Top Post Ad

कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ.वावा यांचे आदेश

   राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा ठाण्यात आले होते. याची माहिती कामगारांना न देता गपचूप मिटींग घेणारे ठाणे महापालिका प्रशासनाची भूमिका निषेधार्ह असल्याचे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले. ठामपा शाळा सफाई कामगार आपल्या गर्हाणी सफाई कर्मचारी सदस्याकडे मांडायला गेले असता, प्रशासनाकडून अडवण्यात आल्यावर कामगारांनी बल्लाळ सभागृहाच्या बाहेर कामगारांना न्याय द्या, आम्हाला भेट द्या अशा घोषणा दिल्या.  नंतर कामगारांचे दोन प्रतिनिधी विनायक आंब्रे व अर्चना पवार यांना प्रवेश दिला. विनायक आंब्रे यांनी डॉ. पी.पी. वावा यांच्या समोर कामगारांच्या समस्या मांडल्या. 

कोरोना मुळे शाळा सफाई कामगारांना ११ महिने वेतन मिळाले नाही, शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहातात,पण १८० कर्मचाऱ्यांची उपासमार होत असली तरी त्यांना प्रवेश का नाही, सफाई कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची सुमारे ४० लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेकडे थकीत आहे. ती रक्कम देखील अदा केलेली नाही. कामगारांना उपासमारी साठी सोडून दिले आहे. असे ऐकल्यावर या कामगारांना ताबडतोब कामावर घ्या, कामगारांचे करोना काळातील वेतन व किमान वेतनची थकबाकी अदा करा. तसेच नियमितपणे काम करणारे कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे असे आदेश डॉ वावा यांनी ठामपा प्रशासनाला दिले. ठामपा अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी ४ तारखेपासून शाळा सुरू होत आहेत, सर्वच सफाई कामगारांना कामावर घेतले जाईल.असे आश्वासन यावेळी दिले आहे.

दरम्यान सहायक कामगार आयुक्त यांच्या दालनात सकाळी १२ वाजता या विषयी झालेल्या सुनावणीत शाळा सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करण्याची सूचना केली आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता ठाणे महापालिकेच्या निर्णयाक्षम अधिकार्यांनी उपस्थिती राहून खुलासा करण्यासाठी शिक्षण विभागाचे लेखापाल अजित धूरी यांना सांगितले. सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप यांच्याकडे झालेल्या सुनावणीत प्रशासनातर्फे लेखापाल अजित धूरी कामगारांच्या तर्फे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, खजिनदार अविनाश नाईक, सफाई कामगार प्रतिनिधी स्वाती सावंत, विमल खाडे, अर्चना पवार, वंदना जाधव, विनायक आंब्रे, सुनिल दिवेकर, संतोष देशमुख, यांच्या सह सुमारे ५० कर्मचारी उपस्थित होते.

चिडलेल्या कामगारांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ वावा यांच्या गाडीला घेराव घालून खोटारडे महापालिका अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
 


 महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी घेतला. सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी. वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. आज महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त  संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अश्विनी वाघमळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रशांत रसाळ, स्वीय सहाय्यक श्री. गिरिधरनाथ, संपर्क अधिकारी अनिल सानप, उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता भारत भिवापूरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी  सूर्यवंशी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, कार्मिक अधिकारी जी.जी.गोदापुरे आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी,  कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

       ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदीबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सविस्तर माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्याना माहिती दिली. ठाणे महापालिकेच्यातीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com