पालि (मागधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्चर्यकारक साम्य

 पालि (मागधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्चर्यकारक साम्य * Indian languages including Sanskrit originated from Pali

आपण महाराष्ट्रीयन आपली मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या विषयाचे संशोधन महाराष्ट्राच्या सीमा आणि मराठी कलाकृती यांच्या परिघातच करतो. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब किंवा कार्य राष्ट्रीय पातळीवर पडतच नाही. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासात बंगाली, हिंदी व दाक्षिणात्य भाषा सोडल्यास मराठीचा मागमूस दिसत नाही. मराठीचा सांस्कृतिक इतिहास डोळसपणे पाहण्याचे व कथन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न फारसे झाले नाहीत. त्यामुळेच मराठी भाषेच्या कित्येक बाबी अद्याप अज्ञात राहिल्या आहेत.आपण भारतीय आपल्या सर्व भाषा या संस्कृत मधून निर्माण झाल्याचे लहानपणापासून ऐकत आहोत. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे काय याचा शोध आपण घेतच नाही. प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसते. परंपरेने जे मानले गेले आहे त्याच्या सीमा आपण ओलांडीत नाही आणि मग इथेच सर्व चुकते. जर सर्व भारतीय भाषा या संस्कृत पासून निर्माण झाल्या तर संस्कृत भाषेचा प्रसार व विकास होण्यास काहीच अडचण नव्हती. मग आज ती फक्त मूठभर लोकांची मक्तेदारी का राहिली आहे ? जनसामान्यात संस्कृत भाषा का रुजली गेली नाही ? का त्याबाबत सर्वसामान्यजन त्या भाषेतून व्यवहार करीत नव्हते ?
अभ्यास करता असे आढळते की मूळ उत्तर भारताची पालि भाषा ही भारतातील अनेक भाषांची जननी आहे. इ.स.पूर्व ६व्या शतकातील ही मगध राजवटीची मागधी भाषा हिलाच पुढे पालि भाषा नामनिधान प्राप्त झाले. भगवान बुद्धांचा सर्व उपदेश या भाषेतून केलेला दिसून येतो. सर्व त्रिपिटक पालि भाषेत आहे. सर्व भारतभर एकेकाळी बौद्ध संस्कृतीची भरभराट होती. त्यामुळे त्या पालि भाषेतील अनेक शब्द आज इतर भारतीय भाषेत सामावून गेल्याचे आढळून येत आहे. तसे संस्कृत भाषेबाबत दिसून येत नाही. उच्चवर्णीयांची भाषा म्हणून तिला राजदरबारात स्थान दिले गेले. त्यामुळे तिचा परिघ मर्यादित राहिला हे सत्य आहे. तरीही अनेक अभ्यासक डोळे झाकून त्याचीच री ओढतात. सत्य संशोधन करीत नाहीत.आज असंख्य पालि भाषेतील शब्द संस्कृत, मराठी व इतर अन्य भारतीय भाषेत आढळतात हे मोठे नवल नव्हे काय ? यावरून मग पालि भाषेतून मराठी भाषेचा उगम झाला असे का म्हणू नये ? कदाचित भारताची बौद्ध संस्कृती हळूहळू बदलत गेल्यामुळे बुद्धांच्या आणि त्रिपिटकाच्या पालि भाषेचा संबंध आताच्या मराठीशी जोडणे काही संशोधकांना अवघड वाटत असावे.
