एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवार यांच्या निवासस्थानी अचानक आंदोलन


गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार धडक दिली. 'शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद' अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे. एसटीच्या विलीनीकरणात अडथळा आणण्यात सर्वस्वी शरद पवारच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाले आहेत. याचा निषेध करत त्यांच्या घराच्या दिशेने चपला आणि दगडफेक करीत आंदोलन केले. आंदोलक त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शरद पवार यांच्या घरातही घुसू, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वलिजयोत्सव साजरा केला. पण आज अचानक दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिव्हर ओक निवासस्थानावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलाफेक केली.   अशा पध्दतीने अचानक झालेल्या हल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकाशी चर्चेची तयारी दाखविली. शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये शरद पवारांच्या निवास्थानाकडे धाव घेतली. सिल्वर ओकबाहेर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी सुरक्षेचे कडे केले. पोलिस दलाने सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांना निवासस्थानाच्या परिसरातून बाहेर काढले. त्यानंतर आंदोलकांना एका बसमध्ये बसवून पोलिस त्यांना घेवून गेले. दरम्यान, एसटी कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

150 ते 200 पेक्षा जास्त आंदोलक अचानक शरद पवारांचा घरापाशी जमतात. ते धावत – पळत जाऊन दगडफेक आणि चप्पल फेक करतात याची पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही?? यामध्ये प्लॅनिंग असताना याबद्दलची माहिती मुंबई पोलिस गृहमंत्रालयाच्या गुप्तचर यंत्रणा यांना कशी मिळाली नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. खुद्द सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार स्वतः शरद पवार यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या हे घरात उपस्थित होते. अशा स्थितीत सिल्वर ओकपाशी पोलीस बंदोबस्त कसा नव्हता??, याबद्दलही मोठ्याप्रमाणावर शंका व्यक्त होत आहेत. 

या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. परंतु ज्यांना महाराष्ट्रातली परिस्थिती चिघळवायची आहे. ते आंदोलनाला चिथावणी देत आहेत असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी केला आहे, तर शरद पवारांनीच एसटी विलीनीकरणाचे आश्वासन राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात दिले होते मग त्यांनी ते पाळले का नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन मी चुकविले नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा प्रश्न समोर आला त्यासाठी पुढाकार घेतला. काही कर्मचाऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले. तरीही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. त्यामुळे जो काही प्रश्न असेल तो चर्चेद्वाराच सोडविला जातो. एसटी कर्मचाऱ्यांकडून जे काही चुकीचे घडवून आणण्यात येत आहे. त्यास एसटी कर्मचाऱ्यांचे चुकीचे नेतृत्व कारणीभूत आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांनाही त्यांचे चुकीचे नेतृत्वच जबाबदार असून एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या झाल्या त्यास हे चुकीचे नेतृत्वच कारणीभूत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहीलो असून यापुढेही उभे राहू -  शरद पवार

एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत  या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा,  एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या, काल न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला तो निर्णयही सर्वांना मान्य आहे. परंतु आज अचानक एक मोठा जमाव शरद पवार यांच्या घरावर चाल करुन जातो हा नियोजनबद्धरितीने केलेला हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना भडकावणारा कोण आहे? या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. आजही आम्ही सर्वजण एसटी कामगारांच्या पाठीमागे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन  कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. राज्यात या पध्दतीच्या घटना घडवून आणून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु आहे. मात्र राज्य सरकारवर या गोष्टींमुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत या घटनेची चौकशी होणार तसेच शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार होते याची माहिती राज्यातील गुप्तचर विभागाला होती की नाही याचीही चौकशी करण्यात येणार . एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवरील सुणावनी सुरु होती. तसेच यावरील संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जवळपास संपत आली आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीची कृती करायला नको होती. -  गृहमंत्री दिलीप वळसे

124 महिलांचे कुंकु पुसले गेले पण सुप्रिया सुळे हल्ला झाला म्हणतात महिला हल्ला कशा करतील उलट त्या व्यथित होत्या. व्यथित झालेल्या महिला हल्ला कसा करतील असा सवाल करीत कुणीतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने हल्ला केला असेल तर याची मला खात्री नाही. एसटी कर्मचारी हल्लेखार असतील तर त्यांना चक्कर कशी येईल, हल्लेखोर असतील तर त्या बांगड्या कशाला दाखवतील असे म्हणत कुणावर जर हल्ला झाला असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही  काल या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मी विपश्यना करा, मनस्थिती ढासळु देऊ नका असे एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. पोलिसांना कारवाया मागे घेण्याचे न्यायालयाने सांगितले पण राज्य सरकार आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची भाषा करते हे चुकीचे आहे. लक्षात ठेवा मी व्यक्तीगत आयुष्यात खोटे बोलत नाही. सकाळपासून माझ्या संपर्कात माध्यमांचे प्रतिनिधी होते. तुम्ही आंदोलनाला हल्ला म्हणता पण ते हल्लेखार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे जीव गेलेल आहेत लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करु नका, - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते

 हा लोकशाहीचा पहिला खून आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत असे कधीही घडलेले नाही.  महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून त्याची ‘दशा’ होतेय. ज्या महाराष्ट्राने संस्कारक्षम राजकारण बघितले आहे. त्याच महाराष्ट्रात असे होणार असेल तर या पुढील राजकारण काय असेल, हे सांगणे अवघड आहे.  या मागे कोणती राजकीय शक्ती आहे किंवा नाही, हा प्रश्न नाही. पण, हे ज्याने कोणी घडवून आणले असेल. त्याला काय वाटते तो सुरक्षित आहे? “तलवारीच्या ताकदीवर जगणारे तलवारीनेच मरतात,” ही एक म्हण आहे. असे कोणाच्या घरावर हल्ले करुन लोकांची मने नाही जिंकू शकत. उलट लोकांना किळस वाटू लागली आहे.  एकीकडे जयजयकार करता आणि दुसरीकडे घरावर हल्ला करता; पण, असेही समजू नका की आम्ही बांगड्या घातल्यात; पण, आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. पण, आम्ही लोकशाहीचा सन्मान करणारे असल्याने आम्ही वेडेवाकडे कृत्य करणार नाही. पण, जर तुम्ही आमच्या नेत्याच्या घरापर्यंत जाणार असाल तर त्याचा आम्ही निषेध तर करुच ना?  - मंत्री जीतेंद्र आव्हाडटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या