नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे भारतातीलच नव्हे तर जगातील बौद्धांचे आस्थेचे केंद्र आहे. परंतु ते अजुनही बैद्धांच्या ताब्यात नाही. यासाठी देशपातळीवर बराच संघर्ष झाला. आंदोलने झाली. परंतु आता त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी येथे केले.
गगन मलीक फाऊंडेशनच्यावतीने दीक्षाभूमी येथील आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात थाायलंड येथून आलेल्या पूज्यनीय भिक्खूसंघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी भिक्खू बोधीनंदा मुनी (थायलंड), गगन मलीक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, घनश्याम फुसे, भंते हर्षबोधी, भंते विनयबोधी, डॉ.भिक्षुणी सुनीती, कॅप्टन नत्तकिट (थायलंड), तक्षशीला वाघधरे, अशोक सरस्वती यांच्यासह विनोद थुल, प्रकाश कुंभे, दिनेश शेंडे, शरद अवथरे, प्रा.प्रवीण कांबळे, रेखा लोखंडे, वर्षा धारगावे, रजनी तायडे आदी उपस्थित होते. .यावेळी महाराष्ट्र राज्य कॉग्रेस अध्यक्ष .नाना पटोले यांनी जगाला तारण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. यानंतर दिवसभर भिक्खूसंघाच्या धम्मदेशनाचा कार्यक्रम चालला. नितीन गजभिये यांनी भूमिका विषद केली. प्रास्ताविक पी.एस. खोब्रागडे यांनी केले. भीमराव फुसे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या