इतिहासाचा विपर्यास... सोयीचे राजकारण ...?१८८० मध्ये महात्मा ज्योतिराव फुले रायगड किल्ल्यावर गेले असता त्यांना दाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली, जी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली होती. पुनर्बांधणीसाठी होळकरांनी देणगी दिली. अशी इतिहासात नोंद आहे.
सार्वजनिक शिवजयंतीचे खरे प्रणेते आहेत राष्ट्रपिता जोतिराव फुले. याचा साधा सोपा पुरावा म्हणजे 1869 साली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता म. जोतिराव फुले यांनी साजरी केली, याची नोंद पुण्यातील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला आहे. 1869 साली टिळक हे केवळ 12 वर्षांचे होते. त्यावर्षी कोणी जयंती उत्सव खरेच सुरू करील का? त्यामुळे टिळकाने `शिवजयंती' सुरू केली हा प्रचार साफ खोटा आहे. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी शिवजयंती सुरू केली यास कारणेही तशीच होती. जोतिरावांनी 1867 साली शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध रायगडी घेतला. 1868 साली शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना केली. 1869 साली शिवरायांचा अस्सल पोवाडा प्रसिध्द केला. 

1864 ते  1884 व 1884 ते 1890 या दोन कालखंडात प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर जयंती उत्सवाचे कार्यक्रम राबवलेत.1890 साली राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचे निधन झाल्यानंतर  व नेमक्या याच काळात राष्ट्रीय चळवळीचा जोर वाढल्याने जोतिरावांची शिवस्मारक कल्पना मागे पडली. राष्ट्रीय चळवळीतील टिळकपंथी नेतृत्वाने सर्व सामाजिक प्रश्न बाजुला सारलेत. ब्राह्मणी वर्चस्वाला अडचणीच्या ठरणाऱया सर्व चळवळी टिळकांनी दाबल्या.टिळकांनी शिवजयंती उत्सव पळवला तो राष्ट्रप्रेमापोटी किंवा शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी नव्हे तर बहुजन समाजावरील सत्सशोधक समाजाचा प्रभाव कमी करण्यासाठी. राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवून त्यांनी संपूर्ण राष्ट्राचीच दिशाभूल केली. 

राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी शिवजयंती उत्सवाला सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले होते. `कूळवाडी कूलभूषण  व पोशिंदा कुणब्यांचा' असलेला शिवराय टिळकांनी `गोब्राह्मण प्रतिपालक' करून टाकला. अशा पध्दतीने राष्ट्रपिता फुले यांच्या समतावादी विचारांना छाटून विषमतावादी विचारांची पेरणी केल्याने आपापसातील द्वेष, दंगल व फाळणी हे परिणाम झाले व होत आहेत. जेधे-जवळकर यांनी टिळकांना शह देण्यासाठी छत्रपती मेळा भरविणे सुरु केले. त्यामुळे टिळकांच्या शिवजयंतीचा प्रभाव कमी होऊ लागला. 1925 साल छत्रपती मेळ्यांच्या चळवळीचे अगदी कळसाचे वर्ष. राष्ट्रपिता जोतिराव फुले ते 1924-25 पर्यंत या शिवजयंती उत्सवाला वेगळा आशय होता. 

मात्र 1925 रोजी विजयादशमीला आरएसएसची स्थापना झाली आणि शिवजयंती विसरली गेली, गणेशोत्सव सुरू झाला. आजही परिस्थिती वेगळी नाही. शिवजयंतीचा वाद उफाळला तोही उगाच. 19 फेब्रुवारी तारीख मान्य करूनही पुन्हा तिथीनुसार शिवजयंती साजरी करून बहुजनांना संभ्रमात टाकण्याचे काम ही ब्राह्मण मंडळी करत आहे. मध्यंतरी शिवजयंती बंद झाली होती. गणपती महत्व वाढले. त्यातून मग आंबेडकर जयंतीला विरोध करण्याचे काम झाले. शिवरायांची जयंती होत नाही, अन् आंबेडकरांची मिरवणूक निघते म्हणून बहुजनांत द्वेष निर्माण केला. काही ठिकाणी मिरवणुकीवरून वादंगही झाले. ब्राह्मण काही प्रमाणात यशस्वी झाले. वैचारिक व सामाजिक परिवर्तनासाठी कटीबध्द असलेल्या संघटनांमार्फत समाजजागृती होत आहे. त्यामुळे खऱया शिवजयंतीचे महत्व कळत आहे. कोण्या ब्राह्मणाने किंवा मराठ्याने शिवाजी महाराजांची समाधी शोधली नाही आणि शिवजयंती उत्सव सुरू केला नाही तर राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी हे महान कार्य केले आणि छत्रपती शिवराय हे `गोब्राह्मण प्रतिपालक' नसून ते `कूळवाडी कूलभूषण व पोशिंदा कुणब्यांचा' होते, एवढे जरी  आमच्या  बहुजनांना कळाले तरी खूप झाले!  

-----------------

 

इतिहास माणसांना नेहमीच खुणावत असतो. शिव कालखंडाचा इतिहासही अफाट आणि अचाट कर्तृत्वाने भारलेला असल्याने सर्वसामान्य माणसांवर त्याचे अधिराज्य आजही कायम आहे. मात्र,  या शिवकालाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा अत्यंत धूसर आणि अस्पष्ट झाल्याने त्याचा अचूक वेध घेणे अवघड होऊन बसले आहे. इतिहास हे शास्त्र जरी पाश्चात्यांनी भारतात आणले असले तरी बामणांनी ते प्रथम आत्मसात केले. त्यामुळे बामणी इतिहासकारांनी आपल्याला  सोयीचे तेवढेच घेतले. एवढेच नव्हे तर जे सोयीचे नव्हते त्याचे विकृतीकरण करण्यात आले. 

शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषाबद्दलही असाच प्रकार घडला. शिवरायांनी मोगलांविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्याची स्थापना केली. शिवराय मोगलांविरुद्ध लढले म्हणजे एका बलाढ्य सत्ताधाऱ्यांविरूद्ध  लढले हे उघड आहे. असे असतानाही आपल्या राजकारण्यांनी, संशोधकांनी या सत्तेच्या संघर्षाला कमी लेखत त्याला धार्मिकतेची डूब दिली. त्यामुळे धार्मिक दंगलीत शिवरायांच्या नावाचा वापर होऊ लागला. यासारखी लांच्छनास्पद  गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. परधर्म द्वेषावर ज्यांचे राजकारण उभे आहे, अशा राजकीय पक्षांनी धार्मिक शिवरायच पुढे आणले. तर सत्ताधाऱयांनी आपल्या सत्तास्वार्थासाठी फक्त शिवरायांच्या नावाचा जप आरंभला. यामुळे शिवरायांच्या कार्याचा मूळ हेतूच लोप पावला. 

महापुरुषांना त्या त्या जातीत विभागून ठेवले की त्यांचे मोठेपण आपोआपच कमी होते हे पुर्वपारंपारिक षडयंत्र आजही सुरुच आहे. अगदी काल परवा झालेली संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती किती बहुजन समाजाने साजरी केली. लोककल्याणाच्या मार्गाची शिकवण देणाऱ्या रविदासांना चांभारांपुरते मर्यादीत करून त्यांचे मोठेपण दाबून टाकले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आज प्रत्येक महापुरुषाने कधीही जातीपुरता मर्यादीत विचार केला नाही. म्हणूनच ते महापुरुष ठरतात. पण या जातीनिर्मात्यांनी व्यवस्थितपणे त्या महापुरुषांचे विचार जातीतच अडकवून ठेवले त्यासाठी आता जातीअंताच्या लढाईत शिवरायांच्या योगदानाचा अभ्यास करणे आज गरजेचे आहे.  कारण मरायला टेकलेल्या जातीव्यवस्थेचा अंत हा आजच्या घडीला कळीचा प्रश्न आहे. 

दिवा ज्याप्रमाणे विझतांना अचानक मोठा प्रकाश देतो त्याप्रमाणे जातीव्यवस्था मरण्यापूर्वी शेवटचे आचके देत आहे. अशा परिस्थितीतही मरणासन्न जातीव्यवस्थेला पुन्हा उर्जीतावस्था प्राप्त व्हावी यासाठी बामणी संघटना जोमाने प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत समस्त पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन जातीअंताची लढाई लढायला हवी. त्यामुळे इतिहासकाळात कोणकोणत्या महापुरूषांनी जातीव्यवस्थेविरूद्ध कामगिरी केली आहे ती आजच्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. इतिहासकाळाचा मागोवा घेताना आपल्याला हेच संघर्षाचे सूत्र आढळून येते. जातीव्यवस्था समर्थक बामणी परंपरांविरूध्द जातीअंतक अब्राह्मणी परंपरा यांच्यातील हा  संघर्ष आहे. त्यामुळे आज जातीव्यवस्था अंताचे प्रबोधनाचा हा संघर्ष लढा पुढे नेणे गरजेचे आहे. 

