Top Post Ad

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये - उपमुख्यमंत्री

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, या तत्त्वावर मी काम करतो. “माझे काम बरे आणि मी बरा’ ही माझी कामाची पद्धत आहे. कोर्टकचेऱ्या करण्यास मी रिकामा नाही असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.  सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री तसेच कर्जावरून लक्ष्य ठरलेले अजित पवार यांनी शुक्रवारी २००७ पासून आतापर्यंत राज्यातील ६४ साखर कारखान्यांची विक्री तसेच भाडेतत्त्वावर देण्यात आल्यासंबंधीची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. यात सध्या भाजपवासी झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या काळातच सर्वाधिक ४५ कारखान्यांची विक्री प्रक्रिया पार पडल्याचे दाखवून देत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. 


 भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साखर कारखान्यांची विक्री तसेच भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर अजित पवारांशी संबंधित कारखाने, त्यांच्या नातेवाइकांशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रामुख्याने पवारांचे लक्ष्य असून पवार यांनी पत्रकार परिषदेत जरंडेश्वर कारखाना विक्रीबाबत आपल्यावर व कुटुंबावर सतत चुकीचे आरोप करण्यात येत असून निव्वळ कुणाची तरी बदनामी करायची, कुणाला तरी लक्ष्य करायचे या उद्देशाने काही जण इकडेतिकडे फिरत बसले आहेत, असे सांगत पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना मुंबईतील गुरू कमोडिटी यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार विकत घेतला. त्यापूर्वी बीव्हीजीचे हनुमंत गायकवाड यांनी कारखाना चालवण्यास घेतला होता. परंतु त्यांना ताेटा आल्याने त्यांनी दुसऱ्या कंपनीस चालवण्यास दिल्याचे पवार म्हणाले.

राज्यातील विक्री केलेल्या साखर कारखान्यांची जी कागदपत्रे पवार यांनी सादर केली त्यानुसार भाजपवासी झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते सुभाष देशमुख सहकारमंत्री असताना तसेच विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या काळात सर्वाधिक कारखान्यांची विक्री झाल्याचे सांगितले. जरंडेश्वर कारखाना मुंबईतील गुरू कमोडिटी यांनी विकत घेतला. त्यापूर्वी बीव्हीजीचे हनुमंत गायकवाड यांच्याकडे तो होता. परंतु तोटा आल्याने त्यांनी दुसऱ्या कंपनीस कारखाना चालवण्यास दिला. मात्र, कारखाना विक्रीबाबत माझ्यावर आणि कुटुंबावर सतत आरोप करण्यात येत आहेत, असे पवार यांनी नमूद केले.  

हर्षवर्धन पाटील 32, बाळासाहेब पाटील 11,  सुभाष देशमुख 18, चंद्रकांत पाटील 07, पतंगराव कदम 05, सुशीलकुमार शिंदे 02 या सहकारमंत्र्यांच्या कार्यकाळात एवढ्या साखर कारखान्यांची विक्री व भागीदारी/ भाडेतत्त्वाचे करार झाले. खासगी कंपन्यांना विक्री झालेल्या अन्य साखर कारखान्यांची माहिती देताना अजित पवार यांनी दहावा रकाना जाणीवपूर्वक आखला आहे. यात कोणत्या सहकारमंत्र्यांच्या कार्यकाळात या कारखान्यांची विक्री झाली याची माहिती देण्यात आली असून हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक कारखान्यांची विक्री झाल्याचे अजित पवारांनी सूचित केले आहे.

पवार यांनी सादर केलेली कागदपत्रे मी पाहिलेली नाहीत. परंतु कारखाना विक्रीची परवानगी सहकारमंत्री देत नाही. ती राज्य सहकारी बँक देते. मी काेणत्याही कारखान्यावर संचालक नाही. ना मी कारखाना विक्री केला. -भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com