लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्यांच्या गाड्यांखाली चिरडून ठार मारलेल्या पाच शेतकरी हुतात्म्यांच्या शहीद अस्थिकलश यात्रा १२ ऑक्टोबरपासून देशभर भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध प्रचार करत, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी व अटक याची मागणी करत, आणि ११ महिने पूर्ण केलेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलन बळकट करण्याचे आवाहन करत फिरत आहेत. महाराष्ट्रातील शहीद कलश यात्रेचा प्रारंभ २८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी पुणे शहरातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यापासून झाला. ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ अशा विद्रोही पुस्तकांचे लेखक, शेतकऱ्यांचे कैवारी, जातिव्यवस्थेचे शत्रू आणि सावित्रीबाईंसह भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे संस्थापक असलेल्या महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यापासून या शेतकरी यात्रेची सुरुवात व्हावी हे सर्वार्थाने योग्यच होते.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि जनआंदोलनांची संघर्ष समिती या तीन व्यासपीठांत असलेल्या सर्व घटक संघटनांतर्फे हा कार्यक्रम एकजुटीने आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलेल्या ऐतिहासिक फुले वाड्यात या सर्व संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी, आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी पुष्पहार घालून या शहीद कलश यात्रेची सुरुवात झाली.
पुणे मार्केट यार्ड येथील हमाल भवनात या प्रसंगी जाहीर सभा झाली. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातून परत येताना मृत्युमुखी पडलेल्या लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई तडवी यांचे नाव सभागृहाला देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून सभेला चांगली उपस्थिती होतीच, शिवाय महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांतून कार्यकर्ते आले होते. मुंबईतून कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कामगार प्रतिनिधींची एक बस, आणि सोलापूरहून माकप-प्रणित जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांची आणखी एक बस आवर्जून आल्या होत्या. या कार्यक्रमातील महिलांची संख्या लक्षणीय होती. अरविंद जक्का यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यावर अजित अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी मानव कांबळे हे होते. विलास किरोते यांनी आभार मानले.
लखीमपूर खेरी येथील पाच शहीद आणि या शेतकरी आंदोलनातील आजवरचे एकूण ६३१ शहीद यांना सर्वप्रथम आदरांजली वाहण्यात आली. येथे झालेल्या प्रभावी सभेत डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, डॉ. अजित नवले, विद्या चव्हाण, सुभाष वारे, विश्वास उटगी, सुभाष काकुस्ते, उल्का महाजन आणि किशोर ढमाले यांची भाषणे झाली. सभेनंतर झालेल्या सर्व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील दोन महत्त्वाचे निर्णय झाले. मुंबईत शहीद कलश यात्रा २७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, चैत्य भूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, परळ येथील हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक आणि मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांचा पुतळा या सर्व स्थळांना वंदन करील. वरील तिन्ही व्यासपीठांतर्फे एक विराट संयुक्त महाराष्ट्रव्यापी किसान-मजदूर महापंचायत आझाद मैदान येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी, रविवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी आझाद मैदान येथे भरेल. त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित केले जाईल. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांचे स्मरण करणारा हुतात्मा चौक येथे शहीद कलश यात्रेचा समारोप होईल.
प्रत्येक किसान संघटना पुढील दोन आठवडे हे अस्थिकलश आपापल्या प्रभावक्षेत्रात सभा घेऊन फिरवेल. अखिल भारतीय किसान सभा इतर भ्रातृभावी संघटनांच्या सहकार्याने २८ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या काळात राज्यभर शहीद कलश यात्रा फिरवेल. किसान सभेने या यात्रेसाठी एक विशेष जीप गाडी सजवली आहे. किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य जितेंद्र चोपडे (खामगाव, जि. बुलडाणा) हे या यात्रेसह राज्यभर असतील.
पुण्यातील या कार्यक्रमासाठी किसान सभेचे नेते किसन गुजर, सिद्धप्पा कलशेट्टी, उमेश देशमुख, जितेंद्र चोपडे, नाथा शिंगाडे, अमोल वाघमारे, लक्ष्मण जोशी, दिगंबर कांबळे, संजय ठाकूर, नारायण गायकवाड, सीटूचे नेते एम. एच. शेख, डॉ. विवेक मोंटेरो, के. नारायणन, युसुफ मेजर, सलीम मुल्ला, दीपक निकंबे, बापू साबळे, मोहन पोटे, संगीता कांबळे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, सरस्वती भांदिर्गे, हिराबाई घोंगे, रेखा देशपांडे, डीवायएफआयचे नेते विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, दत्ता चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. महारुद्र डाके, एसएफआयचे नेते सोमनाथ निर्मळ, नितीन वाव्हळे, राहुल जाधव, मल्लेशम कारमपुरी आणि इतर अनेक कार्यकर्ते हजर असल्याची माहिती किसन गुजर यांनी दिली.
0 टिप्पण्या