शहाणी राणी फुलनदेवी

 ''..माझ्या गावापासून  बेहमई पर्यंत माझे जे शोषण झाले,त्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. इतका भयानक अन्याय माझ्यावर झाला.सवर्ण ठाकूरांनी मला  बेहमई मधे नग्न करुन फिरवले. तर प्रोड्युसर डायरेक्टर शेखर कपूरने सिनेमा खपवण्यासाठी मला दररोज पडद्यावर नग्न केले. बँडीट क्वीन सिनेमाच्या माध्यमातून. या सिनेमात सत्य कमी आणि नग्नताच जास्त दाखवली. सेन्सॉर बोर्ड बघत राहिलं. व्हॅलेंटाईन डे ला विरोध करणारे नेतेही डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसले.कोणीच त्या विरोधात बोललं नाही...''   ही जळजळीत प्रतिक्रिया होती,फुलन देवीची.हो,तीच फुलन देवी,जीने तिच्यावर बलात्कार करणाऱ्या उच्चवर्णीयांच्या गावात घुसून दिवसाढवळ्या बावीस मुडदे पाडले होते.चंबळच्या खोऱ्यातील डाकुराणी फुलनदेवी.बँडीट क्वीन !  तिची ही प्रतिक्रिया आहे...

  १९९६ ला जरी ती खासदार म्हणून निवडून आली असली तरी १९९८ ला मुंबईत आली तेव्हा ती खासदार नव्हती. अर्थात १९९९ ला ती पुन्हा खासदार म्हणून निवडून आली चंबळची डाकू ते दोन वेळा लोकसभेत खासदार होण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक होता.फुलनदेवी जाती व्यवस्थेच्या विरुध्द होत्या. जाती व्यवस्थेमुळे त्यांचे व त्यांच्या निषाद ( नावाडी/मल्लाह) समाज बांधवांचे अतोनात शोषण झाले होते. त्या निडर व धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यांनी अन्यायाशी कधीच तड-जोड केली नाही. दुसऱ्यांचं दुःख समजून घेणाऱ्या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्या म्हणत... गरीबांना आर्थिक  मदत करताना मला फार आनंद होतो. जनसामान्यात त्या प्रंचड लोकप्रिय असल्या तरी त्यांच्या नेहमीच्या वागण्यात नम्रता कायम होती.सुनील त्याला भेटलेल्या फुलनदेवीबद्दल सांगत होता,पण इकडे मला मात्र एक वेगळीच फुलन उमजू लागली होती. 

      १४ फेब्रुवारी १९८१ ला उत्तर प्रदेशातील बेहमई गावात २२ ठाकूरांचे हत्याकांड झाले आणि ही बातमी वार्‍यासारखी जगभर पसरली आणि अवघ्या १७ वर्षाच्या फुलनदेवी यांचे नाव बॅन्डीट क्वीन म्हणून जगासमोर आले. उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री व त्यानंतर जनता दलाचे सरकार असताना पंतप्रधान राहिलेले व्ही.पी.सिंग यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.केंद्रातील इंदिरा गांधी सरकार ही हादरून गेलं. या हत्याकांडामागचं कारणही भीषण होतं.याच गावात ठाकुरांनी फुलनदेवीला नग्न करुन तिच्यावर सतत तीन आठवडे बलात्कार केला होता. त्या अपमानाचा सूड तिने बेहमई हत्याकांडातुन घेतला होता.एका सतरा वर्षाच्या,चार साडेचार फूट उंचीच्या किरकोळ मुलीने दबंग समजल्या जाणाऱ्या चाळीसेक ठाकूराना त्यांच्याच गावात रांगेत गुडघ्यावर बसवून ठोकून टाकलं होतं.२२ मेले,कित्येक जखमी झाले.विशेष म्हणजे गावातील एकही बाई माणूस,लहान मूल किंवा वयस्कराला साधा ओरखडा ही काढला नाही तिने.मात्र जात,जमीन,जवानी यांच्या गुर्मीत असलेल्या मिजासखोर पुरुषातील एकालाही सोडलं नाही.या चिमण्या शरीरात रागाचा इतका  दारुगोळा कसा काय साठला होता ? अचानकपणे एका दिवसात तर नक्कीच नाही.

            फूलन देवी १०ऑगस्ट १९६३ चा जन्म,  उत्तर प्रदेशातील गोराहा या छोट्याशा गावात झाला. मागासवर्गीय परीवारात जन्मजात दारिद्र्याशिवाय काय असणार ? त्यात महिलेचा जन्म.ब्राम्हणी पितृसत्ताक संरजामी समाजात तिच्याकडे सामूहिक लुटीचा माल म्हणूनच हक्काने पाहिलं जातं.तिच्या विरोधाची तर सुतराम शक्यता नसते.अशात एखादीने जर विरोध केला तर...? तर ती सतावली जाते,नासवली जाते,वापरून फेकली जाते आणि गरज संपली तर किड्या मुंगीसारखी चिरडून संपवलीही जाते.मात्र इतकं होऊनही पुन्हा उभी ठाकली तर...?

