सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

 


महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडवून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या शक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)  पक्षा मागणी

महाराष्ट्रात ३ मे या रमजानच्या दिवशी राज्यातील मशिदींसमोर सामुदायिकपणे हनुमान चालिसा वाचण्याचे कार्यक्रम करण्याची धमकी देण्यात आली आहे. या चिथावणीखोर कृत्यामुळे राज्यातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याला  मोठ्या प्रमाणात बाधा येईल. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील अतिरेकी, समाजविघातक शक्तींना विनाकारण राज्यात अनागोंदी माजवण्यास वाव मिळेल. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज ठाकरे यांच्या या महाराष्ट्रद्रोही भूमिकेचा तीव्र निषेध करत असून राज्यातील सामाजिक सलोखा नष्ट करणाऱ्या कुणाही व्यक्ती, राजकीय पक्ष वा संस्थांचा मुलाहिजा न बाळगता राज्य सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. असे पत्र पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पाठवले आहे.

हनुमान चालिसाचे वाचन हनुमान मंदिरात करायचे सोडून रमजानच्या दिवशी मशिदींसमोर करायचे, हे धार्मिक कृत्य होऊ शकत नाही. ते राजकीय कृत्य असून महाराष्ट्रातील धार्मिक सलोखा उध्वस्त करण्याचे कारस्थान आहे. हे अपवादात्मक कृत्य नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या चिथावणीने धार्मिक दंगली करायचे कारस्थान रचण्यात आले होते. जनतेच्या महागाई, बेरोजगारी, उपासमार यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर तोंड उघडण्याची तयारी नसल्याने भाजप हा सरकार विरोधी नव्हे तर महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत आहे. राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी आता राज ठाकरे यांच्यासारख्या बेजबाबदार आणि भडकाऊ भाषणबाजी करणाऱ्या व्यक्तीस हाताशी धरले आहे. त्यांना आवर न घातल्यास राज्यात अशांतता माजण्याचा गंभीर धोका आहे.  याची दखल घेऊन महाविकास आघाडीचे सरकार आपले संविधानिक उत्तरदायित्व पार पाडील, अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. 

सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन राजकीय पक्ष, जनतेच्या विविध संघटना, संस्था आणि मान्यवर विचारवंत – सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठका आयोजित करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. राजर्षि शाहू महाराजांची स्मृतिशताब्दीच्या या वर्षात त्यांच्या परंपरेला काळिमा लागणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही शासनाने जनतेला दिली पाहिजे. आपल्या अशा पुढाकारास आमचा पक्ष सकारात्मक प्रतिसाद देईल असे आश्वासन नारकर यांनी दिले आहे.

देशात व राज्यात नियोजित पद्धतीने धर्मांध विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे. कॉर्पोरेटधार्जिण्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून महागाई व बेरोजगारी सारख्या असह्य झालेल्या मूलभूत समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि धार्मिक द्वेषाच्या आधारे आपले धर्मांध व कॉर्पोरेटधार्जिणे राजकारण पुढे नेण्यासाठी आर.एस.एस. व भाजपने आपल्या नियोजनबद्ध कारवाया तीव्र केल्या आहेत. महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना पुढे करून आर.एस.एस. व भाजप धर्मांध तणाव निर्माण करत आहेत. ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे कार्यक्रम घेण्यात येतील असे जाहीर करून महाराष्ट्रात धार्मिक तणाव वाढविण्याचा कार्यक्रमच त्यांनी जाहीर केला आहे.

हिजाब, हलाल सारख्या मुद्द्यांच्या माध्यमातून अगोदरच देशात धर्मांध द्वेषाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. रामनवमीचा मुहूर्त साधून अनेक राज्यांत अल्पसंख्याकांवर हल्ले चढवले गेले आहेत. देशाची घटना, राष्ट्रीय एकात्मता आणि भारताबाबतची मूळ संकल्पना (आयडिया ऑफ इंडिया) यामुळे धोक्यात आली आहे. वर्षभर लढून विजयी झालेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलन, श्रम संहिता व खाजगीकरणाविरोधातील लढा आणि सामाजिक अन्याय-अत्याचारांच्या विरोधातील संघर्ष यांत एकत्र आलेले सर्व पक्ष, संघटना, व्यक्ती व विचारवंतांनी देशाची घटना, स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व बंधुता या मौल्यवान मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

याबाबतम मगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ वाजता सर्व डाव्या, पुरोगामी पक्ष-संघटनांच्या  बैठकीचे आयोजन केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय,  बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई या ठिकाणी आयोजित बैठकीत सर्व संमतीची भूमिका आणि आंदोलनाचा कार्यक्रम ठरविला जाणार आहे. या बैठकीस डॉ. अशोक ढवळे {पॉलिटब्युरो सदस्य, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्ससवादी), राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा}, कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), भाई प्रा.  एस. व्ही. जाधव (शेतकरी कामगार पक्ष), मेराज सिद्दीकी (समाजवादी पार्टी), साथी प्रभाकर नारकर (जनता दल -  सेक्युलर), ऍड. डॉ. सुरेश माने (बी.आर.एस.पी.), कॉ. विजय कुलकर्णी (लाल निशाण पक्ष), कॉ. अजित पाटील (CPI - ML Liberation), कॉ. किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), साथी प्रतिभा शिंदे (लोकसंघर्ष मोर्चा), फिरोज मिठीबोरवाला (हम भारत के लोग) हे आणि अनेक पुरोगामी पक्ष संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यक्ती संबोधित करणार असल्याची माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस  राजेंद्र कोरडे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA