- हरिश्चंद्रचा निम्मा डोंगर चढत किसान सभा मोर्चा थेट शेतात.
- वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून टाकत अभयारण्यात निदर्शने.
- वन अधिकाऱ्यांची दादागिरी सहन करणार नाही : कॉम्रेड नामदेव भांगरे
अकोले - आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अभयारण्य परिसरात लव्हाळी ओतूर येथे वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावली. आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेे. वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभा मैदानात उतरली असून वन विभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये लावलेली ही रानटी झाडे उपटून काढण्यासाठी गावोगाव मोर्चे काढण्याची सुरुवात किसान सभेने केली आहे. अभयारण्य परिसरातील लव्हाळी ओतूर येथील मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजत गाजत मोर्चा काढत शेतातील वन विभागाची रानटी झाडे उपटून फेकत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन कसणारांच्या नावे करण्यासाठीची प्रक्रिया देशभर सुरू आहे. वन विभागाने नुकतेच महसूल विभागाच्या मदतीने तालुक्यातील अभयारण्य परिसरातील 32 गावातील मालकी जमिनीवर वन विभागाचे नाव लावणार असल्याचे अत्यंत संतापजनक आदेश काढले होते. आ. डॉ. किरण लहामटे व किसान सभेने या बाबत आदिवासी शेतकऱ्यांची बाजू घेत या आदेशाची अंमलबजावणी थांबवली होती. आता त्यानंतर वन विभागाने शेतात झाडे लावण्याची आगळीक करून पुन्हा अभयारण्य परिसरातील वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न केले आहेत. किसान सभा वन विभागाचे असे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. लाव्हाळी ओतूर येथून या विरोधात सुरू झालेले अभियान संपूर्ण तालुकाभर राबविण्यात येणार असून वन विभागाने शेतात लावलेली रानटी झाडे परिसरातील शेतकरी सामुहिकपणे उपटून काढणार आहेत.वन विभागाच्या अन्याया विरोधात केलेल्या या आंदोलनाचे परिसरात स्वागत होत आहे. किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, जिल्हा कौन्सिल सदस्य राजू गंभीरे, एकनाथ मेंगाळ, भीमा मुठे, लक्ष्मण घोडे, भाऊसाहेब साबळे, शिवराम लहामटे, मधुकर नाडेकर, भास्कर बांडे, किसन बांडे आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

0 टिप्पण्या