आया-बहिणींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाते आणि दलित बांधवांना पशूप्रमाणे वागवण्यात येते. तरीही अत्याचारी शक्ती राजरोस सर्वत्र वावरु शकतात हे पाहिल्यावर मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जनजागरण करण्याचा प्रारंभ केला. यातूनच दलित पँथर चळवळीचा उदय झाला. त्यामध्ये साहित्यिकांची प्रेरणा कारणीभूत झाली. बाबूराव बागूल, कवी नारायण सुर्वे, प्र.शी.नेरुरकर, डॉ.सदा कऱहाडे, कवी श्रीकृष्ण पोवळे, सतीश काळसेकर व विजय तेंडूलकर यांचा यामध्ये प्रामुख्याने सहभाग होता. आघाडीचे व संस्थापक नेते म्हणून राजा ढाले, नामदेव ढसाळ, प्रल्हाद चेंदवणकर, अर्जुन डांगळे, उमाकांत रणधीर, ज.वि.पवार इत्यादींचा समावेश होता. तसेच साहित्यिक नसलेले परंतु सभासंमेलनामधून बोलणारे भाई संगारे, लतीफ खाटीक, जयदेव गायकवाड इत्यादी कार्यकर्तेही होते.
9 जुलै 1972 रोजी दलित पँथरची स्थापना झाली. त्यानंतर महिनाभरातच मोठ्या जोमाने पँथर सक्रिय समाजकारणात उतरला. डॉ.म.ना.वानखेडे यांनी अमेरिकेतल्या निग्रो व़ाङमयाबद्दल माहिती सांगितली. अमेरिकेतला निग्रो माणूस आता जागृत झाला आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला आहे. तो काळा रंग हेच सौंदर्याचे प्रतिक आहे अशी घोषणा देऊन आपल्या न्यायासाठी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी गोऱया अमेरिकनांच्या विरोधात डोक्याला कफन बांधून रस्त्यात उतरला आहे. त्याने संतप्त निग्रो तरुणांची ब्लॅक पँथर ही लढाऊ संघटना उभारलेली आहे. तो लिहीतही आहे. आणि लढतही आहे. दलित साहित्यिकांनी आणि नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी याच वाटेने जाणे आवश्यक आहे. अशी सुप्त सूचनाही डॉ.वानखेडे यांनी त्यावेळी केली होती.
15 ऑगस्ट 1972ला भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सवाचा दिवस. परंतु हा दिवस पँथरनी ‘काळा स्वातंत्र्य दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. ‘साधना’ साप्ताहिक साने गुरुजींच्या प्रेरणेतून निर्माण झाले. त्याचे तत्कालिन जागृत पत्रकार डॉ.अनिल अवचट यांनी वैचारिक लढा देण्यासाठी पँथरने सुरुवात करावी यासाठी ‘दलित साहित्य विशेषांक’ काढला. या रौप्यमह्त्सोवी विशेषांकात अवचटांचे संपादकीय सोडले तर बाकी सबकुछ दलित साहित्यच होते. म्हणूनच हा विशेषांक ‘दलित साहित्य विशेषांक’ म्हणून गाजला. बहुचर्चेला गेला. कारण त्यात होता दलितांवर गावोगावी होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करुन उठलेल्या संतप्त दलित तरुणांचा बुलंद आवाज. हा आवाज बुलंद करणाऱ्यामध्ये राजा ढाले, अर्जुन डांगळे, दया पवार, प्रल्हाद चेंदवणकर हे मुंबईचे आणि त्र्यंबक सपकाळे सारखे मराठवाड्यातले तरुण होते.
कवी त्र्यंबक त्यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं होतं.
परमेश्वरा,तुझ्यासमोर
माणुसकीवर केले बलात्कार
तुझ्या चमच्यांनी
तरीही तु षंढच!...............
आम्ही गॉडमेकर!
