताना सुषमाताईसह त्यांचे सैनिक शिवसेनेत आलेत. मुद्दाम उल्लेख करतो, नीलमताई या देखील कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या, तरी देखील त्या शिवसेनेत आल्या. पण आता बघा कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी? याचा विचार तुम्ही करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही 3 तास बोलत होतो, विविध विषयांवर बोललो, मला भूक लागली म्हणून मी म्हणालो नंतर भेटू, त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला की मला शिवसेनामध्ये यायचे आहे.पण एका गोष्टीचे कौतुक वाटते की, सुषमाताई आज शिवसेनेत आल्या. शिवसेनेच्या दोन लढाया सुरू आहेत. एक सुप्रीम कोर्टात आहे, त्याबद्दल मला बोलायचे नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपविली. प्रवेश करताच सुषमा अंधारेंना उपनेतेपदाची जबाबदारी मिळताच त्या भावूक झाल्याचे दिसून आले. मात्र एकेकाळी शिवसेनेवर बोचरी टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण सांगितांना अंधारे म्हणाल्या, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचे नाही. तेव्हा मी ठरवलं की, आता शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.  शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती –भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.


सुषमा अंधारे यांचा जन्म कळंब तालुक्यातील पाडोळी जिल्हा उस्मानाबाद येथे झाला आहे. सुषमा अंधारे यांच्या वडिलाचे नाव दत्ताराव गूत्ते असे आहे. त्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमा यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांमध्ये वाद होवू लागले होते. तेव्हा आजोबांनी सुषमाला आपल्याकडे ठेवून घेतले. त्यांनी सुषमाची सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव सुषमा दगडू अंधारे असे, नाव कागदोपत्री नोंदले गेले.

बौद्धधर्माची दीक्षा - सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. महात्मा फुले-शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. अंधारे यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह ’उपरा’कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली आहे. सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र, २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.

परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या. सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशील आहेत. भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत. इ.स. २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्या पराभूत झाल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com