महापालिका आणि एमएसआरडीसी अंतर्गत दरवर्षी खड्डे बुजवण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण खड्डे पुन्हा जैसे थे होतात आणि कोट्यवधी रुपये पाण्यात जातात. यास निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणारे ठेकेदार जबाबदार आहेतच, शिवाय टक्केवारीची टोळीही तेवढीच जबाबदार आहे. याबाबत जनतेसमोर खर्चाचा तपशील आला पाहिजे, म्हणून गेल्या पाच वर्षात झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाण्यातील रस्त्यांची झालेली चाळण आणि निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशात केळकर यांनी खड्डे बुजवण्यासाठी झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केल्याने सत्ताधारी आणि प्रशासन कात्रीत सापडले आहे.
दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्त्याची कामे नीट करा. नाही तर कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा. खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि ग्रामीण पोलीसही यांच्यासोबत शिंदे यांनी तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली. ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना सहा सहा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या