ठामपा अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे एकमेंकावर "अतिक्रमण"


ठाणे  -  ठाणे महानगर पालिके्च्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी आपल्याला ठार मारण्याची तसेच कुटुंबातील सदस्यांना उद्वस्त करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला असल्याची माहिती अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी  शेठ अॅवेलाॅन बिल्डिंग, ज्युपिटर हॉस्पिटल लगत सर्व्हिस रोड येथील आपल्या राहत्या घरासमोरील परिसरात आज २३ जुलै रोजी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

कळवा प्रभाग समिती मधील अनधिकृत बांधकामाबाबत महेश आहेर यांनी समीर जाधव यांना दूरध्वनीवर संपर्क साधून कळवा येथे कारवाई करण्यासाठी पथकासह येत असल्याचे सांगितले. त्यावर समीर जाधव यांनी, तुझे हातपाय तोडून ठार मारेल; तुझ्या कुटुंबालाही संपवून टाकेन, अशी धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराबाबत आपण गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून महेश आहेर म्हणाले की, या धमकीच्या संदर्भात आपण नगरविकास खात्याकडे अहवाल पाठवणार आहोत. 

मात्र या आरोपाचे सहा.आयुक्त समिर जाधव यांनी खंडन केले आहे.  महेश आहेर यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व तत्थ्यहीन असून, उलटपक्षी त्यांनी दि. २२ जुलै रोजी रात्री ९:४० च्या दरम्यान दारूच्या नशेत मला व्हाटसऍप द्वारे कॉल करून घाबरवण्याच्या हेतूने धमकी दिली. तेव्हा मी फोन ठेवा असे सांगून फोन ठेवला. मात्र त्यांनी आज सकाळी  मीडिया समोर माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने हा प्रकार केला असल्याचा आरोप जाधव यांनी केला. 

आहेर यांचे काही वैयक्तिक तथाकथित इंटरेस्ट असून कायम प्रकाश झोतात राहण्याच्या उद्देशाने ते प्रेरित आहेत या पूर्वीही त्यांनी असेच खोटेनाटे आरोप करून अनेक लोकांना त्रास दिला असून स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या सारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमी कमीपणा दाखवून धमकावण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी पोलिसांत दाखल केलेली तक्रार ही मुळात दखलपात्र नाही. ठाणेकर नागरिक सूज्ञ असून कोण दुसऱ्याना धमकी देण्यात पटाईत आहे हे पूर्वइतिहास तपासल्यास सिद्ध होते. असे समीर जाधव यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महेश आहेर यांची ठाणे महानगर पालिकेतील कारकिर्द नेहमीच वादळी राहिलेली आहे. ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्तपदी असताना महेश आहेर यांनी डॉ. सुनील मोरे यांच्यावर  गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. सहकाऱ्यांकडून भ्रष्ट्राचार केला जात असल्याची खोटी माहिती अ़ँटिकरप्शन अधिकाऱ्यांना पुरवून अनेक अधिकाऱ्यांना गोत्यात आणले असल्याची चर्चा त्यावेळी ठाण्यात रंगली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे  यांनी मालमत्ता विभागात अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने संजय हेरवाडे यांच्यासमक्ष  सुनावणी झाली.  आहेर यांच्या शैक्षणिक पुराव्यांसह, देण्यात आलेल्या पदोन्नत्या, विहित कालावधीपेक्षा अधिक काळाचे प्रभारीपद, बोगस ताबापत्रांच्या बाबतीत झालेल्या सह्या , बीएसयूपीच्या घरांचा घोटाळा, अनधिकृत बांधकामे, त्यांची संपत्ती, अतिरिक्त पोलीस संरक्षण आदी कागदोपत्री माहिती परांजपे यांनी सादर केली. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट महेश आहेर यांना पदोन्नती देण्यात आली.

शाहू मार्केट प्रभागात कर विभागात कार्यरत असताना त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई झाली. 4/9/2000 मध्ये निलंबीतही करण्यात आले होते. 23/4/2001 रोजी त्यांचे निलंबन तात्पुरते मागे घेऊन वाडिया रुग्णालयात कामावर रुजू करुन घेण्यात आले. 

ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठामपा गटनेते विक्रांत चव्हाण यांना अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठविल्यामुळेच ही धमकी आली असून ज्याठिकाणी धमकी देण्यात आली त्या ठिकाणी ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हेही स्वत: उपस्थित होते, असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला होता. यासंदर्भात चव्हाण यांनी पोलीस आयुक्त तसेच पालिका आयुक्तांची भेट घेऊन आहेर यांच्या चौकशीची मागणी केली होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA