आरएसएस संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगावच्या घाट परिसरात 91 वर्षांपूर्वी जंगल सत्याग्रह केला होता. असा इतिहास शोधून त्या सत्याग्रहाच्या ठिकाणी एक भव्य संग्रहालय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानेतर्फे तयार करण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार यांच्या जीवकार्यावरील सर्व बाबी येथे राहणार आहेत. पुस्तकालय आणि विविध आंदोलनाचे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प संग्रहालयात राहणार आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. या संग्रहालयाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश प्रकल्प सल्लागार आशीष कुमार यांनी दिले आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात साजरा केला जातो, त्याअंतर्गत आजादी का अमृत महोत्सवांतर्गत देशभरात विविध कार्यक्रम होत आहे. त्याच स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा दांडीयात्रा होती, मिठाचा सत्याग्रहचे विदर्भात स्वरूप म्हणजे जंगल सत्याग्रह आहे. त्याच जंगल सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभागी झालेले हेडगेवार यांनी 21 जुलै 1930 रोजी 10 हजार लोकांसह येथे जंगल सत्याग्रह केला होता. आता त्याला स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा भाग म्हणून तसेच डॉ हेडगेवार यांना आदरांजली म्हणून येथे भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे
यवतमाळ येथील दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेने राज्यसभेचे खासदार डॉक्टर राकेश सिन्हा यवतमाळ मध्ये आले असता या जंगल सत्याग्रह बाबत संग्रहालय व्हावे असा विचार मांडला होता. त्यानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर राकेश सिन्हा डॉ. हेडगेवार यांच्यावर संशोधित चरित्र लिहिले. त्यात या सत्याग्रहबाबत माहिती होतीच आणि त्यानी राज्यसभेत 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रश्न सुद्धा उपस्थित केला. या ठिकाणी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्य आणि जंगल सत्याग्रह निमित्त संग्रहालय उभारण्याची मागणी सरकारला केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे याच ठिकाणी भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे, तसे पत्र दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेला प्राप्त झाले आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात इंग्रजांविरोधात आंदोलन सुरू होते, त्याच वेळी 1930 च्या काळात त्यावेळी विदर्भ आणि मध्यप्रांत जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. विदर्भ आणि मध्यप्रांत मिठागरे नसल्याने जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळेस लोकनायक बापूजी यांनी जिल्ह्याच्या पुसद परिसरातिल धुंदी जंगलामध्ये जंगल सत्याग्रहाची चळवळ उभी केली. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या करडगाव घाटामध्ये 21 जुलै 1930 रोजी जंगल सत्याग्रहात सहभागी झाले. यवतमाळच्या धामणगाव रस्त्यावरील धरणगावच्या घाटामध्ये जंगल सत्याग्रह झाला होता, त्या वेळेस हेडगेवार यांच्या सोबत ११ जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. त्यांना कारावासाची शिक्षेत यवतमाळच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वाना कळावं यासाठी येथे संग्रहालयात उभं राहतेय, अशी माहिती दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी दिली. त्यामुळे आता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचे योगदान काय हा प्रश्न आरएसएसची भळभळणारी जखम आहे. या जखमेवर फायनली उतारा काढायचं ठरलेलं आहे. सत्य असत्याची सरमिसळ असलेला नवा इतिहास नेमका कसा मांडायचा हे या संग्रहालयामधून साकार करण्यात येणार असल्याची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.
आता मूळ मुद्दे.
- विदर्भात मिठागर नव्हती म्हणून जंगल सत्याग्रह केला गेला.पण मिठाच्या सत्याग्रहाला देशभरातून लोक दांडीला गेले होते.तिथे दांडीला महाराष्ट्रातून सुद्धा लोक गेले होते.मग विदर्भातून लोकांनी जाणे शक्य नव्हते का ? मिठावर लादलेला कर देणार नाही हि भूमिका होती आणि तोच सत्याग्रह होता ना ?
- सत्याग्रह करायला सरसंघचालक म्हणून दुसऱ्या माणसांची नेमणूक करण्याची गरज काय होती ? मग संघाचा सहभाग आंदोलनात होता कि डॉक्टर व्यक्तिगत पातळीवर आंदोलनात सहभागी झाले होते ? जर व्यक्तिगत पातळीवर सहभागी झालेले असतील तर आरएसएसचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नव्हता हा मुद्दा पुन्हा अधोरेखित होत नाही का ?
- आरएसएसचा सहभाग सिद्ध करायला स्मारक उभारणे आणि त्याचा मिठाच्या सत्याग्रहाशी संबंध जोडणे हे गांधीच्या आंदोलनाला मान्यता देणे , स्वातंत्र्य मिळायला गांधीची भूमिका आणि असहकार , सत्याग्रह आंदोलन महत्वाचे होते हे मान्य करणेच नव्हे काय ? गांधी विचारांचा जय म्हणून हुरळून जाणाऱ्या लोकांनी चौथा आणि शेवटचा मुद्दा नीट वाचावा.
- भविष्यकाळात दांडी मार्च विस्मृतीत ढकलला जाऊन पुसदच्या स्मारकाला महत्व येऊन दरवर्षी तिथे मेळावे वगैरे भरायला लागले तर पुढल्या पिढ्यांना स्वातंत्र्य जंगल सत्याग्रहाने मिळाले असा इतिहास शिकवला जाणार नाही काय ? अमर ज्योती ज्या पद्धतीने हटवली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या सत्तर वर्षातल्या वास्तू ,संस्था, आस्थापना ,कंपन्या विकून सगळ उध्वस्त करायचं काम सुरु आहे त्याची एकत्रित संगती कुणाला लागते आहे का ?
-आनंद शितोळे
0 टिप्पण्या