कोल्हापूर -
पूजा अर्चा करणे हा तुमचा धंदा आहे धर्म नाही. जर हा धर्म असता तर त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक ब्राम्हण आणि उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांमध्ये राडा झाला नसता. तो तुमचा धंदा आहे म्हणून घडले. त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुम्ही चप्पलांच्या कारखान्यात सुद्धा शिरला आहात, सोने चांदीच्या व्यावसायिकांच्या पोटावर सुद्धा पाय आणला आहात. मग देवळात तुमचेच 100 टक्के आरक्षण का?, पुण्यातील वेदभवनात केवळ ब्राम्हणांनाच प्रवेश का? असा सवाल करत आता आम्हाला सुद्धा तुमच्या धंद्यात प्रवेश मिळून शिकू द्या, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल कोल्हापूरातील संकल्प सभेत केले.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चार दिवसांपूर्वी सांगली येथे झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचेही त्यांनी समर्थन केले. ज्या पद्धतीने चर्मकार समाजाचा चप्पल बनविणे हा त्यांचा धर्म नसून धंदा आहे, सुतार बांधवांचा सुद्धा सुतारकाम धर्म नसून धंदा आहे. त्याच पद्धतीने पूजा-अर्चा करणे हा सुद्धा पुरोहित समाजाचा धंदा आहे धर्म नाही. भारतात दंगे भडकावण्याचे काम सुरु आहे. तिकडे दिल्लीत गरीबांच्या घरावर बुलडोझर चालवला गेला. दोन धर्मांमध्ये जाणूनबुजून वाद निर्माण केला जात आहे. अशी जोरदार टीका भुजबळ यांनी केली.
इस्लामपुरच्या सभेतील अमोल मिटकरी यांच्या भाषणावरुन मोठा वाद निर्माण केला जात आहे. १०० वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक तोडगा सुचवला होता. पौरोहित्य हा एक व्यवसाय आहे.पोटापाण्याचा रोजगार आहे.तो सर्व हिंदूंना खुला असावा. म्हणजे जसे वकील, सीए, डॉक्टर, प्राध्यापक, न्यायाधीश परीक्षा देऊन होता येते तशीच विद्यापीठीय परीक्षा पास करून कोणाही हिंदूला पुरोहित बनता आले पाहिजे. मराठा, कुणबी, तेली,आगरी, भंडारी, धनगर, गुरव, मातंग, चर्मकार, कैकाडी, वडार आदी सर्व ४६३५ हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत असेही ते म्हणाले. धार्मिक द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता हे समजायला हवं हा फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे जातीयवादाला थारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समतेचा संदेश देणाऱ्या कोल्हापूरमध्ये काही मंडळींनी धार्मिक चिखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण कोल्हापूरकरांनी तो होऊ दिला नाही. महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला आणि कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला विजयी केले. शाहू महाराजांच्या कोल्हापूरने पुन्हा एकदा महाराष्ट्राला मार्ग दाखविला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिम्मीताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणुन आपण साजरे करणार आहोत कोल्हापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक तो निधी आम्ही उपलब्ध करुन देऊच.धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले-शाहु-आंबेडकरांचे विचाराच देतात असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भोंगे लावायचेच असतील ना तर त्यांनी ते पेट्रोल पंपावर लावावे सर्वांना रोजची भाववाढ तरी कळेल असे मत व्यक्त करतानाच आघाडी सरकार असताना मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरु आहे. हे सगळं विकुन देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयनची कशी होणार….? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ओबीसीचा निर्माण झालेला प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
0 टिप्पण्या