ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाच्या पहिल्या दोन मार्गिकांचे लोकार्पण आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल कार्यान्वित झाल्यामुळे ठाणे आणि मुलुंड या दोन शहरामधील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, ठाण्याचे खासदार राजन विचारे, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, स्थानिक आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
1958 साली मुलुंड आणि ठाणे शहरांना जोडणारा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने हा पूल धोकादायक बनल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे तो अरुंद ठरू लागल्याने तो पुन्हा नव्याने बांधण्याची मागणी पुढे आली होती. त्यावेळी हा पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा देखील करण्यात आला होता. 24 एप्रिल 2018 रोजी या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि आज तब्बल साडेतीन वर्षांनी या पुलाच्या दोन्ही बाजूकडील प्रत्येकी दोन अशा चार मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले.
पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका कार्यान्वित केल्यानंतर उर्वरित मधील चार मार्गिकांच काम देखील रेल्वे आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मधील मार्गिकासाठी लागणाऱ्या गर्डरची पाहणी आपण स्वतः आणि खासदार राजन विचारे यांनी पालघर येथे जाऊन केली असून या कंपनीने हे गर्डर ठाण्यात आणून ठेवले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त येत्या वर्षभरात मधील चार मार्गिकांचे काम पूर्ण करून संपूर्ण आठ मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पुलाच्या दर्जावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र पुलाच्या ग्राऊंडिंग मध्ये ज्या भेगा दिसत होत्या तिथे संपूर्णपणे पॅनल बदलून नवीन पॅचेस टाकण्यात आले असून आयआयटीकडून त्याबद्दल अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल समाधानकारक असल्यानेच आज या पुलाचे लोकार्पण होत असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या पुलाची एकूण लांबी 796 मीटर एवढी असून 65 मीटर एवढी त्याची एकूण रुंदी आहे. या पुलाची रेल्वे ट्रॅकपासूनची उंची 6 हजार 525 मीटर एवढी असून या पुलाची दोन्ही बाजूकधील रुंदी प्रत्येकी 37.4 मीटर एवढी आहे.
0 टिप्पण्या