Top Post Ad

पदपथावरील अतिक्रमण कधी हटवणार.... ठाणेकरांचा आयुक्तांना थेट सवाल

  •  अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आयुक्तांचे निर्देश
  • पदपथावर असलेल्या  प्रचारशेडकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष



:ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती गटर्स कामांची पाहणी करून शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे, पार्किंग गाड्या तात्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले. मात्र महागिरी परिसरातील पदपथावर उभारण्यात आलेल्या नगरसेवकांच्या प्रचारांचे शेड यांना मात्र अभय देण्यात आल्याने येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या निधीतून अर्थात सर्वसामान्य नागरिकांच्या करातून हे शेड उभारले जात आहेत. मात्र त्यावर केवळ स्वत:च्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि आपले स्वत:चे फोटो लावण्यात येत आहेत. त्यामुळे ही सर्व नगरसेवकांची प्रचारकेंद्र झाली आहेत. यावर ठाणे महानगर पालिका आयुक्त अंकुष ठेवणार आहेत की नाही. पदपथावरील अतिक्रमण कधी हटवणार, असा सवालही येथील नागरिकानी उपस्थित केला.

महागिरी कोळीवाडा आणि दादोजी कोंडदेव स्टेडीयम परिसरातील सर्व पदपथांवर नगरसेवकांनी आपले प्रचार शेड उभारले आहेत. वाचककट्टा, विश्रांती कट्टाच्या नावाखाली या परिसरातील एकही पदपथ मोकळा राहिलेला नाही. इतकेच नव्हे तर चक्क वाहतुकीसाठी असलेल्या रोडवर देखील नगरसेवकांनी कट्ट्याचे बांधकाम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे महापालिका जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामधील काही शेडचे बांधकाम महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपल्यानंतर सुरु झाले आहे. जे आजही सुरू आहे. मात्र याकडे ठाणे महानगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. सिडको ते कळवा नाका पर्यंतचा  विशेष करून स्टेडियमच्या लगत असलेला सर्व पदपथ या प्रचारशेडनी व्यापला आहे.  नगरसेवकांनी वाचककट्टाच्या नावावर स्वत:च्या प्रचाराकरिता हे शेड  बांधले असल्याचा आरोप येथील सामाजिक संघटना करीत आहेत. मात्र याबाबत पालिका जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
 
 शहरातील रस्ते, दुभाजक  तसेच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- १९९५' अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. परंतु इथे सर्व पदपथ वाचककट्टाच्या नावावर आपल्या प्रचाराचे केंद्र बनवणाऱ्यांवर महापालिका आयुक्त  कारवाई करणार आहेत की नाही असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com