Top Post Ad

भारतरत्न नव्हे तर " विश्वरत्न " डॉ.बाबासाहेब आंबेडकर


एखाद्या महनीय व्यक्तीला समाजहितैषी रचनात्मक कार्यार्थ संस्था,समाज किंवा सरकार कडून विशिष्ट पदवी,पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.भारत सरकार कडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे-भारतरत्न होय.ज्ञान-विज्ञान,कला-वाङमय,सेवा या क्षेत्रासाठी १९५४ पासून हा पुरस्कार दिला जातो.भारतीय संविधानाचे निर्माते आणि जागतिक स्तरावरील महान नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १९९० साली मरणोपरांत तत्कालीन व्ही.पी.सिंग सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन बाबासाहेबां प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.या बाबतीत आंबेडकरी विचारवंतात,समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.आजकाल या पुरस्कारा योग्य कार्य न केलेल्या व्यक्तींनाही हा पुरस्कार खिरापती सारखा दिल्यामुळे या पुरस्काराचे प्रचंड अवमूल्यन झाले आहे.त्यास्तव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो-करोडों भारतीयांच्या जीवनात निरंतर आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या विश्वस्तरीय,विश्वव्यापी कार्यास्तव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ऐवजी विश्वरत्न या सन्मानाने संबोधने समर्पक ठरते.

        डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे जन्मापासून जीवनांता पर्यंत संघर्षशील,आदर्श जीवन जगले.त्यांनी आपल्या अखंड विद्याभ्यासी अध्ययनवृत्तीने एम.ए.(कोलंबिया),पी.एच.डी.(कोलंबिया),डी.एस.सी.(लंडन),एल.एल.डी.(कोलंबिया),डी.लिट.(उस्मानिया),बार-ऍट-लॉ(लंडन)या जगातील गणमान्य पदव्या अल्पावधीत प्राप्त केल्या.अस्पृश्यांना संघटित करण्यासाठी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकरिणी सभा आणि मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यां मध्ये आत्मसन्मानाची ज्योत जागविली.त्यांनी २५ डिसेंबर १९२७ ला उच्चवर्णीयांचे वर्चस्व कायम राखणारी आणि निम्न जातींना जनावरांसमान हाल-अपेष्टा जगावयास लावणाऱ्या मनुस्मृतीचे जाहीर दहन केले.डॉ.आंबेडकरांनी १९३० साली नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला.त्यांनी गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे नेते म्हणून असामान्य कर्तृत्व गाजवून विभक्त मतदारसंघ मिळविले.परंतु महात्मा गांधींच्या प्राणरक्षणार्थ संपूर्ण देशहिताचा विचार करता आपल्या बांधवांच्या कल्याणाची आहुती दिली.डॉ.आंबेडकरांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर स्त्रिया,कामगार,शेतकरी-शेतमजूर,बालमजूर,अन्य मागासवर्गीय,भटक्या जाती-जमाती या सर्वांसोबत सर्व भारतीयांसाठी कार्य केले. 

त्यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी राजकीय क्षेत्रात स्वतंत्र मजूर पक्षाची,१९ जुलै १९४२ ला अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली.१९५५-५६ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची उभारणी केली.धार्मिक संस्था म्हणून ४ मे १९५५ ला डॉ.आंबेडकरां द्वारा स्थापित द बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाने विश्वस्तरीय कार्य केले आहे,करत आहे.८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी लाखों-करोडों भारतीयांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणले आहे.एवढेच नव्हे तर मूकनायक, बहिष्कृत भारत,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वृत्तपत्रे चालवून मागासवर्गीयांचा स्वसन्मान जागवून आपल्या झुंजार पत्रकारितेचा अमीट ठसा उमटविला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परीश्रमपूर्वक भारतीय संविधान लिहिले.त्यामुळे भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून ते सार्थ ठरतात.डॉ.आंबेडकरांद्वारा लिखित संविधानानुसारच आज हया संपूर्ण भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालतो आहे.आज बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश एकात्म,अखंड राहून जगातील सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी राष्ट्र बनले आहे.त्यांचे जलनीती,कुटुंब कल्याण विषयक धोरण,शैक्षणिक धोरण,परराष्ट्र विषयक धोरण,कामगार विषयक धोरण,शेती विषयक नियोजन,संरक्षण विषयक नियोजन आजही दूरदृष्टीचे, प्रासंगिक ठरते.

