'एक पत्थर तबियतसे उछालो यारो !'

 

    मागे मराठा समाजाने आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद केला. महार मांगासकट साळी, माळी, तेली, तांबोळी, कुणबी, भंडारी सगळेच टेंशनमध्ये आले. पण बौध्द समाज मात्र एकदम स्थितप्रद्न्य. आणि नुसताच स्थितप्रद्न्य नव्हे तर रिझर्व्हेशनच्या मुद्द्यावर या समाजाने मराठा समाजाला मनापासून भरभरुन पाठिंबाही देऊन टाकला. नुकतीच एक बातमी वाचनात आली. बिडमधल्या एका छोटाश्या ग्रामपंचायतीच्या सदस्या शालन नितिन धुताडमल या बाईने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपल्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला. आणि महत्वाचं म्हणजे या बाई बौध्द आहेत. ही साधी घटना नाही मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजिनामा देणारी ही पहिली महिला आहे. एवढं शहाणपण या बौध्द समुहाला आलं कुठून? मला वाटतं या बौध्द समाजाला हे शहाणपण बाबासाहेबांनी दिलं आहे. 

१४ आक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी या समाजाला बुध्दांसोबत हे शहाणपणही दिलं. किंबहुना बुध्द म्हणजेच शहाणपण, असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरु नये. आमच्या वाट्याच्या सवलती मराठा समाजाला देऊन टाका, असं विधान यदाकदाचित भविष्यात जर या बौध्द समाजाकडून आलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण आपली प्रगती ही रिझर्व्हेशनमुळे झाली नसून ती प्रगती बौध्द धम्मामुळे झाली आहे, हे या बौध्दांना चांगलं माहित आहे. १४ आक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांना साक्ष ठेऊन जे बौध्द झाले ते शहाणे तर झालेच पण एक अपूर्व धाडस बाबासाहेबांनी यांच्या धमन्यांमध्ये पेरलं असावे. त्या काळात एका क्षणात घरातले तेहतीस कोटी देव घराच्या बाहेर फेकून देणं म्हणजे खाऊ नाही. त्यासाठी वाघाचं काळीज हवं. बाबासाहेबांच्या एका आदेशासरशी हे देव बाहेर फेकून ही माणसे बौध्द झाली. नाहितर रांग लावून गणपतीला दुध पाजणारे आणि द्वारकामाईच्या भिंतीत साईबाबा प्रकट झाल्याची अफवा पसरताच हजारो मेंढरं तिथे गर्दी करताना आजही आपण शिर्डीत पाहिलच आहे.

        अशा धाडसी प्रबुध्द परंपरेची एकविसाव्या शतकातली तिसरी पिढी काय करते आहे? कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं की एक भिषण वास्तव समोर येतं. स्वातंत्र्योत्तर काळातलं हे भिषण वास्तव असं आहे की, सध्याच्या रिझर्व्हेशनच्या बाबतीत बोलायचं झालच तर, अनुसुचित जातीच्या तेरा टक्क्यामध्ये बौध्दांसकट ५९ जाती आहेत.अनुसुचित जमातीच्या सात टक्क्यामध्ये ४७ जाती आहेत आणि भटक्या विमुक्तांच्या अकरा टक्क्यामध्ये ५६ जाती आहेत. या १६२ जातींना आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालय हे वेगळ सांगायची गरज नाही. या सगळ्या जाती येथेच्छपणे या सवलती उपभोगतात पण ह्यांना बाबासाहेबांशी व त्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी काहीही देणे घेणे नाही. पण या १६२ जातींच्या आरक्षणासाठी व त्यांच्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी निळा झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्त्यावर उतरुन लढतो तो फक्त बौध्दच. 

आणि हे सगळे सवलतीपात्र दलित, भटके विमुक्त मस्तपैकी सवलती उपभोगून सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे खांद्यावर घेऊन बौध्दांनाच टार्गेट करण्यात मश्गूल आहेत. ओबिसींबाबतही परिस्थिती तशीच. या ओबिसींना रिझर्व्हेशनही बाबासाहेबांनी संविधानात अंतर्भूत केलेल्या प्रावधाना मुळेच मिळाले आहे. हे प्रावधान नसते तर मंडल आयोगही गठित झाला नसता. हा मंडल आयोग अमलात यावा म्हणून सर्वप्रथम रस्त्यावर उतरला तो बौध्दच. आणि आज स्वत:ला ओबिसीचे मसिहा म्हणविणारे त्यावेळी दलितांमुळे अपवित्र झालेला हुतात्मा स्मारक शुध्द करण्यासाठी गोमुत्र शिंपडण्यात व्यस्त होते. म्हणजे दलितांसाठी, ओबिसींसाठी लढणारे बौध्द, अनिसमध्ये शाम मानव व दाभोळकरांच्या पाठीशी उभे राहणारे बौध्द, कम्युनिष्टांची डफडी वाजवणारे बौध्द, आरपिआय(ए) मध्ये बौध्द, पिपल्स रिपब्लिकनमध्ये बौध्द, भारिपमध्ये बौध्द, बसपामध्ये बौध्द, बिआरएसपीमध्ये बौध्द इतकच नव्हे तर वामन मेश्रामच्या भारत मुक्ती मोर्च्यामध्ये सुध्दा बौध्दच.

        मग बौध्दांच्या पाठी कोण? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर, 'कोणीच नाही.' असे आहे. बौध्दाचा नेता कोण? या प्रश्नाचे उत्तरही, 'कोणीच नाही.' असे आहे. तुम्ही म्हणाल की, बौध्दांचे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. पण मला मात्र हे मान्य नाही. कारण प्रकाश आंबेडकर तर बहुजनांचे, वंचितांचे नेते आहेत. आणि 'बौध्द' बहुजनही नाहित व वंचितही नाहित. तिच गत आठवले व कवाडेंची. केवळ बौध्दांचे नेते म्हटले तर राष्ट्रिय नेता होता येत नाही, ही त्यांची खरी अडचण आहे. त्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की, बौध्दांना नेताच नाही. आणि खरं सांगायचं तर बौध्दांना नेत्याची गरजच नाही. कारण बौध्द हा इतका इंटलेक्च्युअल, इतका प्रगल्भ आहे की एक बाबासाहेब सोडले तर त्याला इतर कुणाला नेता मानायची गरजच नाही. म्हणूनच मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे १९५६ साली बाबासाहेबांनी आम्हाला नुसताच बुध्द दिला नाही तर एक शहाणपणही दिलं. आणि शहाण्या माणसांना नेत्याची गरज नसते. याच शहाण्या माणसांना मी 'माझी माणसे समजतो. या माझ्या माणसांविषयी मी आज बोलणार आहे.

       यावर मला कोणी जातीयवादी वा संकुचित ठरविण्याची शक्यता आहे. पण मला मात्र तसे अजिबात वाटत नाही. जो, जो बौध्द आहे, मग तो चर्मकारातून आलेला आकाश सोनावणे असो, मातंगातून आलेले विठ्ठलदादा उमप असो किंवा ब्राह्मणातून आलेले सुरेश भट असो. या सगळ्यांना मी माझी माणसे समजतो. कारण बौध्द होणे म्हणजे केवळ धर्म बदलणे, दिक्षा घेणे किंवा नमो तस्स म्हणणे, असे मी समजत नाही. बौध्द होणे म्हणजे डोळस होणे, प्रगल्भ होणे, बुध्दिमान होणे आणि परिपूर्ण शहाणे होणे. बौध्द होणे म्हणजे साक्षात विद्रोही होणे. म्हणून तर बौध्द झालेला पुण्यातला आमचा आकाश उर्फ अप्पा सोनावणे आपल्या मुलीचे लग्न संविधानाला साक्ष ठेऊन करतो आणि आपल्या मुलाचे नाव 'इंडियन' ठेवतो. ही धमक फक्त बौध्दातच असू शकते. धम्माने बौध्द पण जातीने महार आहे, असं आपल्याच कातडीला सोलून रक्तबंबाळ करण्याचं धाडस फक्त बौध्द असलेला आमचा रमेश भवारच करु शकतो. आणि 'ये ब्राह्मणा ये, तुला मी अस्पृश्य मानणार नाही!' असं फक्त बौध्द असणारा डाँ. शशिकांत लोखंडेच म्हणू शकतो. जितक्या निरपेक्ष बुध्दिने बौध्द समाज प्रकाश आंबेडकरांना जोखू शकतो तितक्याच निरपेक्ष बुध्दीने तो रामदास आठवलेंनाही तोलू शकतो. कदाचित आपल्याला ही अतिशयोक्ती वाटेल. पण हे ढळढळीत वास्तव आहे की, आजच्या घडीला संपूर्ण देशामध्ये अत्यंत सजग, संवेदनशील, प्रगल्भ आणि शहाणा समाज जर कोणता असेल तर तो एकमेव बौध्द समाजच आहे. 

      याच बौध्द समाजाच्या बळावर त्यावेळी महानगरचे संपादक निखिल वागळे यांनी बाळ ठाकरे यांना टक्कर देण्याचे धाडस केले होते. हेच निखिल वागळे आयबिएन लोकमतमध्ये असताना त्यांच्या पाठिशी बौध्द समाज पहाडासारखा उभा होता. दलित पँथरच्या आक्रमक संघटनेचे सर्वेसर्वा राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई संगारे, मनोहर अंकुश हे बौध्दच होते. दलित साहित्याची पताका सातासमुद्रापलिकडे फडकविणारे नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, दया पवार,  ज.वि.पवार, अर्जुन डांगळे, संजय पवार, उर्मिला पवार हे देखिल बौध्दच. रिपब्लिकन पक्षातुन बाहेर पडलेल्या कांशीरामना सुरवातीला हत्तीचं बळ देणारेही बौध्दच. भारत मुक्ती मोर्च्याच्या वामन मेश्रामना साथ सोबत करणारेही बौध्दच. मायावतीला सोडून स्वत:चा बिआरएसपी काढणाऱ्या सुरेश मानेंचे कोअर कमिटीचे कार्यकर्तेही बौध्दच आणि प्रकाश आंबेडकर, कवाडे, आठवले यांना रसद पुरवणारेही प्रामुख्याने बौध्दच.

     म्हणूनच आता या गटातटात व विविध पक्ष संघटनेत विखुरलेल्या या बौध्दांनी आता पुढच्या लढाईसाठी आपले गटतट झुगारुन एक झालं पाहिजे व आपला शत्रू नंबर एक निश्चित केला पाहिजे. आणि नुसताच निश्चित करुन भागणार नाही तर त्यासाठी काय करायचं, हे देखिल ठरवले पाहिजे. जसं एखाद्या काल्पनिक कथेतल्या राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो तसा आजच्या घडिला या सगळ्या राजकीय नेत्यांचा जीव बौध्द समुहात एकवटला आहे. जर या सगळ्या जंजाळातून बौध्दांना वेगळं केलं तर क्षणार्धात या सगळ्या चळवळी, हा सगळा संघर्ष आणि हे सगळे राजकीय पक्ष मरुन पडतील. आणि तसेही या सगळ्यांना जीवंत ठेवायचा ठेका एकट्या बौध्दांनी कशासाठी घ्यावा? मला वाटतं बौध्दांनी आता या सगळ्या गोष्टीत आपली शक्ती व्यर्थ न करता आपला गोल निश्चित करण्यावर आपली शक्ती एकाग्र केली पाहिजे. भविष्यात येणा-या  निवडणुकित कुठल्याही एखाद दुसऱ्या पक्षाच्या मर्जीवर अवलंबून न राहता जो भाजपला हरवू शकेल त्याच्या पाठिशी बौध्दांनी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. मग ती कुठलीही आघाडी असू दे. मला जाणिव आहे की, 'रिपब्लिकन' या नावाशी व निळ्या झेंड्याशी बौध्दांचे एक भावनीक नाते आहे. 