तर ती फुलन देवी असते.

          फुलन विद्रोहाचा अंगार सोबत घेऊनच जन्माला आली असावी बहुतेक.तिच्या काकाने बापाची जमीन हडपली म्हणून ती काकाला नडायची.वीटभट्टी चालकाने मजुरीचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या घराच्या विटा तिने खिळखिळ्या करून टाकल्या.तिचं बंड शमवण्यासाठी म्हणून वयाच्या अकराव्या वर्षी तिच्यापेक्षा तीस पस्तीस वर्ष थोराड बाप्याबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं.त्याचा अत्याचार सहन न होऊन ती आई बापाकडे पळून आली.इथे आल्यावर गावातल्या दबंग झुंडीने तिची  शिकार केली.पण तिने प्रतिकार सोडला नाही. म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी पोलिस ठाण्यात डांबण्यात आलं.पोलिस ठाण्याबाहेर तिचे आईवडील तिच्या सुटकेसाठी गयावया करत होते.आणि आतमध्ये पोलिस तिच्यावर अत्याचार करत राहिले.अखेर तिसऱ्या दिवशी तिला सोडून देण्यात आलं.मात्र इतकं होऊनही फुलन त्या व्यवस्थेला शरण जायला तयार झालीच नाही. मग दबंगांच्या सांगण्यावरून ठाकूर श्रीराम आणि लालाराम यांच्या डकैत टोळ्यांनी तिचं अपहरण केलं.भोगदासी बनवलं.

पण इथे तिला डाकू विक्रम मल्लाह भेटला.तिच्या बाजूने उभा राहिलेला पहिला डाकू माणूस.कदाचित एकाच जातीचे असल्यामुळे सूर जुळले असावेत.त्यांनी टोळीत राहूनच लग्न केलं.तिच्यावर बलात्कार करू पाहणाऱ्या डाकू बाबू गुज्जरची हत्या केली विक्रमने.एव्हाना फुलननेही हातात बंदूक घेतली होती.मात्र बलात्कारी झुंड तिची पाठ सोडायला तयार नव्हती.तिच्यामुळे आपला बाबू गुज्जर मेला म्हणून ठाकूर श्रीराम आणि लालाराम यांच्या टोळीने तिला गाठलं. विक्रमला ठार केलं.तिला नग्न करून होडीत बसवून बेहमई या ठाकुरांच्या गावात नेलं. विहिरीवरन नागव्याने पाणी आणायला लावलं.सरळ ऐकत नाही म्हणून तिला विहिरीत फेकलं.तीन तास ती विहिरीत पडून होती.पुन्हा बाहेर काढण्यात  आलं.आणि एका खोलीत कोंडलं गेलं.पुढचे तीन आठवडे डाकू आणि गावातील लोकं तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करत होते.

त्या पंधरा सोळा वर्षाच्या पोरीवर!कोणत्या शब्दात मांडावा हा जुलूम? जिथं शब्द,भाव,नाती गोती, माणुसकी,देव,धर्म,काळ वेळ ...साऱ्यांच्या सीमा संपल्या होत्या.  तिच्या काही सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे अखेर एकवीस दिवसांनी ती स्वतःची सुटका करून घेऊ शकली.तिने स्वतःची टोळी बनवली.१४ फेब्रुवारी  (व्हॅलेंटाईन डे) १९८१ ला ती पुन्हा त्याच गावात परत आली.आपल्या फौज फाट्यासह. ठाकूर श्रीराम आणि लालारामच्या शोधात. आणि मग तिनं जे काही केलं तो इतिहास तर जगजाहीर आहे.

               बेहमई हत्याकांडानंतर दोन वर्षे उलटली तरी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलीस तिला पकडू शकले नाहीत.फुलनच्या नावावर आतापर्यंत अपहरण,दरोडे अशा तब्बल ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती.शेवटी इंदिरा गांधी सरकारच्या विनंतीवरून तिने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला.  यावेळेस, फूलन आजारी होती आणि तिच्या टोळीतील बहुतेक सदस्य मरण पावले होते, काहींना पोलिसांनी मारले होते तर काहींना प्रतिस्पर्धी टोळ्यांनी मारले होते. 

फेब्रुवारी १९८३ ला,मध्य प्रदेशातील भिंड येथे मुख्यमंत्री अर्जुनसिंग आणि लाखभर लोकांच्या साक्षीने तिने महात्मा  गांधी आणि देवी दुर्गा यांच्या प्रतिमांसमोर आपली बंदूक खाली ठेवली. तशी तिची अटच होती.ती पोलिसांना शरण जाणार नव्हती.गेली नाही.लोकांनी डाकुराणी फुलन देवीचा जयजयकार केला.देशविदेशात फुलनदेवी नावाच्या डाकू राणीची चर्चा झाली.मात्र इथेच बहुतेक इतिहासाची गफलत झाली.

