कोल्हापूर - राष्ट्रवादी पक्षाने किरीट सोमय्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण होते. कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती. म्हणून रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधूनच परतले. त्यामुळे राजकीय चिखलफेक आणि कार्यकर्त्यांची भिडण्याची शक्ती वाया गेली, तसेच सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवण्याची संधी हुकली अशी चर्चा आता कोल्हापूरात रंगली आहे.
मागील आठवड्यात सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा आरोप खोटा असल्याचा खुलासाही मुश्रीफांनी केला. पण, या घोटाळ्याची पोलिसात फिर्याद देण्यासाठी आपण कोल्हापुरात येणार असल्याची घोषणा सोमय्या यांनी केली. तेव्हापासून त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला. कोल्हापुरात आला तर कोल्हापुरी हिसका दाखवू असे आव्हानच देण्यात आले. त्यासाठी पंचवीस हजाराचा मोर्चा काढण्याचे नियोजन सुरू झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही सोमय्या यांच्या जंगी स्वागताची तयारी सुरू केली. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले. संघर्ष होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने तणाव निर्माण झाला.सोमय्या मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून निघाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावर जमले. जमावबंदीचा आदेश मोडून त्यांनी निदर्शने सुरू केली. हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन सोमय्या यांना ‘तुम्ही आला तर चप्पलने स्वागत करू’ असा इशारा दिला. रात्री दीड वाजेपर्यंत हे कार्यकर्ते तेथेच थांबून होते. पहाटे पुन्हा यायचे असे ठरवून ते घरी परतले. महालक्ष्मी एक्सप्रेस पहाटे साडे चार वाजता कराड येथे आल्यानंतर सोमय्या यांना पोलिसांनी पुढे न जाण्याची विनंती केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची कल्पना दिली. त्यानुसार ‘माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही’, असे म्हणत ते रेल्वेतून उतरले. त्यानंतर त्यांना कराड विश्रामगृहात स्थानबद्ध् करण्यात आले.
सोमय्यांना अडविण्याचे मुंबई, ठाणे, पुणे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कोल्हापुरात आणखी तणाव वाढला. पोलिस अधिक अस्वस्थ झाले. त्यांना जिल्ह्याबाहेरच ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. कराड, सांगली, मिरज किंवा जयसिंगपूर येथे त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे मध्यरात्री सातारा येथे गेले. साडेतीन वाजता त्यांनी सोमय्या यांची रेल्वेतच भेट घेतली. त्यांना जिल्हाबंदीचा आदेश दाखवला. त्यांच्यासोबतच ते कराडपर्यंत आले.आणि तेथूनच सोमय्या परत गेल्याचे वृत्त कोल्हापुरात कळताच राष्ट्रवादीने आपला मार्चा रद्द केला. पोलिसांनी विविध ठिकाणी लावलेला बंदोबस्त हटविला. गणेश विसर्जन ठिकाणाहून थेट या बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांनी नि:श्वास टाकला. सोमय्या परतल्याने कोल्हापुरातील संघर्ष तात्पुरता टळला.
0 टिप्पण्या