Top Post Ad

ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेची

ठाणे - ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपुल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. ते एकमेकांकडे बोटे दाखवतात. त्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. हाय-वे ची जबाबदारी एसआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे आहे आणि ठामपातही शिवसेनेची सत्ता आहे. ठामपात सेनेला स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीची गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले होते. त्यामुळे या खड्ड्यांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे. कामाचा दर्जा तपासणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेचीच असल्याचे स्पष्ट मत नजीब मुल्ला यांनी मांडले. वाहतूक कोंडी आणि खड्डे प्रश्नी आज पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. 

ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एम. एस. आर. डी. सी.कडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते. अनेक वर्षांपासून कोस्टल रोड, फॉरेस्ट रोड, मोघरपाडा येथील पूल ही कामे ठामपा आणि एम. एस. आर. डी. सी.मधील समन्वयाअभावी रखडलेले आहे. जर, एम. एस. आर. डी. सी., एमएमअआरडीए, ठामपा आणि पालकमंत्री यांच्या स्तरावर निर्णय झाले असते तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागले असते, 

 ठाण्याला आज पर्यायी रस्त्याची गरज आहे. कोपरी पूल तयार आहे; त्याच्या दर्जाबाबत ठाणेकरांना देणेघेणे नाही. जर हा पूल तयार झाला आहे तर तो ठाणेकरांसाठी खुला करायला हवाय.ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी एम. एस. आर. डी. सी.ची असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी; जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

तसेच, या मार्गावरील अवजड वाहतूकही रस्ते दुरुस्ती होईपर्यंत थांबवावी; येत्या आठ दिवसात याबाबत भुमिका न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. आम्ही पालकमंत्र्यांना याबाबत विनंती करतो की, त्यांनी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. 

ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही, असा इशारा आज पत्रकारांशी बोलतांना राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी दिला. गेल्या 15 दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. ठाणे शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व 8 हे मुख्य महामार्ग जातात. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. सद्यस्थितीमध्ये या रस्त्यावर मोठ-मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी एम. एस. आर. डी. सी. ची आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी फॉरेस्ट हिल रोडचा आणि कोस्टल रोडचा पर्याय निर्माण करण्यात आला होता. फॉरेस्ट हिल रोडचा प्रस्ताव सन 2009 पासून प्रलंबित आहे. तर, मोघर पाडा येथे 4 वर्षांपूर्वी एम. एस. आर. डी. सी.ने पूल बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला होता. त्याची रक्कम आणि ना हरकत दाखला देऊनही त्याचे काम पुढे सरकलेले नाही. तसेच, कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरु झालेली नाही.

 या सर्व प्रकारामुळे ठाणेकरांच्या मनात संतप्त भावना आहेत. याचा विचार करुन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही, असे निवेदनही परांजपे आणि मुल्ला यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com