नवी दिल्ली,
ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी केला. संविधान दिनाच्या निमित्तानं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी पुढे म्हणाले, आज जर संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर आपण संविधानाचं एक पानही लिहू शकलो असतो का? ही शंका आहे. देशभक्तीची आग आणि फाळणीचं दु:ख या पार्श्वभूमीवर देशात संविधानाची निर्मिती झाली, संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम स्थान दिले, मात्र कालांतराने राजकारणाचा नेशन फर्स्टवर इतका परिणाम झाला की, देशाचे हित मागे राहिले. असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केलं होतं. आज आपल्याला संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर काय झालं असतं? स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहित सर्वोच्च हाच सर्वांच्या मनात मंत्र होता. विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होतं.
आजच्या संदर्भात त्याकडे पाहिलं तर संविधानाचं एक पानही आपण लिहू शकलो असतो का? राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे. भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते.
काँग्रेससोबत देशातील १४ विरोधी पक्षांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी, आययूएमएल आणि डीएमके यांचा समावेश आहे. खरे तर काँग्रेस आणि तृणमूलने या कार्यक्रमात सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. यानंतर काँग्रेसच्या आवाहनावर इतर पक्षांनीही कार्यक्रमाला न येण्याचे जाहीर केले.
0 टिप्पण्या