Top Post Ad

कोल्हापूरच्या ऐतिहासिक सत्य सुधारक हॉटेलची शताब्दी


राजर्षि शाहू महाराजानी गंगाराम कांबळेला बांधून दिलेले सत्यसुधारक हॉटेलची शताब्दी

राजर्षी शाहू महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील महत्त्वाचे काम म्हणून त्यांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेल्या सत्यसुधारक हॉटेलच्या ऐतिहासिक घटनेकडे पाहिले जाते. या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

गंगाराम कांबळे यांच्या स्मृतिस्तंभाच्या नूतनीकरणाची मागणी- मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील महत्त्वाचे काम म्हणून त्यांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेल्या सत्यसुधारक हॉटेलच्या ऐतिहासिक घटनेकडे पाहिले जाते. या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाऊसिंगजी रोड येथील स्मृतिस्तंभाचे नूतनीकरण व्हावे तसेच शाहू स्मारक भवन येथे ‘सत्यसुधारक हॉटेल’ या नावाने हॉटेल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवरणासाठी कायदे करण्याबरोबरच प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घेतले. अस्पृश्यतेचा प्रचंड पगडा असलेल्या त्या काळात एका राजाने तत्कालीन महार समाजातील व्यक्तीला हॉटेल सुरू करून द्यायचे, तेथे स्वत: चहापान करायचे ही घटना प्रस्थापित परंपरेला धक्का देणारी होती. भाई माधवराव बागल यांच्या ‘शाहू महाराजांच्या आठवणी’ या पुस्तकात गंगाराम कांबळे यांच्या शब्दांतच ही घटना सविस्तर देण्यात आली आहे. मोतद्दार असलेल्या कांबळे यांना बावडा बंगल्यातील हौदावरील पाणी प्याले म्हणून बेदम मारहाण झाली. महाराज कोल्हापुरात आल्यानंतर कांबळे यांनी सोनतळीत त्यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. शाहू महाराजांनी संबंधितांना शिक्षा केली. तसेच कांबळे यांना व्यवसाय सुरू करण्याची सूचनाही केली. त्यानंतर सत्यशोधक बाबूराव यादव यांनी त्या काळात राजमार्ग असलेल्या भाऊसिंगजी रोडवर गंगाराम कांबळे यांच्या ‘सत्यसुधारक हॉटेल’साठी जागा दिली. महाराज नित्यनेमाने या हॉटेलला भेट देऊन ‘फक्कड’ चहा करण्याची सूचना देत, त्यांच्यासोबत आलेल्या सरदार आणि जहागीरदारांनाही त्यांच्यासोबत चहा घ्यावा लागे. महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सोडावॉटरचे मशिन घेऊन दिल्याची नोंदही आहे. शाहू महाराजांच्या निधनांतर त्यांचे पहिले स्मारक उभारण्याचा मानही गंगाराम कांबळे यांनाच जातो.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘त्या काळात अस्पृश्य व्यक्तीच्या हातून ‌ राजर्षि शाहू महाराजांनी चहा घेणे ही बाब अतिशय महत्त्वाची आणि अस्पृश्यता निवारणात महत्त्वाची ठरली. या घटनेची नोंद घेत सत्यसुधारक हॉटेलच्या जागेवर सध्याच्या स्मारकाची पुनर्बांधणी करावी. तसेच शाहू स्मारक भवनातील एका हॉटेलला सत्यसुधारक हॉटेल असे नाव देणे योग्य ठरेल.’ ही घटना सामाजिक परिवर्तनाचे चक्र फिरवणारी असल्याचे कांबळे यांचे नातू अरूण कांबळे यांनी सांगितले.

गंगाराम कांबळे यांच्या सध्याच्या स्मारकावर हॉटेल १९१६ ला सुरू झाल्याची नोंद आहे. पण अरूण कांबळे यांनी ही घटना १९२४ ची असावी असे सांगितले. ‘आमच्याकडे हॉटेलमधील वापरातील किटली होती. त्यावर १९२४ अशी नोंद होती,’ असे ते म्हणाले. कृ. गो. सूर्यवंशी यांच्या ‘राजर्षी शाहू राजा व माणूस’ या ग्रंथात केशव पाटील यांच्या मिश्रभोजन गृह आणि गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेल यांचा ‘शिवाशिव पाळण्याचा १९१६ चा तो काळ’ असा उल्लेख आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com