कामगार उपायुक्तांचे आदेशाला ठेकेदाराने दाखवली केराची टोपली

 कामगार उपायुक्तांचे आदेश ठेकेदाराने धाब्यावर बसविले
कोविडमध्ये सेवा बजावणार्‍या कामगारांना कामावरुन काढले

ठाणे - कोविडच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणार्‍या फायलेरिया विभागातील सुमारे 14 कामगारांना एका महिला ठेकेदाराने घरी बसविले आहे. कामगार उपायुक्तांनी आदेश देऊनही या कामगारांना कामावर न घेतल्यामुळे सुट्टी असतानाही या कामगारांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. ठाणे महानगर पालिकेच्या फायलेरिया विभागाने शहरात औषध फवारणीचा ठेका शुभम महिला विकास मंडळाला दिला आहे. या ठेकेदाराकडे गेल्या आठ वर्षांपासून 21 कामगार काम करीत होते. त्यापैकी फक्त सात जणांना शुभम महिला विकास मंडळाच्या प्रोपायटर शिला पाटणकर यांनी 29 मे 2021 पासून कामावर घेतले असून उर्वरित 14 जणांना कामावरुन काढून टाकले आहे. या कामगारांनी या प्रकरणी कामगार उपायुक्तांकडे दाद मागितली होती. त्यावेळी कामगार उपायुक्तांनी 21 जून रोजी कामगारांना कामावर परत घेण्यासाठीचे लेखी आदेश दिलेले आहेत. 


 मात्र, त्यानंतरही शुभम महिला विकास मंडळाने या कामगारांना कामावर घेतलेले नाही. विशेष म्हणजे, या संदर्भात 1 ऑक्टोबर 2021 रोजी पालिका मुख्यालयात एक बैठक घेऊन घनकचरा उपायुक्त हळदेकर यांच्यासमोरच शुभम महिला विकास मंडळाच्या वतीने 4 ऑक्टोबरपासून कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले होते. मात्र, 26 दिवस उलटून गेल्यानंतरही कामगारांना कामावर घेतलेले नाही. त्यामुळे या कामगारांनी शनिवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.   

यावेळी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे उपाध्यक्ष महेंद्र हिवराळे यांनी सांगितले की, शुभम महिला विकास मंडळाकडे काम करणारे हे 14 कामगारांनी आपले अधिकार ठेकेदाराकडे मागितल्यामुळे त्यांना कामावरुन कमी करण्यात आलेले आहे. या ठेकेदाराने कामगारांना त्यांची देणी दिलेली नाहीत. शिवाय, त्यांना कामावर घेण्यासाठी आदेश देऊनही त्या आदेशांचा भंग केलेला आहे. 14 पैकी अर्धे कामगार हे दलित प्रवर्गातील असून त्यांच्या रोजगाराच्या अधिकारावरही ठेकेदाराने गदा आणलेली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी युनियनने केली असून त्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही सर्व बेमुदत उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA