Top Post Ad

डॉ.बाबासाहेब आणि "जनता"



आंबेडकरी चळवळीमध्ये वर्तमानपत्रांची भूमिका फार मोलाची आहे. कालही आणि आजही. बाबासाहेबांनी नेहमीच वर्तमानपत्रांचे महत्त्व आपल्या भाषणामधून विषद केले आहे. आपल्या चळवळीतील प्रत्येक घडामोडी खेड्यापाड्यात प्रत्येक व्यक्तीला समजाव्यात याकरिता बाबासाहेबांनी  नियतकालिकांकडे विशेष लक्ष दिले. त्यातून मूकनायक, समता, बहिष्कृत भारत आणि जनता सारख्या नियतकालिकांचा उगम झालेला दिसून येतो. मात्र सध्याची परिस्थितीत वर्तमानपत्रांची भूमिका संधीसाधू झाली आहे. भांडवलदारी पत्रकारीतेने आपले हातपाय पसरले असल्याने हे क्षेत्र आता गढूळ झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झालेला आढळतो.  सध्याच्या या वर्तमानपत्रांच्या बातम्या आणि त्यातून प्रकाशित होणाऱ्या लेखांकडे पाहिले तर समाज प्रबोधनाचे नेमके कार्य कोणत्या दिशेने चालले आहे याचा प्रत्यय येतो. `निवडून येणाऱ्यालाच मतदान करा' अशा आशयाची बातमी दिल्यानंतर लोक कोणाला निवडून देतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  सध्या केवळ भांडवलदार, प्रचंड श्रीमंत असलेले लोकच निवडून येतात. कारण त्यांच्याकडे पैसा आहे. सर्वसाधारण माणसाची निवडणुकीत उभे राहण्याची देखील `कुवत' नाही. मग निवडून येणे दूरच! अशावेळी  स्वतला चळवळीचे किंवा आंबेडकरवादी वर्तमानपत्र म्हणणाऱ्या वर्तमानपत्रांची भूमिका काय हा प्रश्न पडतो.

 बाबासाहेबांनी त्यावेळी चालविलेल्या नियतकालिकांकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येते  `जनता' या नियतकालिकामधून बाबासाहेबांनी तत्कालिन चळवळ आणि सामाजिक बांधिलकी जोपासली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या मानवतेच्या चळवळीत होणाऱ्या घडामोडी, विरोधी धर्मांधाच्या गोठातील खलबतांचे विश्लेषण, त्या अनुषंगाने जनतेला पुरविण्यात येणारी सत्य माहिती, खोट्यांचे भंडाफोड, कार्यकर्त्यांना सूचना, देशपातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर राष्ट्रीय ऐक्यातून केलेले भाष्य व प्रबोधन अशा सर्वांगिण बाबी `जनता'मधून हाताळल्या गेल्या. तो एक मोलाचा ऐतिहासीक ठेवा असून त्याचे प्रचंड संशोधन होणे गरजेचे आहे. `जनता'या एकाच विषयावर कित्येक पीएचडी होऊ शकतात.

`जनता'च्या माध्यमातून शहरीकरण व आद्योगिकरण होत असतानाही त्यात एस.सी.एस.टी.एन.टी. वर्गातील समाज कसा भरडला जात होता याचे वास्तव  अनेक ठिकाणी वर्णिले आहे. उदा.डेव्हलपमेंट, ईप्रुव्हमेंट, महानगरपालिका कामगारांच्या चाळीतील जातीभेदाची भयानकता व तेथील विषमता मांडली आहे. कामगारांमध्ये देखील जातीवाचक वाडा जसे भंगीवाडा, चांभारवाडा निर्माण झाल्याचे सांगत येथील चांभार वस्तीचे भीषण वर्णन मांडून आधुनिक जातीभेदावर टीका केलेली आढळते. याशिवाय शिरगणती सुरु केली असताना एस.सी.एस.टी.एन.टी. वर्गातील जातींनी जाती सांगाव्या की सांगू नये यावर विविध सामाजिक संस्थांकडून चुकीची पावले उचलली जात असताना त्यांच्या चुका दाखवण्यात आल्या आहेत. जाती का सांगाव्यात त्याने कसे फायदे होतील हे परिस्थितीनुरुप पटवून देण्यात आले. हा प्रश्न आजही जातीनिहाय जनगणनेशी जोडल्यास त्या काळातील `जनता'च्या अंकाचा अभ्यास केल्यास एस.सी.एस.टी.एन.टी. वर्गातील विचारवंताना नक्कीच मार्ग सापडू शकेल.

