ब्राह्मणी विचार हा विषमतेवर उच्चनिचतेवर, स्वर्ग, नरक, आत्मा, पूर्वजन्म, पूर्वजन्म यावर आधारलेला आहे,की जो शोषण करणारा आहे. याला विरोध करणारा समतावादी, विवेकवादी, बुद्धीप्रामाण्यवादी विचार चार्वाक, महावीर आणि बुद्धाने दिला की ज्यामुळे भारतात राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक, तात्विक क्षेत्रात आमूलाग्र क्रान्ती झाली. याला विरोध करण्यासाठी ब्राह्मणांनी ब्राम्हणी आचार-विचाराच्या संहिता स्मृती रुपाने संकलन करणे सुरु केले. त्याचाच एक भाग म्हणून ईसपू 2 ऱ्या शतकात मनुस्मृती आणली आणि परत विषमता, कर्मकांड, माहिलाअत्याचार, अस्पृश्यता मोठया प्रमाणात आली. शंकराचार्यानी ब्राह्मणी धर्माचे पुनरुज्जीवन केले. मध्ययुगात ब्राह्मणी (श्रौत-स्मार्तावर आधारलेला) धर्माविरोधात नाथ सांप्रदाय, महानुभवपंथ, वारकरी पंथ, शैव, शाक्त, लिंगायत धर्म इत्यादींनी मोठा लढा दिला. ढोबळमानाने हा आहे आपल्या देशातील धार्मिक संघर्ष!
हिंदुधर्म म्हणजे काय? - ब्राह्मणी (श्रुती व स्मृतीवर आधारलेला) धर्म, वारकरी पंथ, महानुभाव पंथ, नाथ पंथ, लिंगायत, शैव पंथ, शाक्त संप्रदाय, वैष्णव या सर्वांना मिळून हिंदू धर्म असे म्हटले जाते. त्यामध्ये आस्तिक-नास्तिक देखील आले. म्हणजे जी आपण आपली हिंदू परंपरा म्हणतो त्यात तत्वज्ञानाच्या पातळीवर खूप अंतर्विरोध आहेत. त्यामुळेच ज्ञानपीठकार डॉ भालचंद्र नेमाडे हिंदूला "हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" असे म्हणतात. ज्या संत ज्ञानदेवांच्या बाबत हिंदुत्ववादी तावातावाने बोलत असतात, ते संत ज्ञानदेव मूळ नाथ सांप्रदयातून आलेले होते. संत तुकाराम महाराज हे वारकरी सांप्रदयाचा कळस होते. तर संत नामदेव भारतभ्रमण करून पंजाबातील घुमान येथे स्थिरावले होते. त्यांचे अभंग शीख धर्माच्या "गुरुग्रंथसाहेब" या पवित्र धर्मग्रंथात आहेत. शीख हे संत नामदेवांना परके समजत नाहीत. संत कबीर, रोहिदास, चोखामहाराज, बसवेश्वर, तुकाराम महाराज यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून वैचारिक हल्ला केलेला आहे.
शंकर, विठ्ठल, जोतिबा, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा, वेताळ, इत्यादी हे लोकदेव आहेत. तसे वराह, वामन, परशुराम, नृसिंह इ हे लोकदेव नाहीत (अलौकीक आहेत- म्हणजे या लोकीचे नाहीत, थोडक्यात परके). याचा अर्थ हिंदू ही अशी एक स्वतंत्र आयडिओलॉजी नाही, तर ब्राह्मणी आणि अब्राह्मणी परंपरेला हिंदू ही उपाधी दिली गेलेली आहे. शैव, शाक्त, वैष्णव, नाथ, महानुभाव, वारकरी, लिंगायत आणि ब्राह्मणी विचारधारेला एकाच चौकटीत कोंबणे म्हणजे हिंदुधर्म होय. ज्या विचारधारेत वैचारिक मतभिन्नता आहे, विषमता आहे त्यांना एका चौकटीत कोंबून त्यांचे एक राष्ट्र करणे आणि तसे स्वप्न पाहणे, हा एक तर मूर्खपणाच ठरेल, नाहीतर समाजामध्ये शोषण निर्माण करेल. महात्मा फुले म्हणतात एकमय समाज म्हणजे राष्ट्र होय. हिंदुअंतर्गत सामाजिक, वैचारिक आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर इतकी विषमता आहे की, एकमय समाजाचे राष्ट्र हे एक दिवास्वप्न आहे.
