मग आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का ? - संभाजी ब्रिगेड

   पुणे-  मुंबईत ग्लोबल स्टेटर्जिक पॉलिसी  या संस्थेच्या  'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या विषयावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आपली भूमिका मांडली.  सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील उच्चविभूषित व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेवर संभाजी बिग्रेडने सडकून टीका केली आहे.  संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी एक पोस्ट लिहून संघाला थेट सवाल विचारला आहे.   'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते...' हा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? असा सवाल संभाजी बिग्रेडने उपस्थितीत करत जोरदार घणाघात केला आहे.  

'धर्माचं परत राजकारण करू नका. कारण का बाबरी पाडली? का लोकांची घरं जाळली? का हे फक्त सुडाच्या राजकारणातून सत्तेचे राजकारण साधण्याचा प्रकार होता, हे भागवतांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. तुमच्या या वागण्यामुळेच, निवडणुकीच्या काळात देश संकटात येतो. दहशतवादी हल्ले होतात आणि निवडणुकीत भावनिक राजकारण करून धर्मांध राजकारणी सत्तेची पोळी भाजून घेतात. धर्माचं राजकारण करून सत्तेवर यायचं आणि सत्तेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे पूर्वज एकच आहेत हे सांगायचं हा खोटारडेपणा आहे. धर्मांध राजकारण करून आजपर्यंत धर्माधर्मात वाद कोणी वाद लावले. धर्माधर्मात दंगली कोणी घडवल्या? कुणा मुळे 'हिंदू खतरे में हैं...' होता. हे भागवतांना सांगणार कोण? असंही शिंदे म्हणाले.

भागवत म्हणतात... 'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते...' हा साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग ज्या आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आजपर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या, दोन समाजात सामाजिक तणाव निर्माण करून वातावरण गढूळ का केले? हजारो मुलांचे या धार्मिक दंगलीत जीव गेले मग त्यांना आजपर्यंत का भडकवले गेलं? असा सवाल शिंदेंनी विचारला. तसंच, 'हजारो लोकांचे संसार देशात उद्ध्वस्त केले. कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा हा अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे' असंही शिंदे म्हणाले.  'हिंदू मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. तर आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का! मुळात यांना एवढ्या उशिरा हा शोध लागलाच कसा.  भागवत साहेब, आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा' असं आव्हानच शिंदेंनी संघाला दिलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA