Top Post Ad

माणसासाठी लढलेला माणूस..... बाबुराव बागुल

  माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला. बाबूराव बागुलांचा हा कथासंग्रह म्हणजे साठोत्तरी साहित्य प्रवाहातील दलित साहित्याच्या उदयाच्या काळातील लेखन. याच कथासंग्रहाने दलित साहित्याची पायाभरणी केली. या कथासंग्रहात एकूण दहा कथा. पाच दलित आणि पाच सर्वसाधारण विषयावरील कथा, त्यांच्या या कथासंग्रहातील मला आवडलेल्या वानगीदाखल काही कथा या प्रमाणे......

'गुंड' या कथेत आंतरराष्ट्रीय इथोपियन गुन्हेगार झोपडपट्टीत राहत असतो. महाकाय शरीर हे त्याचे वैशिष्ट्ये. त्याच्याकडे कोणीही जात नाही. गेल्या वीस वर्षात त्याने स्त्रीचा चेहरा पाहिलेला नाही. जर्मन वेश्येने त्याला त्याची महाकाय देहयष्टी पाहून नकार दिलेला असतो त्यामुळे स्त्रीविषयक भयंकर संताप त्याच्या मनात भरलेला असतो. अशा गुन्हेगाराकडे झोपडपट्टीतील ’जयंतीबेन’ नावाची स्त्री आईच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसे मागायला जाते. हा गुंड सावकारास धमकावून पैसे आणतो, जयंतीबेनच्या आईची अंत्ययात्रा काढतो, प्रेताला स्वतः: खांदा देतो. आयुष्यात पहिल्यांदा त्याला रडावे वाटते, अशी ही कथा. वेळप्रसंगी जात धर्म विसरून माणसं कशी एकत्र येतात आणि एक अट्टल गुन्हेगार कसा भावुक, प्रेमळ होतो त्याची ही कथा.

’वानर’ ही कथा एका पहेलवानावर आधारीत आहे. 'बापू पहेलवान’ त्याच्या सासुरवाडीतील पहेलवानाकडुन कुस्तीत हरल्यामुळे बापू पहेलवान वर्षभर मेहनत करतो, त्याची आई त्याच्यासाठी खर्च करते. आणि नेमक्या कुस्त्या उद्यावर आलेल्या असतात. बापू पहेलवानाची बायको ’सखू’ त्याचे जेवण घेऊन त्याला भेटण्यासाठी जाते. वर्षभर बायकोपासून दूर राहिलेल्या ’बापू’ चा संयम सुटतो. तेव्हा त्याची आई म्हणते तुझ्या बायकोच्या माहेराचा पहेलवान जिंकावा म्हणुन तुझे तपभंग केले. तिचेच कारस्थान आहे. ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा.

' जेव्हा मी जात चोरली होती’ या कथेतील नायक शिकलेला आहे. त्यामुळे शोषणाची त्याला जाणीव झालेली आहे. तो नवविचाराचा आहे. या कथेतला नायक जात चोरून राहत असतो, पण त्याची खरी जात उघडकीस येते, तेव्हा त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण होते. कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा.

बाबूराव बागुलांच्या लेखनाने मराठी साहित्यात कधीच व्यक्त न झालेला विषय मांडला. त्यामुळे त्यांची कथा वेगळी वाटते. बाबुरावांची कथा प्रथमच झोपडपट्टीतील अनुभव ताकदीने उभे करते. तिथले दारिद्र, तिथल्या पिसाट वासना, तिथले संवेदहीन जगणे, तिथले वातावरण , जीवनाच्या दाहक बाजू, शोषितांचे लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये. 'जेव्हा मी जात चोरली होती' आणि 'मरण स्वस्त होत आहे' या दोनही कथासंग्रहातून वाचकाला एका नव्या जगाची ओळख होते म्हणुन तेव्हा त्या काळात हे कथासंग्रह चर्चेचे ठरले नसतील तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर

" आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." 

त्यांच्या लेखनाने पांढरपेशी वाचकांना धक्काच दिला. त्याच बरोबर टीकाकारांनी त्यांचे लेखन अवास्तव, एकांगी, अस्ताव्यस्त लेखन, कृत्रिम संवाद अशी टिकाही केलीच आहे. तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही.

" मी शतकांच्या स्वप्नांचा अविष्कार आहे, उगवत्या जीवनाचा भाष्यकार आहे" दारिद्र, दु:ख व दैन्य याच्या विळख्यातून दलित मुक्त व्हावा. जुने जग लयाला जावे म्हणुन ते मरणाला आवाहन करतात.ते लिहितात-----

मरणा !

" तु येणार आहेस ना; तर लवकर ये
कायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षी
स्वर्गात उडून जाण्यापूर्वीच ये.
तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर
माझ्या जळत्या जीवाला लागला तर
उरीची संपेल क्षणी जळजळ
बुजतील वळ युगायुगाचे
विरतील ओहळ जुन्या जखमांचे मनामनातले
होईन मी शुद्ध चांगलासा तरुण
कधी कबीर,कधी उमर खय्याम
गेला ज्या चितारुन
मरुन मी मेघासारखा संचारेन वार्‍यावरती
कधी गिरीच्या शिरी राहून
उभा गाईन गीते लखलखती." *

मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? असो....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com