Top Post Ad

पेपर फुटल्यावरही का घेतल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ?

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर म्हाडा मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज परीक्षा होणार होती. मात्र तत्पूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी उशिरा रात्री एक व्हिडिओ जारी करत, रविवारी होणारे पेपर रद्द केल्याची माहिती दिली. 


 'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' - जितेंद्र आव्हाड

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत. तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पेपरफुटीवर आपले स्पष्टीकरण दिले. आज म्हाडाची परीक्षा होणार होती, त्यापुर्वी आव्हाड यांनी रात्री ट्विट करत परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले, त्यानंतर राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच परिक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आज दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले.

आरोग्य विभागाच्या  भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या  परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय.  सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.  पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय.

विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, ठाकरे सरकारला फक्त टक्केवारीतच रस असल्याचे म्हटले आहे. "प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. मात्र युवापिढीच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्याला बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. 

दरम्यान आरोग्य भरती परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ झालेला असून गट ‘क’ व ‘ड’चे परीक्षेचे पेपर फुटल्याचे आम्ही सांगितलेले होते. परंतु आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही परीक्षा रद्द करण्यात येण्यासाठी परीक्षांवर सामूहिक बहिष्कार आम्ही टाकण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. पेपरच्या दिवशी ठाण्यातील साकीनाका येथील विद्या मंदिर येथे काही जणांकडे आधीच पेपर असल्याचे स्पष्ट झाले व पेपर फुटल्याचेही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर गोंधळ उडाला. पेपर फुटल्याचे आधीच स्पष्ट होऊनही परीक्षा कशासाठी घेण्यात आल्या हे आम्हाला समजत नाही, असा सवाल एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय आरोग्य विभागाचा तांत्रिक सहसंचालक महेश बोटले याने गट ‘क’ व ‘ड’चा पेपर लातूरचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्या साहाय्याने फोडल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. 


खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. त्यामुळे या पुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. शिवाय पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. रविवारी म्हाडाच्या परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली असल्याने पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पेपर फुटण्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या संदर्भात आव्हाड यांनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.

 प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता,  पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ती नामुष्की ठरली असती. शिवाय, अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींवर अन्यायकारक ठरले असते. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस एकाचवेळेस कामाला लागले आणि वशिल्याचे तट्टू म्हाडामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम केले, वास्तविक पाहता, या प्रकरणात मी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. पण, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी आपण आक्रमक भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वीच याच कंपनीने पुणे पोलीस दलाची परीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास तरी कसा दाखवणार? असा सवाल करून परीक्षा रद्द केल्याबद्दल आपण विद्यार्थ्यांची माफी मागत आहोत. मात्र, ही परीक्षा रद्द करून, वशिल्याचे तट्टू बाजूला सारून हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतली आहे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केलं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com