भारतातील समाज परिवर्तनाच्या चळवळीत " दलित पँथर " या संघटनेच्या स्थापनेचे व त्यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळीचे मोठे महत्त्व आहे. आंबेडकरोत्तर कालखंडातील ती मोठी चळवळ होती.स्वातंत्र्योत्तर कालखंडात व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ला बौद्ध धम्म परिवर्तन केल्यानंतर तत्कालीन दलित समाजाने हिंदू धर्मातील रुढी,परंपरा,अंधश्रद्धा झुगारून दिल्या.ते नवी अस्मिता घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करू लागले.ग्रामिण व शहरी भागात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले.त्या कार्यक्रमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक- आर्थिक समतेचा विचार,भारतीय संविधानाचे मूल्य आणि हक्काची भाषा कार्यकर्ते भाषणातून मांडू लागले.तुटपुंज्या आरक्षणामुळे का होईना पण हक्काची नोकरी मिळाल्यामुळे लाचारीचे,अवलंबित्वाचे जीणे सोडून दलित माणूस समाजात ताठ मानेने व स्वाभिमानाने वावरु लागला होता. आणि हे स्वाभिमानी जगणे समाजातील सरंजामी,जातियवादी मानसिकता बाळगणाऱ्या मुखंडाना, बड्या धेंडाना खटकू लागली, त्यांचा " तथाकथित अहंकार " दुखावला,दलितांनी आपल्या "पायरीने" वागावं अशी अपेक्षा ते बाळगू लागले.
त्या अवमानकारक गोष्टींना दलितांनी नकार दिल्याने सामाजिक तणाव वाढू लागला ,दलितांवर या जातियवाद्यांकडून वाढते हल्ले होऊ लागले,अत्याचारांच्या घटना वाढू लागल्या.दुसरीकडे सत्ताधारी हेही उच्च वर्णियच असल्याने ते जातियवादी धेंडाना पाठीशी घालू लागले.त्याच वेळी सत्ताधार्यांच्या भांडवली आर्थिक धोरणांमुळे आर्थिक विषमता,बेरोजगारीही वाढू लागली होती. ज्या मुठभर दलितांना सरकारी नोकर्या आरक्षणामुळे मिळत होत्या,त्यांना उच्च वर्णिय "सरकारचे जावई" हिणवले जायचे व अपमानीत केले जायचे.परंतु या अन्याय,अत्याचार,अपमानास्पद वागणूकी विरोधात स्वाभिमानाने संघर्ष करण्याची,लढण्याची भुमिका तत्कालीन रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व घेत नव्हते.ते सत्ताधार्यांच्या वळचणीला राहून स्वतः साठी सोई- सवलती,पदे मिळवण्यात मश्गुल होते.आणि या नेतृत्वा विरोधातील संताप, राग, असंतोष आंबेडकरोत्तर काळात जी तरूणांची नवी शिक्षित पिढी जन्माला आली त्यांच्या मध्ये खदखदत होता.आणि त्याच संतप्त पिढीतील संवेदनशील कवी,लेखकांनी " दलित पँथर " या लढाऊ संघटनेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.
त्यानीं दि. ९जूलै १९७२ रोजी मुंबईतील कामाठीपुरा येथे तरुणांचा पहिला जाहीर मेळावा घेऊन "दलित पॅंथर"या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली.त्या मेळाव्याला संस्थापक नामदेव ढसाळ,ज.वी.पवार,राजा ढाले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. याच चळवळीतून नवे तरुण नेतृत्व, साहित्यिक उदयास आले. नव्या रुपात जात- वर्ग संघर्षाचा विचार पुढे आला. आंबेडकरी विचारांची सांस्कृतिक घुसळण झाली. त्याचे पडसाद देश पातळीवर उमटले. दलित पँथरच्या भुमिकेचा " जाहिरनामा " महत्त्वाचा होता, त्यात सरंजामी, भांडवली सत्ताधार्यांच्या विरोधात, साम्राज्यवादाच्या विरोधात स्पष्ट भुमिका घेतली होती. तसेच जगभरातील व देशातील सर्व शोषित, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर झगडणार्या डाव्या, पुरोगामी चळवळी सोबत भ्रातृभावाचे नाते असावे अशी प्रागतिक चळवळीला पुरक मांडणी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्णभेदांचा धिक्कार केला होता. पॅंथर ने फुले-आंबेडकरी विचारां सोबतच, अमेरिकेतील " ब्लॅक पँथर " या लढाऊ संघटनेच्या डाव्या विचारातूनही वैचारिक प्रेरणा घेतली होती. दलित पँथरने जात- वर्गिय शोषणाचा मुद्दा प्रथम ठळकपणे पुढे आणला हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी जो " नामांतर लढा" झाला त्यामध्येही दलित पँथरचे मोठे योगदान होते.
अशा या संघटनेच्या स्थापनेचे २०२२ साल हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने या चळवळीच्या कार्याचा आढावा, सद्यस्थिती, दलित व पुरोगामी चळवळीची भविष्यातील वाटचाल या अनुषंगाने वर्षभर काही कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी, एक व्यापक स्तरावर संयोजन समितीची स्थापना करण्याचा विचार आहे.
दलित पँथरचे पहिले दोन शहिद अनुक्रमे रमेश देवरुखकर (५ जानेवारी १९७४) व भागवत जाधव ( १० जानेवारी १९७४) रोजी झाले. त्या दोघांच्या २०२२ जानेवारी मधील संयुक्त " शहिद दिना" पासून पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्रात प्रारंभ करण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रातील प्रमुख विभागवार जिल्ह्यात " दलित पँथर सुवर्णमहोत्सव" समिती स्थापनेच्या बैठका होणार आहेत, या बैठकात सहभागी होऊन या समितीतर्फे आगामी वर्षभर जे कार्यक्रम होतील त्यात सक्रिय सहभाग असावा असे आम्हाला वाटते. या निमित्ताने जात- वर्गाच्या मुद्दयांवर व सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांची सामाजिक जाणिव वाढण्यास मदत होईल.
सदर समितीची स्थापना करण्यासाठी
मुंबईत राज्यव्यापी पहिली बैठक आयोजित केली आहे.
"दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती बैठक,
रविवार दि. १०ऑक्टोबर , दुपारी २.३०वा.
श्रमिक कार्यालय, स्वामी नारायण मंदिर च्या मागे,
दुसरी गल्ली, जिमखाना समोर, दादर, पूर्व, स्टेशन जवळ.
सदर बैठकीस आपल्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी/ प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आम्हाला वाटते.
आपले
सुबोध मोरे,सुरेश केदारे,गौतम सांगळे, ॲड. नितीन माने, संध्या पानस्कर,रवी भिलाणे,संजय शिंदे,संदेश गायकवाड,जयवंत हिरे,शैलेंद्र कांबळे, दिपक पवार,प्रा.रमेश कांबळे,सुमेध जाधव, राजेश पवार,किशोर कर्डक,सुनील कदम,सयाजी वाघमारे,प्रदिप नाईक,संजय सावंत, अश्विन कांबळे,आनंदा होवाळ, बाबा रामटेके, ज्ञानेश पाटील,उदय चौधरी,उल्हास राठोड, दत्ता आवाड,बाबुराव बनसोडे,अमोल मुंबई
0 टिप्पण्या