१४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखों अनुयायांसह केलेले धर्मांतर एक ऐतिहासिक जागतिक घटना होय.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या रक्तविरहीत धम्मक्रांतीने २५०० वर्षा नंतर तथागतांच्या भूमीत बौद्ध धम्म पुनर्स्थापित  केला.बाबासाहेबांच्या या विश्वव्यापी कार्यास तोड नाही.आज डॉ.आंबेडकरांना जपान,चीन,कोरिया, म्यानमार,थायलंड, इंडोनेशिया,भूतान,श्रीलंका,मलेशिया या सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धांच्या भूमीत बौद्ध धम्म पुनर्स्थापित करणारा एक महान धम्म प्रसारक म्हणून सर्वमान्यता आहे.बाबासाहेबांनी धार्मिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आंदोलना सोबत आपल्यातील एक प्रतिभावंत विद्वान लेखक,ग्रंथकार जागृत ठेवला.त्यांनी अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडून जगातील अर्थतज्ज्ञात आपले नाव समाविष्ट केले.स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री,मजूर मंत्री म्हणून ऐतिहासिक कार्य केले.बुद्धा अँड हिज धम्मा,हू वेअर शूद्रा,द प्रॉब्लेम ऑफ रुपी,पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया,अनहिलीएशन ऑफ कास्ट,स्टेट अँड मिनोरिटीज,व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन फॉर अनटचेबल,द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन, रिडल्स इन हिंदूजम,रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन या सारखे अनेक विद्ववत्ता प्रचुर ग्रंथ लिहून आपल्या अलौकीक बुद्धिमत्तेचा परिचय दिला.

उपरोक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महनीय कार्यासमोर भारतरत्न यादीतील व्यक्तींचे कार्य अगदीच नगण्य आहे.सामान्य जनतेसाठी कोणतेही रचनात्मक कार्य न करणाऱ्या व्यक्तींना हा सर्वोच्च पुरस्कार देऊन या पुरस्काराच्या सन्मानास अवनती आणलेली आहे.सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांनी त्यांना दिलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सरकारला परत केला आहे.उल्लेखनीय आहे की महात्मा गांधींना या पुरस्कारापेक्षा उच्च मानून त्यांना आता पर्यंत हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला नाही.महात्मा गांधींना जर राष्ट्रपिता म्हटले जाते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न संबोधले जावे.या पुरस्काराचे अवमूल्यन करणारा आणखी एक प्रकार म्हणजे सचिन तेंडुलकर नामक क्रिकेट खेळणाऱ्या अस्सल व्यावसायिक खेळाडूला भारतरत्न देण्यासाठी चक्क या पुरस्काराच्या निकषातच २०१५ साली बदल करण्यात आले.

            एकंदर सर्व बाबींचे सिंहावलोकन करता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ऐवजी विश्वरत्न संबोधनाने संबोधने सयुक्तिक राहील.

यासाठी....

  • विविध धार्मिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न संबोधनानेच संबोधावे.
  • समस्त लेखक,साहित्यिक,व्याख्याते यांनी आपल्या साहित्यात,भाषणात  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव अगोदर  भारतरत्न ऐवजी विश्वरत्न असे लिहावे,संबोधावे.
  • विविध कार्यक्रमाची पत्रके,डिजिटल बॅनर,विविध वास्तू, कमानी,वृत्तपत्रीय लिखाण यात बाबासाहेबांचा उल्लेख आवर्जून विश्वरत्न असाच करावा.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा यत्र-तत्र-सर्वत्र जिथे-जिथे उल्लेख होतो तिथे-तिथे भारतरत्न ऐवजी विश्वरत्न हेच संबोधन प्रकर्षाने वापरावे.

    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लाखों-करोडों भारतीयांचे नेते,भारतीय संविधानाचे निर्माते,धार्मिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक ,आर्थिक क्षेत्रात कार्य करणारा एक यशस्वी नेता,जगातील एक महत्वपूर्ण अर्थतज्ज्ञ, झुंजार पत्रकार,सर्व भारतीयांच्या कल्याणासाठी झटणारा एक सच्चा भारतीय,एक यशस्वी समाज क्रांतिकारक,जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीचा प्रणेता,२५०० वर्षानंतर बुद्धांच्या भूमीत बौद्ध धम्म पुनरुज्जीवित करणारा धम्म प्रसारक, एक जहाल अभ्यासू वक्ता,एक जागतिक विद्वजन ही न संपणारी विश्वव्यापी कार्ययादी आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान विश्वस्तरीय,विश्वव्यापी कार्यास्तव त्यांना भारतरत्न पुरतेच मर्यादित न ठेवता विश्वरत्न या समर्पक उपाधीने संबोधित करणे संयुक्तिक ठरते.

उज्वलकुमार भारतीय    औरंगाबाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com