महाराष्ट्रात इ.स.पूर्व ४०० ते इ.स. ७००-८०० पर्यंत बुद्ध तत्वज्ञान सर्वव्यापी झाले होते. याच काळात मराठी भाषा आकारास येत होती. इतिहासात डोळसपणे पाहिले असता १२व्या शतकापर्यंत भारतात पालि भाषेत तयार झालेले साहित्य दिसते. बुद्धांच्या नंतर तीनशे वर्षांनी संस्कृत भाषेचा विकास होत गेला. वाल्मिकी रामायण, व्यासांचे महाभारत आणि अज्ञात लेखकाची भगवतगीता ही नंतरच्या काळातली आहे. बुद्धीचा संबंध हा मुख्यत्वे बुद्धांशी आहे. थेरवादा बरोबर महायान सुद्धा त्याकाळी पसरला होता. बुद्धांचा अष्टांगिक मार्ग महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्याने इथल्या आठ महत्वाच्या लेण्यांना अष्ट विनायक (बुद्धांचे एक नाव) नाव पडले. मंगलसूत्ताचे मंगळसूत्र झाले. नाथपंथाने बुद्ध तत्वज्ञान अंगिकारले. पंढरपूरच्या विठ्ठलाला बुद्ध रुपात पाहिल्याचे सर्व संतानी अभंगात म्हटले. मेत्त भावनेचा ( सर्वांप्रति मैत्री भावना ) आविष्कार ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून उमटला. नामदेवांच्या तेराव्या शतकातील हिंदी सदृश्य भाषेतील रचनेमध्ये नामरूपाच्या गोष्टींचा उल्लेख आला. दखनी भाषेचा याच दरम्यान उदय होत गेला. ११व्या शतकात आढळलेल्या एका शिलालेखात मराठी वाक्ये दिसून येतात. संस्कृत भाषेचा एक शब्दही दिसत नाही.
तिसऱ्या धम्मसंगतीनंतर महायान पंथांने आपले वेगळेपण जपण्यासाठी संस्कृत मधून ग्रंथ लिहिले. त्यामुळे काही बौद्ध तत्वज्ञानाचे संस्कृत शब्द सुद्धा मराठी, मल्याळम आणि अन्य भाषेत आले. बाराशे वर्षे महाराष्ट्रात असलेल्या बुद्ध तत्वज्ञानामुळे लोक व्यावहारिक भाषेत देखील बुद्ध वचनातील शब्द वापरत होते. त्यामुळे मराठी भाषेतील बरेच शब्द, स्वर, व्यंजने आणि व्याकरण सुद्धा पालि भाषे सारखे असल्याचे दिसून येते. पालि भाषा आणि मराठी भाषा वर्ण जवळजवळ सारखेच आहेत तसेच जोडाक्षरे देखील सारखीच आहेत. एकवचन आणि अनेकवचन पालि आणि मराठी भाषेतच दिसून येतात. संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असा प्रकार आढळतो. नाम,वचन, लिंग, विभक्ती, कर्ता, कर्म क्रियापद अशी वाक्यरचना देखील मराठी आणि पालिमध्ये जवळजवळ सारखीच आहे. फक्त लिहिण्याची लिपी वेगवेगळी आहे. भाषा तज्ज्ञांनी या सत्यतेबाबत आतापर्यंत संशोधन का केले नाही याचे आश्चर्य वाटते. आणि म्हणूनच मराठी भाषेचा उगम पालि भाषेतून झाला असे ठामपणे म्हणावेसे वाटते.
पालि व मराठी भाषेतील साम्य दर्शविणारे असंख्य शब्द आहेत. त्याची माहिती थोडक्यात येथे देण्यात येत आहेत. अज्जली-अंजली /आकास-आकाश /अंस-अंश /अकुसल-अकुशल / अग्गी-अग्नि / अतिवुठ्ठी-अतिवृष्टी / अधम्मी-अधर्मी / इतिवुत्त-इतिवृत्त / उग्गम-उगम /उग्ग-उग्र / उच्छेद-उच्छेद / उपाधि-उपाधी / ओसध-औषध / कज्जल-काजळ / करुणा-करुणा / कम्मवाद-कर्मवाद / खारीय-खारट / गमन-गमन / चपल-चपळ / चातुरीय-चातुर्य / जरामरण-जरामरण / तपस्सी-तपस्वी / धनु-धनुष्य / नगर-नगर / नदी-नदी / निब्बान-निर्वाण / पज्ज-पद्य / पब्बत-पर्वत / पुन्णमासी-पौर्णिमा / मज्झिम-मध्यम / मित्त-मित्र / रक्खक-रक्षक / विसाल-विशाल / वेदना-वेदना / सिप्प-शिल्प / सत्था-शास्ता / सील-शील / सक्क-शक्य / हरित-हरित / हित-हित.

--- संजय सावंत ( नवी मुंबई )
[संदर्भ :- मराठी भाषेचा उगम पालि भाषेतून...! (संस्कृत मधून नव्हे ) लेखक - मा.श. मोरे ]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1