आपले विचार मान्य नसणाराना मारणे हे धार्मिक कार्य नव्हे, तर दहशतवादी कार्य
आपले विचार मान्य नसणाराना मारून टाका, असे हिंदू परंपरा सांगत नाही, प्राचीन काळापासून खूप वैचारिक मतभेद झालेले आहेत, पण विचारवंतांनी/संतांनी त्यांना वैचारिक पद्धतीनेच लढा दिलेला आहे. त्यांनी कधी शस्त्र हाती घेतले नाही. जे शस्त्राची भाषा बोलतात आणि करतात ते दहशतवादीच असतात. संत चक्रधर, संत तुकाराम इत्यादी संतांची हत्या करणारी परंपरा ब्राह्मणी/सनातनी परंपरा आहे, हिंदू नव्हे.
सनातन्यांचे हिंदुत्व, द्वेषावर आधारलेले
सनातन्यांचे हिंदुत्व, हिंदुअंतर्गत जातीतील बहुजनांच्या विकासावर आधारलेले नाही. तर, मुस्लिमद्वेषावर आधारलेले आहे. मुस्लिमांची भीती दाखवायची आणि हिंदूंचे धार्मिक, राजकीय, आर्थिक शोषण करायचे. इतिहासाची मोडतोड करून तरुणांना दहशतवादी बनविले जात आहे. शिवाजीराजे-संभाजीराजे यांची लढाई मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज आणि ब्राह्मण यांच्याविरुद्ध होती. पण मोगल आदिलशहा, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध राजकीय तर ब्राह्मणाविरुद्ध धार्मिक होती. असे शरद पाटील सांगतात. शिवाजीराजे जसे संत तुकाराम, मौनीबाबा यांच्या भेटीला जात तसे ते केळशीच्या बाबा याकुत यांच्याही भेटीला जात. शिवरायांनी त्यांना जमीन इनाम दिलेली आहे. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे हे शहाशरीफ या सुफी संताच्या भेटीला जात. आज देखील सुफी संताबद्धल(पीर)हिंदूंमध्ये नितांत आदर आहे.
शिवाजीराजे जर हिंदुत्वासाठी लढत होते तर अफजलखानाचा कैवार घेऊन कृष्णा कुलकर्णीने शिवरायांवर तलवारीचा वार का केला?.सनातन्यांनी शिवाजीराज्यांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?.सनातन्यांनी संभाजीराजाना का छळले?त्यांची बदनामी का केली?त्यांची हत्या सनातनी धर्मानुसार का करण्यात आली?तुकारामांची गाथा इंद्रायणीत कोणी बुडवली?शाहू महाराजांना वेदोक्त मंत्रपठण कोणी नाकारले?महात्मा फुले यांना लग्नमंडपातून कोणी हाकलले?सावित्रीबाईंच्या अंगावर शेण चिखल कोणी मारले? याचे उत्तर आहे सनातनी.सनातनी हे बहुजनांचे हिंदूंचे खरे शत्रू आहेत.ते धार्मिक विद्वेष निर्माण करून ध्रुवीकरण करत आहेत.
आपण जी जिलेबी खातो ती सिरियातून भारतात आलेली आहे. उपवासासाठी खाल्ले जाणारे बहुतेक पदार्थ बटाटा, रताळे, शेंगदाणे, खजूर, शाबुदाना इत्यादी हे पोर्तुगीज आणि मोगल यांनी भारतात आणलेले पदार्थ आहेत, असे डॉ. नेमाडे सांगतात. मुस्लिमांची जिलेबी म्हणून आपण ती वर्ज्य करत नाही. मुस्लिम राष्ट्रातून डिझेल-पेट्रोल आले म्हणून आपण वाहनांचा त्याग करत नाही.
इसिस,तालिबानी,नक्षलवाद्याप्रमाणेच सनातनी दहशतवाद
ज्याप्रमाणे इसिस, तालिबानी, नक्षलवादी हातात शस्त्र घेऊन माणसं मारतात, बाँबस्फोट घडवून दहशत निर्माण करतात, त्याप्रमाणेच सनातनी दहशतवाद करत आहेत. गडकरी रंगायतन, मडगाव बॉम्बस्फोट इत्यादी ठिकाणचे संशयित दहशतवादी सनातनीच आहेत. नालासोपारा या ठिकाणी बॉम्बसाठ्यासह सापडलेला वैभव हा सनातनी अतिरेकी आहे. डॉ दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे संशयित मारेकरी अमोल काळे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, समीर गायकवाड,डॉ. वीरेंद्र तावडे हे दहशतवादी सनातनी आहेत. हे साधक नसून आतंकवादी आहेत. ज्याप्रमाणे इसिस, तालिबानी दहशतवादी त्यांच्या देशातील सुधारणावाद्यांना मारतात. नक्षलवादी बंदुकीने आणि बॉम्बस्फोटाने लोकांना मारतात. त्याप्रमाणे सनातनीदेखील बॉम्बस्फोट आणि सुधारणावाद्यांच्या हत्या करतात.
सनातन्यांनी हिंदूंनाच मारले
मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन हे शत्रू हे सनातन्यांचे बहाणे आहेत. खरे तर, त्यांना हिंदुतील सुधारणावादी मारायचे असतात, आणि शोषणाची उतरंड जीवंत ठेवायची असते. डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश हे सर्व सुधारणावादी हिंदूच होते. हिंदूं सुधारणावाद्यांना मारणारे आतंकवादी हिंदूंचे मित्र की शत्रू?याचा सुज्ञ हिंदूंनी विचार करावा. सनातनी खोटा इतिहास सांगून हिंदुतील सहिष्णुता नष्ट करत आहेत. हिंदूंना हे बदनाम करत आहेत. हिंदूंच्या हत्या करून हिंदूंचा आत्मघात करत आहेत.
सुधारणावाद्यांना मारून नवनिर्मिती कशी करणार?
ज्याप्रमाणे युरोपमधील सुधारणावाद्यांनी (रेनेसाँ) तेथे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात क्रान्ती केली. त्याप्रमाणे भारतातील बुद्ध, फुले, राजाराम मोहन रॉय, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात क्रान्ती केली. विचारवंत, अभ्यासक, सुधारक हे समाजाला, धर्माला पुढे घेऊन जात असतात. ती धर्माची दौलत असते. नवीन आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते, त्यांना मारून नवीन ज्ञानाची निर्मिती कोण करणार? महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांना मारले असते तर शिक्षण मिळाले नसते, शाहूंना मारले असते तर आरक्षण मिळाले नसते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मारले असते तर समतावादी संविधान मिळाले नसते.
हिंदुराष्ट्र म्हणजे काय?
हिंदुराष्ट्र म्हणजे मराठा, माळी, धनगर, सोनार, कासार, तेली, शिंपी, न्हावी, जाट, पटेल, यादव, राजपूत, पटेल, आगरी, वंजारी, सुतार, कुंभार इत्यादींच्या हिताचे राष्ट्र नव्हे, तर ब्राह्मणी हिताचे राष्ट्र होय. ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली सर्व जातींनी गुलामाप्रमाणे राहणे म्हणजे हिंदुराष्ट्र होय. वर्णव्यवस्था म्हणजे हिंदुराष्ट्र होय. जातीव्यवस्थेतील शोषणाची उतरंड म्हणजे हिंदुराष्ट्र होय.पेशवाई आणणे म्हणजे हिंदुराष्ट्र होय. एससी एसटीच्या गळ्यात गाडग, कमरेला झाडू म्हणजे हिंदुराष्ट्र होय. ब्राह्मणासह सर्व जातींच्या महिलांचे शोषण म्हणजे हिंदुराष्ट्र होय. शेतकऱयांनी फक्त कष्ट म्हणजे हिंदुराष्ट्र होय. संविधान रद्द करून मनुस्मृतीची अंमलबजावणी म्हणजे हिंदुराष्ट्र होय. बहुजनांचे शिक्षण बंद म्हणजे हिंदुराष्ट्र होय. असे ब्राह्मणी वर्चस्वाचे हिंदुराष्ट्र संघाला (आरएसएस)आणायचे आहे. पण सुधारणावादी विचारवंत हे होऊ देणार नाहीत. हा अडथळा दूर केल्याशिवाय म्हणजे त्यांना मारल्याशिवाय ते येणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी अशा विचारांच्या सनातन्यांवर येते.
सनातन संस्था एकटी आरोपी नाही
आतापर्यंत जेवढे संशयित अंतिरेकी सापडलेले आहेत त्यातील शरद कळसकर हा स्वाध्याय परिवारातून आलेला आहे, सुधन्वा जोंधळेकर हा मनोहर भिडेंच्या शिवप्रतिष्ठाण मधून आलेला आहे, वैभव राऊत हा प्रमोद मुतालिकच्या श्रीराम सेनेतून आलेला आहे, पांगाराकर हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक होता, तर उर्वरित सनातनचे आहेत. यावरून स्पष्ट होते की जयंत आठवले, प्रमोद मुतालिक, मनोहर भिडे इत्यादी हे अनुयायांवरती 'सनातनी दहशतवादाचे' कुसंस्कार घडवित आहेत. आणि ते याचे समर्थन करत आहेत म्हणून तेच त्याचे मास्तर माईंड आहेत.हे स्पष्ट होते.
आजचा दहशतवाद: हिंदू की सनातनी ब्राह्मणी?
दहशतवाद हिंदू नाही, किंवा भगवा नाही. कारण भारतातील ज्या बहुजन लोकांना हिंदू समजले जाते ते दहशतवादी नाहीत. दहशतवाद निर्माण करणारे आठवले-भिडे-मुतालिक हे ब्राह्मण आहेत. त्यामुळे दहशतवाद हा सनातनी/ब्राह्मणी दहशतवाद आहे. कारण यातून निर्माण हिंदूराष्ट्रात ब्राम्हणच सर्वोच्च स्थानी असेल. विनाकारण हिंदू दहशतवाद संबोधून तमाम हिंदूंना बदनाम करू नये. भगवा म्हणजे सर्वोत्तम!बुद्धाला भगवा म्हटले जात असे. त्यांचे चीवर भगव्या रंगाचे होते. वारकरी पंथाची पताका भगव्या रंगाची आहे. शिवाजीराजांच्या स्वराज्याचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. त्यामुळे भगवा शब्द, रंग पावित्र्याचे, त्यागाचे, शौर्याचे प्रतीक आहे, ते दहशतवादाचे प्रतीक नाही. भगवा दहशतवाद म्हणणे हा बुद्धाचा, वारकरी पंथाचा आणि शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे वरील तथ्यावरून स्पष्ट होते 'सनातनी ब्राह्मणी दहशतवाद' हा खरा शब्दप्रयोग आहे.
सनातनी दहशतवाद भारताचा सीरिया-अफगाणिस्तान करेल
कधी काळी सीरिया, अफगाणिस्तान हे खूप सुंदर आणि संपन्न देश होते. परंतु इसिस, तालिबानी दहशतवाद्यांमुळे ते देश उध्वस्थ झाले आहेत. सीरियातील 80 लाख लोकांनी देश सोडला आहे. इसिस-तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्याच देशाला आणि धर्माला उध्वस्थ केलेले आहे.सुंदर काश्मीरला देखील दाहशतवाद्यांनी संकटांच्या खाईत लोटलेले आहे. सनातनी दहशतवादी हिंदू धर्माला आणि भारत देशाला उध्वस्थ करून रसातळाला घालणार. हे रोखायचे असेल तर सर्व जातींनी, पक्षांनी मतभेद विसरून या सनातनी दहशतवादाला कायमचे गाडायला हवं.
मरायला मराठे, चरायला मनुवादी सराटे; म्हणजे हिंदुराष्ट्र होय
संशयित पकडलेल्या सनातनी अतिरेक्यापैकी अपवाद वगळता सर्व अतिरेकी हे मराठा, कासार, भंडारी, न्हावी, लिंगायत इत्यादी जातीतील आहेत. आता त्यांच्यावरील आरोप सिद्ध होतील. त्यांना शिक्षा होईल. दहशतवादी कोणत्याही जातिधर्मातील असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु जगभरात दहशतवादी हे गरीब कुटूंबातूनच तयार करून वापरले जातात. सनातनी दहशतवादी पकडले, परंतु दहशतवाद निर्माण करणारे आठवले, भिडे, मुतालिक अजून मोकाट कसे? मरायला मराठे, चरायला मनुवादी सराटे.
कोणताही दहशतवाद, दहशतवाद निर्माण करणाराला देखील नष्ट करतो
एकदा नावेतून कांही प्रवासी प्रवास करत असतात. एक प्रवासी शेजारचा प्रवासी बुडावा म्हणून हळूच त्याच्या बुडाखाली छोट भोक पाडतो. कांही वेळाने नावेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरते आणि हळूहळू संपूर्ण नाव बुडते. दुसरयाला बुडविण्यासाठी भोक पाडणाराही मग सर्व सहप्रवाश्यासह बुडतो.
तात्पर्य: दहशतवाद निर्माण करून जोपासणारयांचा शेवट हा लादेन, हिटलर सारखाच होतो.
मराठा बहुजन तरुणांना नम्र आवाहन
तरुण तरुणींनो जीवन हे खूप सुंदर आहे. त्या जीवनाचा आनंद घ्या. आपले आईवडील हे खूप चांगले स्वप्न उराशी बाळगून आपणाला वाढवत असतात. शिक्षण देत असतात. कोणत्याही आईवडिलांना वाटत नाही की आपला मुलगा अतिरेकी व्हावा. त्यांना वाटते आपला मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनीअर कलेक्टर, अधिकारी, शिक्षक होऊन कमावता सुसंस्कृत नागरिक व्हावा. याचा विचार करा! धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कोणत्याही अतिरेकी, दहशतवादी संघटनेत दाखल होऊ नका. आपण वापरले जाणार नाही, याची काळजी घ्या. विशेषतः आपली मुलं लहानपणापासून कोणत्या अतिरेकी, दहशतवादी विचारांच्या शाखेत जात नाहीत ना, किंवा कोणत्या भिडे, आठवले, मुतालिक सारख्या धर्मद्रोह्यांच्या नादी तर लागलेली नाहीत ना ही काळजी प्रत्येक पिढीत घ्या.
सनातनी दहशतवादी संघटनेवर बंदीच
देशद्रोही, धर्मद्रोही सनातनी दहशतवादी संघटनेवर बंदी घातलीच पाहिजे. मागील केंद्रातील काँग्रेस सरकारने बंदी घातली असती तर डॉ. दाभोळकर, पानसरे, डॉ.कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे प्राण वाचले असते. जे मागील काँग्रेस सरकारने केले तेच काम आज केंद्रातील भाजप सरकार करत आहे. यासाठी तमाम हिंदू धर्मीयांनीच सनातनी दहशतवादी संघटनेवर कायमची बंदी घालावी.
सनातनी देशाला धोकादायक
सनातनी अतिरेक्यांना अहिंसा मान्य नाही. त्यांना धर्माची सहिष्णुता मान्य नाही. यांना समता मान्य नाही. यांना आरक्षण, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान मान्य नाही. त्यामुळे यांच्यापासून आपल्या देशाच्या सुरक्षिततेला, सार्वभौमत्वाला,धर्मनिरपेक्षतेला आणि संवैधानिक लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे.
---श्रीमंत कोकाटे
इतिहास अभ्यासक व प्रवक्ता मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड
0 टिप्पण्या