मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई केल्यास रोज २ दोन टक्के व्याज... ठामपाची सावकारी वसुली


महागाईच्या झळांनी सर्वसामान्य जनता अक्षरशः पोळून निघत आहे. सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा या विपरीत परिस्थितीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी जवळपास ३५ टक्के मालमत्ता कर माफी देत असल्याचा गाजावाजा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केला. मालमत्ता करात ठाणेकरांना मोठा दिलासा दिला असल्याचे सांगण्यात येत असले तरी ठाणे महानगर पालिका हा कर मागच्या दाराने सर्वसामान्य नागरिकांकडूनच वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मालमत्ता कर भरण्यास दिरंगाई करणाऱ्या ठाणेकरांना आता दर दिवशी दोन टक्के दराने व्याज आकारणी करून ठाणे महानगर पालिका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातूनच ही तूट भरून काढत आहे. एका ठाणेकर दक्ष नागरिकांने याबाबतची पुराव्यासह माहिती दिली आहे.  २ हजार ८२७ अशी एकूण रक्कमेचे मालमत्ता देयक ठाणे महानगर पालिकेने दिले. ते देयक भरण्यास ठाण्यातील कळवा प्रभाग समितीमध्ये गेले असता ३ हजार ६११ अशी रक्कम भरण्यास कर लिपीकाने सांगितले. याबाबत कर लिपिकाला विचारले असता आम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला ही रक्कम भरावीच लागेल .तुम्ही कर देयक भरण्यास उशीर केला असल्याने त्यावर व्याजाची रक्कम अधिक झाली आहे.  ही रक्कम मुळ करदेयकात नमूद करण्यात आलेली नाही. मात्र प्रत्यक्षात कर देयक भरण्यास गेले असता संगणकावर मिळणाऱ्या बीलात ही रक्कम जमा करण्यात येते.

प्रत्येक दिवशी दोन टक्के या दराने दिरंगाईबाबत ही रक्कम वाढली आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता आम्हाला वरून तसे आदेश आहेत. असे सांगण्यात आले.  दर दिवशी दोन टक्के दिरंगाई आकाराबाबत काही अध्यादेश आहेत का? याबाबत मात्र अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. अशा तऱ्हेने ठाणे महानगर पालिका सावकारापेक्षाही अधिक दिरंगाईच्या नावाखाली व्याज वसूल करीत असल्याचा आरोप रेहमान चेऊलकर यांनी केला आहे.  याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास अधिकारी वर्ग टाळाटाळ करीत आहेत.

 काही चाळीमध्ये दीड हजारांचा मालमत्ता कर आता एक हजार रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. मालमत्ता करामध्ये मिळालेल्या या सरासरी ३५ टक्क्यांच्या कपातीचा लाभ लाखो ठाणेकर कुटुंबांना मिळणार असल्याच्या वल्गना सत्ताधारी करत असतानाच या दिरंगाईचे अतिरिक्त व्याजाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.  त्यातच शहरात १०० टक्के कर वसुली करण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुली गंभीरपणे करण्याचे आदेश देतानाच २ लाखावरील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे कडक आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिका-यांना आणि विभागप्रमुखांना दिले असल्याने सर्वसामान्य ठाणेकर हवालदील झाले आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या