Top Post Ad

पालकमंत्र्यांना 'घबाड' पोहोचवताना जळगावच्या अभियंत्याचा अपघाती मृत्यु

उप अभियंता सुभाष राऊत यांच्या गैरकारभाराकडे डोळेझाक


मुंबई :  जळगाव जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता जितेंद्र कडू महाजन यांचा पाळधी येथे त्यांच्या स्कुटरला ट्रकने धडक दिल्याने ६ मे रोजी रात्री ९ वाजता अपघाती मृत्यु ओढवला. महाविकास आघाडी सरकारच्या जिल्हा पालकमंत्र्यांना पाच लाख रूपयांचे "घबाड" तातडीने पोहोचवण्याची उप अभियंता सुभाष राऊत यांनी टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना महाजन यांचा हकनाक बळी गेला असल्याचा आरोप होत आहे. याबाबत राज्याचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेल्या निवेदनात या प्रकरणाची सविस्तर माहिती बहुजन संग्राम या संघटनेने दिली आहे.

वादग्रस्त उप अभियंता सुभाष राऊत यांना मुदतवाढ देऊन आपल्या मतदारसंघातच कायम ठेवावे, असा आग्रह धरणारे पत्र जळगावच्या पालकमंत्र्यांनी ५ मे रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. त्यानंतर राऊत यांनी लगेचच शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांना ५ लाख रुपये पालकमंत्र्यांना दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ मे रोजी   पोहचवण्यास सांगितले.  राऊत यांच्या मुदतवाढीसाठी पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाठवलेले पत्र उपलब्ध झाले आहे. आपल्या जिल्हा पालकमंत्र्यांना पाच लाख रूपयांची व्यवस्था करून आजच पोहोचते करा. उशीर झाला, रात्र झाली अशी सबब पुढे करून हे काम उद्यावर टाकू नका', असा सज्जड दमच उपअभियंता सुभाष राऊत यांनी महाजन यांना मोबाईल वरून दिला होता, असे महाजन यांच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे.

पाच लाख रूपयांची व्यवस्था करून ती रक्कम पालक मंत्र्यांना देण्याच्या मोहीमेवर महाजन यांना उप अभियंत्यांनी तातडीने जाण्यास सांगितले. अत्यंत घाईगडबडीत जात असतानाच त्यांचा अपघात झाला.  अपघातानंतर बांभोरी येथील स्थानिक रहिवाशांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाजन यांना मयत घोषित केले. त्यावेळी त्यांच्या जवळ अपघात स्थळी सापडलेली पावणे दोन लाखांची रक्कम रहिवाशांनी त्यांच्या पत्नीकडे सोपवली आहे,  महाजन यांच्या मृत्यूची पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करून हे प्रकरण दडपण्यात आले आहे,  या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच उप अभियंता सुभाष राऊत यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उप अभियंता सुभाष राऊत यांचा पालकमंत्र्यांसाठी पाच लाखांची तजविज करण्यासाठीचा दबाव आणि सक्तीमुळे शाखा अभियंता जितेंद्र महाजन हे प्रचंड ताण-तणावाखाली होते. तशाच अवस्थेत ते घराबाहेर पडून स्कुटरवरून पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी निघून गेले होते, अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांनी सांत्वनासाठी गेलेल्या महाजन यांच्या अधिकारी मित्रांना दिली आहे. तर, 'माझ्या वडिलांचा हकनाक बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्यांचा नरडीचा घोट घेईन', असे संतप्त उद्गार अंत्यसंस्कारावेळी जितेंद्र महाजन यांच्या मुलाने काढले, याबाबतची माहिती महाजन कुटूंबाच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेले उप अभियंता सुभाष राऊत हे बदलीशिवाय तब्बल पाच वर्षे जळगाव उपविभागात तळ ठोकून आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगावच्या अधीक्षक अभियंत्याच्या सरकारी निवासस्थानाचे नुतनीकरण यापूर्वी कधीच करण्यात आले नव्हते. पण त्या पदावर श्रीमती रूपा राऊळ गिरासे या आल्यानंतर सुभाष राऊत यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या बंगल्याचे नुतनीकरण हाती घेवून त्यावर सुमारे ३० लाखांचा खर्च केला आहे. त्याद्वारे महिला अधीक्षक अभियंत्यांना अंकीत केल्यामुळे त्या सुभाष राऊत यांच्या गैरकारभाराकडे डोळेझाक करत असल्याचे येथील कर्मचारी वर्ग आणि त्रस्त कंत्राटदारांचे म्हणणे आहे. सुभाष राऊत हे त्यांच्या कार्यालया ऐवजी जळगावच्या 'अजिंठा' या शासकिय विश्रामगृहात बस्तान ठोकुन कामकाज करतात, अशी तक्रारही चिलगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com