ठाणे - हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अत्यंत अद्ययावत अशा या वैद्यकीय उपकरणांमुळे रोगनिदानाची अचूकता वाढणार. तसेच, या महागड्या वैद्यकीय सेवा गरीब रुग्णांना अत्यल्प दरात मिळतील अशी आशा गरीब रुग्णांना दाखवण्यात आली. मात्र ही सेवा आता गरीब रुग्णांना परवडणारी नाही तर त्यांची लूट करणारी ठरत असल्याचे तक्रार रुग्णांकडून करण्यात येत आहे. ठाणे महानगर पालिकेच्या अत्यंत ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांची या सेवेच्या नावाखाली लूट होत असल्याचेही येथे येणारे सर्वसामान्य रग्ण म्हणत आहेत.
रुग्णालयात तळ मजल्यावर रेडिऑलॉजी विभागाच्या बाजूलाच एमआरआय आणि सिटी स्कॅन कक्ष आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे असून अशा प्रकारची ठाण्यातली पहिलीच उपकरणे असल्याचा दावा पालिका करीत आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या अत्यल्प शुल्क आकारणीत रुग्णांना ही सेवा उपलब्ध होत नसल्याने येथे येणारे रुग्ण हवालदील झाले आहेत. ठाणे महानगर पालिकेने तात्काळ याबाबत पावले उचलावीत आणि या सेवांचे दर निश्चित करून दर्शनी भागावर याचा दरफलक लावावा. सीटी स्कॅन एमआरए बाबत प्रत्यक्षात डायग्नोस्टिक्स सेंटर रुग्णांना अधिक रकमेची पावती देत आहेत. सदर डायग्नोस्टिक्स सेंटर यांनी दर्शनी भागात दरफलक न लावल्यामुळे गोंधळ जनतेला कळतच नाही. तरी महानगर पालिकेतर्फे दर वाढवलेले असल्यास तसे फलक सर्व दर्शनी भागात लावण्यात यावेत, तसेच यात काही तफावत अथवा सदर दर संदर्भात काही घोळ आढळल्यास सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी वैद्यकिय अधिक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या