देतो नोटीस तुझ्यावर
निग्लिजन्स ऑफ ड्यूटीची
‘युवर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड’
‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखातील पुढील मजकुरांवरुन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जातीयवादी प्रवृत्तीचं पित्त खवळलं. ते एका अर्थी बरच झालं. कारण त्यामुळे दलितांना हरिजन म्हणून सहानूभुती दाखविणाऱ्या उच्चभ्रूंची ही फॉकलंडवरच्या ‘भडव्या’ एवढीही कशी उच्च नाही हे नागडं सत्य बाहेर पडलं. दलित स्त्रीच्या इज्जतीची किंमत केवळ प्रतिक असलेल्या राष्ट्रध्वजाच्या अवमानापेक्षा कमी कशी असा खडा सवाल राजा ढाले यांनी बिनधास्त आणि बेधडकपणे केला. महाडच्या बौद्ध साहित्य संमेलनात डॉ.म.ना.वानखेडे यांनी नीग्रो साहित्य आणि ब्लँक पँथर यांच्याविषयी जे प्रदीर्घ भाषण केलं होतं. ते दलित तरुणांना मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायक ठरलं. म्हणूनच ज्यावेळी ‘साधना’ मासिकावर आक्रोश करणाऱ्या पुणेरी पगड्या आणि उपरणी यांच्याविरोधात तरुणांनी साधना कचेरी ते सर्किट हाऊस या मार्गाने मोर्चा काढून (3-4 सप्टेंबर 1972) शनिवारवाड्यावर जाहीर सभा घेतली तेव्हा नामदेव ढसाळ यांनी एका सिनेमाच्या कापडी पोस्टरला काळा रंग फासून त्यावर लाल रंगाच्या अक्षरामध्ये ‘दलित पँथर’ अशी अक्षरं असलेला फलक फडकाविला तेव्हा सर्वांनीच त्याचं उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून स्वागत केलं. नंतर सनातन्याच्या पेठापेठांतून दलित पँथरचे ध्वज फडकावित मोर्चा घुमत फिरत होता.
या मोर्चाची फलश्रूती अशी की मुंबई - पुण्याचे दलित साहित्यिक आणि दलित तरुण कार्यकर्ते आता दलितांवर सवर्णांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा मुकाबला प्रत्यक्षात करण्यासाठी डोक्याला कफन बांधून रस्त्यात उतरलेले आहेत ही गोष्ट सगळ्या वर्तमानपत्रामधून झळकली आणि संबंध महाराष्ट्रातील दलित समाजामध्ये नवचैतन्याचं वारं सळसळू लागलं. मुंबई-पुण्याप्रमाणेच औरंगाबाद, नागपूर, परभणी, नांदेड, नाशिक, सातारा, सांगली इत्यादी आणि इतरही ठिकाणच्या ज्या ज्या कुणा सुशिक्षीत तरुणाला लिहावसं वाटत होतं तो तो तरुण कवी लेखक स्वप्नाळू कथा कविता लिहिण्याचं सोडून देऊन दलित पँथर म्हणून रस्त्यात प्रत्यक्ष लढ्यासाठी उतरू लागला.
सुरुवातीला पँथरच्या नेत्यांपुढे दलित, बौद्धांपुढे होणाऱ्या अनान्वित अन्याय-अत्याचारांना, बहिष्कारांना आळा घालणे, त्यासाठी शासनावर दबाव आणणे, अत्याचारी सवर्ण समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे, त्याचप्रमाणे जे दलित, बौद्ध तसेच गोरगरीब स्त्रीया आणि पुरुष गावगुंडाच्या गुंडगिरीपुढे आणि पाटील, जमीनदार तसेच सरकारी पुंडापुढे हतबल होताहेत त्यांचे मनोबल वाढविणे, त्यांना ‘मरु किंवा मारु’ अशा संघर्षासाठी उभे करणे हाच कार्यक्रम होता. पण आता त्यांना सभा संमेलनं, चर्चा, भिंतीपत्रके, मोर्चा इत्यादी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. ह्याचा अर्थ दलित साहित्य हे आता फक्त वर्तमानपत्रे अगर मासिके किंवा नियतकालिके यांच्या पुरतेच मर्यादित न राहता ते थेट दलित, समाजात अगदी त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे अत्यंत अल्पकाळात दलित पँथर ही दलित समाजाप्रमाणे पुरोगामी लोकांमध्येही वणव्यासारखी पसरली. दलित साहित्यिक हजारोंच्या सभा गाजवू लागले. पुढारी म्हणून मिरवू लागले. प्रसिद्धीच्या झोतात डुलू लागले.
