वाहतुक कर्मचारीच बुजवताहेत साकेत रोडवरील खड्डे

   पावसाळ्यात दरवर्षी ठाण्यातील रस्त्यांवर खड्डे पडत असतात.काही ठिकाणी खड्यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत.  अधूनमधून कोसळणारा पाऊस आणि खड्डयांमुळे ठाणे शहरासह महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या साकेत परिसरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या परिसरातून वाहने हाकताना चालकांची त्रेधा तिरपीट उडत असुन वाहतूक कोंडी वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासोबतच वाहतुक कर्मचार्यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.  गेले दोन दिवस साकेत खाडी पुलावर हाती घमेले घेऊन वाहतुक पोलीस खड्ड्यांची डागडुजी करताना दिसत आहेत.

जागोजागी खड्डे पडले असल्याने धीम्या गतीने वाहने चालवावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक वाहन चालकांनी व्यक्त केल्या.   ऐन उत्सव  काळात ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर खड्डे पडुन सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. शहरातील सव्हिस रोडसह महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. महत्वाचा मार्ग असलेल्या पूर्वद्रुतगती महामार्गासह घोडबंदर रस्ता व मुंबई – नाशिक मार्गावरील खड्डयांमुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शहरातील काही रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली असून, शहरांतर्गत वाहतूक कोंडी वाढत आहे. रस्त्यांवरील या खड्डयांमुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. खड्डे बुजवण्यात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर वाहतूक पोलिसांनीच हातात घमेले घेत हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याचे  वाहतुक पोलीस बसवराज पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या