अखेर दिवावासियांच्या डंपिंगमधून सुटकेला मिळाला मुहूर्त

भंडार्ली येथील डंपिंग जागेचा करारनामा

 ठाणे  : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा येथील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला असून कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. आज जागा ताबा करारनाम्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केली. यावेळी महापौर नरेश म्हस्के  उपस्थित होते  त्यामुळे आता दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले,  महापालिकेच्या या स्वत:च्या जागेवर लवकरच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्याकामी पूर्तता केली असून त्यास मंजूरी मिळेल व लवकरच हा प्रकल्प सुरू होईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनिता मुंडे, माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, शैलेश पाटील, दिपक जाधव, अमर पाटील, दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, दिपाली भगत अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, घनकचरा विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर आदी उपस्थित होते.

            ठाणे शहरातील दैनंदिन बहुतांश कचरा हा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत होती. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेला स्वत:ची जागा असावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेची पाहणी करण्याचे काम सुरू होते. अखेर मौजे भंडार्ली येथील अंदाजे 10 एकर जागा इतकी खाजगी जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली,  यावेळी दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहराचा कचरा दिवा येथील डंपिंगग्राऊंडवर टाकण्याची परवानगी दिली होती. 

वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाढणारा कचऱ्यामुळे दिवावासियांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मात्र भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासियांची डंपिंग्र गाऊंड समस्येतून मुक्तता होणार असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी ‍दिव्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आभार व्यक्त केले. भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे.  त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाला विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या