पँथरच्या या वाढीला, लोकप्रियतेला काही लोक ‘ती एक लाट होती’ असं म्हटलं तर ते खरं आहे. तथापि ती ध्येयहीन वा दिशाहिन मात्र मुळीच नव्हती. तसा आरोप करणे म्हणजे दलित पँथरबाबत साकल्याने विचार न करणे व दलित पँथरने मर्यादित क्षेत्रच निवडलं होतं असा आरोप करण्यासारखं होईल. पण मर्यादित का होईना दलित पँथरला त्यावेळी अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. कारण दलित पँथरच्या वाढत्या ताकदीमुळे अनेक अखिल भारतीय राजकीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यात प्रामुख्याने भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट होते. त्याचप्रमाणे समाजवादी आणि प्रजासमाजवादी पक्षही होता. अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दलित पँथर आपल्याच झेंड्याखाली येईल. असे वाटत होते. तर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष पँथरला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी उत्सूक होता. परंतु दलित पँथर म्हणून आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून घ्यायचं नाही किंवा कुणाला बांधू द्यायचं नाही. हे पँथरनी पक्के ठरविले होते. असे असूनही एखाद्या संघटनेच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना घडून जाते की त्या संघटनेचा वटवृक्ष आभाळाला जाऊन मिळतो, पँथरच्या वाटचालीतही अशीच एक अपूर्वाईची घटना घडली. किंबहूना ती घटना दलित पँथरला भारतभर नव्हे, तर जगभर प्रसिद्धी देण्यास कारणीभूत झाली.
ती घटना म्हणजे 1974साली मध्य मुंबई मतदार संघामध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक. खासदार आर.डी.भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होणार होती. कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली गिरणीकामगारांचा चाललेला बेचाळीस दिवसांचा संप आणि दलित पँथरने दलितांवरील अन्याय अत्याचाराला काँग्रेस पक्षाला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध चालविलेला कडवा प्रचार या दोन कारणांमुळे या निवडणूकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. वातावरण एकदम काँग्रेसविरोधी बनलं होतं. म्हणूनच कॉग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार काँग्रेसने रिपब्लिकन पक्षातील दोन्ही गट आणि शिवसेनेची युती केली होती. तरीसुद्धा कांग्रेसला निश्चित यशाची खात्री नव्हती. कारण मध्य मुंबईतले दोन-तृतीयांश मतदार दलित समाजातले होते. आणि त्या सर्वांवर दलित पँथरचा जोरदार प्रभाव होता. दलित पँथरचे नेते ज्यांना मते द्या म्हणून सांगतिल त्यांना ती जातील असे काँग्रेसला वाटत होते. म्हणूनच काँग्रेसने सरळ-सरळ दलित पँथरच्या कार्यकारीणीशी संपर्क साधला.
परंतु दरम्यान भडकलेल्या वरळीच्या दंगलीचा परिणाम होऊन तसेच त्यानंतर पँथरच्या मोर्च्यावर झालेल्या लाठीमाराचा निषेधार्थ मध्य मुंबईतीला दलित मतदार पेटून उठला आणि लोकसभेच्या पोटनिवडणूकीवर बहिष्कार टाकला. आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तो म्हणजे काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार बँ.रामराव आदिक यांचा दारुण पराभव झाला आणि ज्यांची सुतरामही शक्यता नव्हती अशा काँम्रेड (उजवे कम्युनिस्ट) रोझा देशपांडे ह्या बहुमताने निवडून आल्या. काँग्रेसबरोबर अर्थात शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचाही हा पराभव होता. कारण त्यांची युती होती. राजकीय दृष्ट्या पँथरचे महत्त्व असे सिद्ध झाले.
0 टिप्पण्या