म्हणूनच हा बौध्द आठवले, कवाडे, प्रकाश आंबेडकर, बिएसपी, बिआरएसपी इत्यादी पक्षामध्ये कार्यरत आहे. पण खरं सांगायचं तर या निळ्या झेंड्यांचे हे कुठलेच पक्ष बाबासाहेबांचे नाहित. बाबासाहेबांचा ओरिजनल रिपब्लिकन पक्ष राजेन्द्र गवई सारख्या कर्तुत्वशुन्य माणसाकडे शुन्यवत होऊन पडला आहे. हा पक्ष भविष्यात कधी बलशाली होईल तेंव्हा होईल. पण तुर्तास आजच्या घडीला येणा-या संकटाचा मुकाबला बौध्दांनी व्यापक भूमिकेतून एकजूटीने करणं महत्वाचं आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरुन एक गोष्ट सिध्द झाली आहे की, काहीही झाले तरी निळ्या झेंड्याचे पक्ष एकत्र येणे अशक्यप्राय आहे. अशावेळी आपआपले गटतट झुगारुन बौध्दांनीच आता बौध्द म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आणि या एकत्रिकरणासाठी बौध्दांना कुठल्याही नेत्या, बित्याची गरज नाही. कुठलाही नेता नसताना मराठा समाजाचे ५७ मोर्चे निघू शकतात. तर मग बौध्दांचा मोर्चा का नाही निघू शकत?

       निघू शकतो. बौध्दांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातला तमाम बौध्द हा 'बौध्द' म्हणून एकत्र येऊ शकतो. बौध्दांनी जर अशा प्रकारे बौध्द म्हणून एकत्र येण्यास सुरुवात केली तर ती फाटाफुटीत मश्गूल राहणाऱ्या सर्वच निळ्या झेंड्यांच्या पक्षांची मरणघंटा ठरणार आहे. जसं जामा मशिदितून फतवा निघताच सगळे मुसलमान एकत्र येतात, व्हँटेकिन चर्चच्या पोपने आदेश काढताच सगळे ख्रिश्चन एकत्र येतात तसे सर्व बौध्दांनी एकत्र यायला हवं. मात्र  बौध्दांना फतवे किंवा आदेश काढायची गरज नाही. कारण बौध्द माणूस प्रगल्भ आहे, शहाणा आहे. त्याला त्याचं बरं, वाईट चांगलं कळतं. म्हणूनच मला वाटतं की, आता तमाम बौध्दांनी एका व्यापक हितासाठी स्वयंप्रेरणेने एकत्र आलं पाहिजे आणि येणा-या निवडणुकीत कुणाला साथ द्यायची हे निश्चित केलं पाहिजे. बौध्द समाज हा भले अल्पसंख्यांक असेल पण बौध्दिक द्रुष्ट्या हा पुढारलेला समाज आहे. 

आज इथला ओबिसी, इथला दलित, इथला भटका विमुक्त समाज, एक शहाणा, थोरला भाऊ म्हणून बौध्दांकडे पाहतो आहे. त्याला चांगलं माहित आहे की, बौध्द समाज जे करेल ते सगळ्यांच्या हिताचच असणार आहे. उद्या बौध्द समुह जे करेल त्याचेच अनुकरण ही माणसे करणार आहेत. काही लोकं म्हणतात की, काहीही झाले तरी पुन्हा भाजपच येणार. त्यावर मी म्हणतो की, कोण म्हणतो, भाजप पराभूत होऊ शकत नाही. जिथे चंगेजखान पराभूत होऊ शकतो, जिथे सिकंदर पराभूत होऊ शकतो, तिथे भाजपची काय कथा. भाजपही पराभूत होऊ शकतो नव्हे तर भाजप आता आपल्या कर्मानेच पराभवाच्या दिशेने जाऊ लागला आहे. भाजपच्या या पराभवावर शेवटचं शिक्कामोर्तब करण्यासाठी आता फक्त बौध्दांनी एकजूटीने पहिलं पाऊल उचलण्याची गरज आहे. बौध्दांचं हे पहिलं पाऊल सर्वंकष परिवर्तनाची नांदी असेल. या पहिल्या पाऊलासाठी शुभेच्छापर दुष्यंत कुमारच्या कवितेच्या या दोन ओळी......,

" कौन कहता है की आसमामे छेद नही हो सकता,     सिर्फ एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो!"

 - विवेक मोरे   मो. 8451932410

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1