भोर सारख्या प्रतिष्ठित संस्थानाचा व त्याचबरोबर टिळक-केसरीचा बुरखाफाड करीत शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध राजेशाही व केसरीची लेखणी कशी पाजरत होती ते दाखवून देण्यात आले आहे. संयुक्त प्रांतातील जमीनदार-तालुकादार यांच्याकडून शेतकऱ्यांवर होणारा जुलूम, घर-दार महिलांवरील अत्याचार याचा उहापोह करीत शेतकऱ्यांचा कैवारी म्हणणाऱ्या गांधी-पटेल-नेहरूंची शेतकरी विरोधी भूमिका समोर आणली आहे.
प्रचलित कुचकामी शिक्षणपद्धती, बोर्डिंगमधील शिक्षण यामुळे सामाजिक कार्यापासून दुरावलेला तरुण यांची सांगड घालत शिक्षणपद्धतीच्या दोषांवर लेखणी उभारली आहे. यासंदर्भात `जनता'कार लिहीतात की, ``चांभाराचा चिवटपणा, मांगाची निर्भयता, महाराची मर्दुमकी, मेहतराची निरलसता ज्या शिक्षणाने मारली जाते असे शिक्षण काय कामाचे?'' 

आजघडीला देशभरातील शैक्षणिक व्यवस्था ही राष्ट्रीय ऐक्य वाढण्यास, जातीभेद नष्ट होण्यास, समता बंधुभाव वाढीस लागण्यास योग्य प्रमाणात पुरक असल्याचे दिसत नाही. तरीही त्यावर भाष्य करण्याचे धैर्य कोणत्याही विद्यमान वृत्तपत्रात नाही. अगदी वाईटपेक्षा चांगले लोकांच्या मनावर बिंबविणे याला सकारात्मक पत्रकारिता म्हणतात तिचा नमुना `जनता'त अनेक ठिकाणी पहावयास मिळतो.  आदिवासी बांधवांना गुन्हेगार जमाती ठरविणाऱ्या इंग्रजानाच गुन्हेगार म्हणण्याची हिंमत केवळ `जनता' दाखवते. त्या गुन्हेगार जमातीच्या आयुष्यावर होणारे दुष्ट परिणाम, एकाच वेळेस स्वकीय व परकीयांशी दोन हात करताना `जनता'च्या लेखणीला अतुलनीय धार चढलेली दिसून येते.  

 घटनांचे वृत्तांत अर्थात बातम्या मिळवून त्यातील खरे-खोटेपणा तपासून विश्लेषण करण्यात व योग्य मार्गदर्शन करण्यात `जनता'ची विशेष हातोटी होती. उदा. नाशिक येथील मिरवणुकीत घडलेले वृत्त. मुस्लीम नेत्यांनी केलेली मदत, मशिदीवर हल्ला करण्याबाबत उठवलेली अफवा, या साऱ्या गोष्टी समोर आल्या की तेथे घडणाऱ्या वास्तवाचा विपर्यास करून अन्य विभागातील लोकांसमोर मांडायच्या व मने कलुषित करण्याचा घातकी प्रचार `जनता'मुळे उधळला गेला, शहीद भगतसिंग यांच्या फाशीनंतर उठलेली कानपूर येथील हिन्दु-मुस्लीम दंगल, त्यातील सत्य बाजू मांडण्याचे काम `जनता'ने केले.. जळगाव येथील सर्व वर्णाश्रम धर्माची परिषद व त्यात नाकारलेला प्रवेश यामुळे अस्पृश्यांनी केलेला सत्याग्रह याबाबतही खोटे वृत्त भांडवलदारी वर्तमानपत्रातून झळकत होते. अशावेळेस तेथे नेमके काय घडले? कुणाची चुक होती?  

मराठी व महार समाजाला झुंज लावण्याचे कसे प्रयत्न होत होते याचे विश्लेषण करून अन्य भांडवलदारी वर्तमानपत्रानी दिलेल्या उलट्या वृत्तांचा भंडाफोड करण्यात आला. सामाजिक कार्याविरोधातील सभा कार्यक्रमांना उचलून धरणे, मुठभर लोकांच्या सभेस विराट सभा बोलणे, चुकीचे वृत्त देऊन अपप्रचार करणे, यासाठी भांडवलदारी वृत्तपत्रे कशाप्रकारे काम करीत होती याचे ज्ञान `जनता'मधूनच होते. त्याकाळची राष्ट्रीय म्हणवणारी वृत्तपत्रांचे खरे स्वरुप प्रकट करून निर्भीड पत्रकारिता काय असते याचा प्रत्यंय `जनता'ने दाखवून दिला आहे. मात्र काळ बदलला असला तरी आजही तीच परिस्थिती कायम आहे. आजच्या काळातील ही राष्ट्रीय म्हणवणारी वृत्तपत्रे त्याच जुन्या मानसिकतेनुसार पत्रकारिता करताना आढळतात. त्याचाच परिणाम म्हणून खेडोपाडी घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना योग्य पद्धतीने उजेडात न आणणे, त्यास जागा न देणे, चुकीच्या पद्धतीने मांडून घटनेप्रती उदासिनता निर्माण करणे, अशी कामे अगदी बुद्धीमत्ता वापरून पार पाडली जातात. त्यामागील सत्य शोधून ते प्रस्थापित व धनदांडग्यांच्या विरोधात समोर आणण्याचे काम भांडवलधार्जिणे वृत्तपत्रे जाणीवपूर्वक टाळतात. ही एक प्रकारची `पेडन्यूज' या जातीभेदाच्या न्यूनगंडाने पछाडलेल्या बाजारी संपादकांच्या बेगडी स्वतंत्र लेखणीची करामत असते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना सरसकट मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केल्याचे दाखले `जनता'मधून मिळतात. वयात आलेल्या सर्वांना हा महत्त्वाचा अधिकार हवा यासाठी ते गोलमेज परिषदेत भांडताना दिसतात. एवढी अमूल्य गोष्ट भांडवलदारी वर्तमानपत्रांनी जाणीवपूर्वक टाळली मात्र `जनता'मुळे ती लोकांना म]िहती पडली अन्यथा ती दुर्लक्षितच राहिली असती. 21 जानेवारी 1931 च्या गोलमेज बैठकीतील भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, `मर्यादित लोकानाच मतदानाचा हक्क असणे म्हणजे भांडवलशाही व वरिष्ठ वर्ग ह्यानाच देशावर राज्य करू देणे होय'. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हातावर मोजता येणाऱया लोकांनीच यांनीच पाठिंबा दिल्याचा महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावाही मिळतो. गोलमेज परिषदेत नक्की काय झाले. तेथे कशाप्रकारे वादविवाद होत होते. मात्र प्रत्यक्षात चूक कोण, बरोबर कोण, मागण्या कोणत्या, त्या रास्त कशा अशा असंख्य गोष्टींचा लेखाजोखा `जनता'नेच प्रकाशित केला..

असंख्य परिषद, सभांचे वृत्तांत `जनता'मधून आपला इतिहास सांगतात. महार परिषद, चाभार परिषद, अस्पृश्य कोकण परिषद,  शेतकरी परिषद, अखिल बंगाल स्त्री परिषद, अस्पृश्य महिलांची सभा आदी सभांची वर्णने त्यातील भाषणे, ठराव अगदी परिपूर्ण मांडण्यात आल्याने तो एक ऐतिहासिक ठेवा आधुनिक काळासाठी `जनता'ने तयार करून ठेवला आहे. आजच्या चळवळीतील म्हणवणाऱ्या वृत्तपत्रांनी स्वतचे आणि समाजानेही स्वतचेच परिक्षण करणे ही काळाची गरज आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते भारताच्या राज्यघटनेत  कलम 19अ च्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य जनतेला भाषण स्वतंत्र, लिखाण स्वतंत्र व न्यायालयासमोर आपला अधिकार मांडण्याचा अधिकार दिला आहे.  त्यांच्या विरोधात पत्रकारांनी आपली प्रखर पत्रकारिता दाखवून त्यांना दंडीत करून आपल्या लेखणीवर विजय मिळवणे गरजेचे आहे. मात्र सध्या ते दुरापास्त झाले आहे. 

कारण भांडवलशहांनी पत्रकारितेलाही आपल्या अंकित करून ठेवले आहे. अशाही परिस्थितीत प्रजासत्ताक जनता या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करून पुन्हा एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या पत्रकारितेचा अंगिकार करण्याचा हा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या सोशल माध्यमांमुळे वर्तमानपत्रांना आलेली शोककळा ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे वर्तमानपत्रे इतिहास जमा होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पण आपल्या सारख्या वाचकांमुळे ही भीती अनाठायी ठऱेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी आपण या वर्तमानपत्रांच्या चळवळीकरिता योगदान देणे अतिशय गरजेचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हाच संकल्प केला पाहिजे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com