कारण हा संघर्ष अधोरेखित करणे ही काळाची गरज आहे. जातीव्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी‚ज्यांनी विद्रोह पुकारला त्यांना‚त्यांना जीवे ठार मारण्याचे प्रयत्न बामणी परंपरेने केले. समतेचा मंत्र सांगणाऱ्या चक्रधरांचे नाक, कान कापून नंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. बसवेश्वर व त्यांच्या शिष्यांनाही ठार मारण्यात आले. बौद्ध भिक्खूंच्या खुलेआम कत्तली करण्यात आल्या. त्यामुळे जातीअंताची लढाई ही किती जीवघेणी आहे हे इतिहासात डोकावतांना दिसून येते. छत्रपती शिवराय हे तर बहुजन समाजाचे आजही जीव की प्राण आहेत. अशा महापुरूषाने जातीव्यवस्थेविरोधात केलेला विद्रोह हाच आजच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देणारा ठरणार आहे. शिवरायांच्या  जयंतीदिनी त्यांचे स्मरण करतानाच त्यांनी दिलेल्या लढ्यातून प्रेरणा घेऊन ही जातीअंताची चळवळ पुढे नेणे आवश्यक आहे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.  

सुबोध शाक्यरत्न : ठाणे  : ९९६९७४७४७६
---------------------------

कुठला शिवाजी आमचा ?
शिवाजी दोन छावणीत विभागला आहे. एका छावणीला तो हिंदूपदपातशहा व मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून मिरवायचा आहे. तर दुसऱ्या छावणीसाठी तो केवळ कुळवाडी भूषणच नाही तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या स्वराज्याचा राजा आहे. रयतेचा राजा आहे. ज्यांच्या पूर्वजांनी, हयातीतच शिवाजीला साथ देण्याऐवजी त्याची वारंवार कोंडी केली त्या शिलेदारांचे वारसदार पहिल्या छावणीत आहेत. ही स्वराज्यद्रोह्यांची छावणी !

दुसरी छावणी ज्यांचे पूर्वज शिवाजीसाठी प्राणार्पणास सिद्ध झाले त्या बारगीरांची आहे. हे मुख्यतः काटक कष्टकरी आहेत, ज्यांना मावळे म्हटले जाते. पहिल्या छावणीला शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे, अफजलखानाचा कोथळा हा खूनखराबाच शिवाजीची ओळख बनवायचा आहे. पण याहून जास्त खूनखराबा केलेले पराक्रमी राजे इतिहासाच्या पानापानांवर तलवार परजताना दिसताहेत.  

मग रयतेच्या मनात त्या महापराक्रमींना का स्थान मिळाले नाही ? याचे उत्तर इतिहासकार शेजवलकर अनाहूतपणे देऊन जातात.शेजवलकरांनी शिवबाच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याची आठ भागात विभागणी केली व दाखवून दिले आहे की, त्यातील सात भाग हे शिवाजीच्या मुलकी कारभारातील व्यस्ततेचे आहेत व फक्त एक भाग लष्करी कारवायांचा आहे! 

सतत कमरलेला तलवार लटकवलेला शिवाजी आम्हांला या स्वराज्यद्रोहींनी दाखवला आहे. रयतेच्या मनात स्थान मिळविलेला मुलकी कारभारातून आपले प्रजावत्सल मन सतत प्रगट करणारा शिवाजी त्यांनी दडवला.
शेती हा तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होता. महसूलाचा प्रमुख स्त्रोत तोच होता. हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा वारंवार बळी ठरतो, म्हणून त्याच्याकडून शेतसारा घेताना तो शेतीच्या उत्पादनाचे नियतकालिक अवलोकन करुन त्याप्रमाणे घ्यावा. जर पीकच पोटापुरते आले आहे तर शेतसारा माफ करावा. जिथे वरकड झाले आहे तेथे त्याप्रमाणातच पट्टी घ्यावी. बी बियाण्यास मोताद असणाऱ्यांना ते सरकारातून द्यावे आणि पीक आल्यावर ते उजवून घ्यावे. रोखीत मोबदला मागू नये. शेतकऱ्याला तोशीस पडेल असा व्यवहार अधिकाऱ्यांनी कदापि करु नये, अशी सक्त ताकीद देणारा राजा रयतेने त्याआधी अनुभवला नव्हता.

शेतजमिनची एकूण 17 प्रकारची प्रतवारी करून त्याप्रमाणे शेतकऱ्याची कुवत ठरविली जाई. केवळ किती क्षेत्र आहे यावर त्याची शेतसारा देण्याची कुवत निर्धारित केली जात नसे." रयतेच्या भाजीच्या देठासही तू निमित्त होता कामा नये. आंबा, साग आदी वृक्ष आरामाराचे बहुत उपयोगीचे. पण ही झाडे रयतेने आपल्या लेकरांसारखी वाढविली आहेत. ती तोडली असता त्यांच्या दु:खास पारावार काय ? हे वृक्ष धन्यास राजी करून रोकड मोजून घ्यावेत, बलात्कार सर्वथा न करावा ..." ही आज्ञापत्रातील काही वाक्ये आपल्याला शिवबा पिढ्यानपिढ्यांचे दैवत का बनला याचा प्रत्यय देतात.शेतकऱ्याच्या बांधावर रमणारा, तलवारीवर नव्हे तर नांगरावर प्रेम करणारा आमचा शिवाजी आहे !

अफझलखानच्या बाजूने आपली पथके घेऊन उतरलेल्या शिळिमकर, बांदल, पिलाजी मोहिते, बाबाजी भोसले यांच्या वारसदारांनी आम्हाला शिवाजी शिकवू नये.त्याचप्रमाणे मिर्झा राजे जयसिंगाला विजय मिळावा म्हणून यज्ञांआडून दक्षिणेची लाच लाटत स्वराज्याची सारी गुपिते मिर्झाला सांगून ज्यांनी शिवबावर नामुष्कीचा पुरंदर तह व आग्रा कैद लादली व दग्याने ज्यांनी संभाजी राजांना मोगलांकडे सुपूर्द केले त्या स्वराज्यद्रोही पळीपंचपात्रवाल्यांनी देखील आम्हाला शिवबा शिकवू नये !ज्या आमच्या कष्टकरी मुस्लिम बांधवांच्या विरोधात सदोदित तुम्ही शिवाजी दाखवत आलात ते मुस्लिम शिवाजीशी जेवढे एकनिष्ठ राहिले तेवढे तुमचे पूर्वज राहिले नव्हते !
इतिहासाचे एक पान असे काढून दाखवा, जिथे शिवरायांच्या सोबत असणाऱ्या एका तरी मुसलमानाने त्यांना दगा दिलेला आहे.

छञपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेटीपूर्वी वाईमध्ये शेकडो पुरोहितांनी अफजलखानाला महाराजांवर फंदी-फितुरीने विजय मिळविण्यासाठी आशीर्वाद दिला होता. याच पुरोहित मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला आक्षेप घेतला होता म्हणून काशीहून गागा भट्टला बोलवावे लागले होते. महाराष्ट्राच्या मातीला फंदी-फितुरी आणि गद्दारीचा पुरातन इतिहास आहे. ब्रिटिशांच्या काळातही अनेक स्वातंत्र्यसैनिक, आंदोलकांना फितुरीने, खबरी पुरवून पकडून देणारे ब्रिटिश हस्तक, एजंट, दलाल कोण होते, हे सर्वश्रुत आहे. पण हा महाराष्ट्र सर्व गद्दारांना पुरून उरलाय.

एक पान असे काढून दाखवा, जिथे कुणी मांग, महार, बेरड, भिल्ल, रामोशी, भंडारी, कोळी, आग्री व सामान्य मराठा, कुणबी, माळी, धनगर, वंजारी आणि कारागीर जातीतून आलेल्यांनी शिवाजीशी दगलबाजी केली आहे.
आमचा शिवाजी हा हिंदूपदपातशहा नाही. गोब्राम्हण प्रतिपालक तर मुळीच नाही. तो रयतेसाठी, रयतेला घेऊन रयतेचे राज्य आणणारा, फक्त 'शिवबा' आहे !

- किशोर मांदळे, पुणे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या