मंत्री असूनही योग्य सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारमधील जलशक्ति खात्याचे राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा दिला आहे. आपण अनुसूचित जातीमधील असल्यानेच आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. तसेच आपला राजीनामा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनला पाठवला आहे. मात्र, सरकार अथवा पक्षाच्या स्तरावर याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. उच्चपदावर जाऊनही, मंत्री होऊनही अनुसूचित जातींच्याबाबत असलेली तथाकथित समाजाची मानसिकता दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खटीक यांनी आपल्या पत्रात म्हटले की, अनुसूचित जातीमधील असल्यानेच विभागात कोणत्याच कामाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्याशिवाय, दिलेल्या आदेशाचे ही पालन होत नसल्याचे ही त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकारी मागासवर्गीयांचा सातत्याने अपमान करत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. माझ्या अखत्यारीत असलेल्या विभागातून चुकीच्या पद्धतीने पैसे उकळण्यात आले. याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.
0 टिप्पण्या