फॅसिझमच्या वाढत्या आव्हानाशी नवीन हत्यार घेऊन लढण्याची गरज - शामदादा गायकवाड

  डॉ.गेल ऑम्वेट- नाटककार जयंत पवार अभिवादन सभा

    कल्याण-   सध्याच्या युगात फॅसिझमच्या वाढत्या आव्हानाला नवीन हत्यार घेऊन लढण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत शामदादा गायकवाड यांनी व्यक्त केले.  १३ सप्टेंबर रोजी कल्याण येथील  सावित्रीबाई फुले सभागृहात समाजशास्त्रज्ञ व मार्क्स फुले आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक डॉ. गेल ऑम्वेट आणि प्रसिध्द पुरोगामी नाटककार, कथाकार, पत्रकार जयंत पवार यांची अभिवादन सभा झाली.  यावेळी श्यामदादा गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात सांस्कृतिक मांडणीमधील डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान आणि जयंत पवार यांचे मातीतले आणि सर्वसामान्य जनतेतले साहित्य याबाबत चर्चा केली 

पुरोगामी विचारमंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, आयटक, नागरी हक्क संघर्ष समिती, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी नाना अहिरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर श्रमिक मुक्तीदलाच्यावतीने शिवराम सुकी यांनी डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर एकनाथ पाटील यांनी लिहिलेल्या ‘गेल ऑम्वेट नावाची झुंजार बाई’ या कवितेचे वाचन केले.  श्रमिक मुक्ती दलाच्या रंजना आठवले यांनी गेल ऑम्वेट यांच्या आठवणींना उजाळा दिला.शाहिर संभाजी भगत यांनी जयंत पवार यांच्या कथा व नाटकांविषयी मनोगत व्यक्त करून गेल ऑम्वेट यांची इंग्रजीतील पुस्तके मराठीत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे आपल्या भाषणात सांगितले.  

आयटकचे कॉ.उदय चौधरी, कॉ. सुबोध मोरे, डॉ. भारत पाटणकर या प्रमुख वक्त्यांनी या प्रसंगी डॉ. गेल ऑम्वेट यांचे सांस्कृतिक चळवळीतील योगदान आणि जयंत पवार यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि विचारवंत साहित्यिकांच्या विचारांचा विकास करत समतेच्या वाटेवर पुढची पावले टाकण्याची आपली जबाबदारी आपल्या मनोगतात अधोरेखित केली.   देवेंद्र शिंदे आणि सुधीर चित्ते यांनी जयंत पवार यांच्या कथांच्या परिणामकारक नाट्यअभिवाचनाने सभेची सांगता केली.या अभिवादन सभेचे सुत्रसंचालन नाना अहिरे यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या