             फुलनदेवी डाकू राणी नव्हती,तर शहाणी राणी होती.शरणागतीवेळी ती फक्त १९ वर्षांची होती. अशिक्षित, बलात्कारित,हत्यारीन अशी ही मुलगी पोलिसांसमोर नव्हे तर अशा प्रतिकांसमोर शरणागती पत्करते,ज्यातील एक अहिंसेचा पुजारी आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखला जातो तर दुसरी दुर्जनांचा नाश करणारी मातृदेवता  मानली जाते.एखाद्या डाकूने असे माता पिता निवडावेत ही काय अनवधानाने केलेली सहज साधी कृती होती ? आणि जुलमी व्यवस्थेचे पाईक समजल्या जाणाऱ्या पोलिसांसमोर नव्हे तर " आपल्या ''लोकांच्या साक्षीने बंदूक खाली ठेवणं हे शहाणपण काय सांगून जातं ? तिच्या शहाणपणाची कमाल मर्यादा तर पुढेच आहे.फुलन देवीला पुढील अकरा वर्षे तुरुंगात काढावी लागली.

१९९३-९४मध्ये उत्तरप्रदेशच्या मुलायमसिंग यादव सरकारने तिच्यावरील खटले मागे घेतले आणि तिला तुरुंगातून मुक्त केले.आयुष्याची वीस वर्षे जुलूम,अन्याय,अत्याचार सहन करण्यात आणि त्यांचा प्रतिकार करण्यात तर पुढची अकरा वर्षे तुरुंगात काढून आलेली निषाद किंवा मल्लाह नावाच्या,लोकांना नावही माहीत नसलेल्या मागासलेल्या नावाडी जातीच्या त्या निरक्षर बाईने तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर एका झटक्यात बौद्ध धम्म स्वीकारला.इथं बुद्ध,शाहू,फुले,आंबेडकरांचं उठता बसता नाव घेणारे,त्याचा फायदा उपटणारे प्रगत- अप्रगत जात वर्ग समूहातले बुद्धिजीवी, विचारवंत,राजकारणी, प्रस्थापित स्त्री पुरुष हे आयुष्य संपत आलं तरी बुद्धाच्या वाटेला जायची हिम्मत करत नाहीत,अन ही बाई कोणाला काही कळायच्या आत ते सगळं करून मोकळी होते.आजपासून पंचवीसेक वर्षांपूर्वी ! म्हणून म्हणतो...डाकू राणी नव्हे,ती तर शहाणी राणी !बुद्धाच्या ज्ञान मार्गावर निघालेली.

         २५ जुलै २००१ रोजी दिल्ली येथील निवासस्थानी फुलनदेवीचा खून करण्यात आला. खरं तर या धरतीवर फुलनला फुलूच द्यायचं नाही असा प्रयत्न अविरत केला जात असतो.फुलन तुरुंगात आजारी असताना तिला न विचारता तिच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आली.वर या गोष्टीचं समर्थन करताना तो डॉक्टर दात विचकत म्हणाला,आता हिच्या पोटी एखादी फुलन जन्माला येण्याचा प्रश्नच उरला नाही.  त्यांची व्यवस्था फुलनदेवीला टरकून असते. फुलन डाकू राणी असते म्हणून नव्हे,तर व्यवस्थेला आव्हान देणारी शहाणी राणी असते.. 

~ Panther Yogi K

-------------------------------------


फुलनदेवी : संक्षिप्त :

१० ऑगस्ट जन्मदिन, २५ जुलै  - २५ जुलै २००१ स्मृतिदिन .३७ वर्षांचे आयुष्य. ११ वर्षे बालपणाची. ०५ वर्षे नवऱ्यापासून सुटका करून घेण्याची. ०५ वर्षे घनघोर जंगलातली. दरोडेखोर टोळीतली. ११ वर्षे तुरुंगातली. ०५ वर्षे संसद सदस्य व संसदीय राजकारणाची.

     जन्म : निषाद जातीत. नावाड्याचे जातिनिहाय कर्म. लोकांना सुरक्षित पैलतिरी नेण्याचे. पण ही जात स्वतः मात्र सामाजिक दृष्ट्या असुरक्षित.  कायम धगीत होरपळलेल्या या अल्पायुष्यात तिने जीवनसाथी व प्रियकर शोधून पाहिला ... जरी बलात्कार हीच तिला झालेली पुरुषत्वाची पहिली ओळख होती. ११व्या वर्षी आपल्याहून तिप्पट वयाच्या पुरुषाची 'धर्मपत्नी' होण्याचे प्राक्तन ज्या धर्माने तिच्यावर लादले तो धर्म अखेर तिने सोडलाच. मरताना ती बौद्ध धम्माची उपासिका ही ओळख मागे ठेवून गेली. 'कायद्याच्या' राज्याने ४८ गुन्हे तिच्या नावावर नोंदवले त्याच 'कायद्याच्या राज्यात' ती कायदेमंडळाची सदस्य म्हणून दोन वेळा निवडून गेली आणि खासदार बंगल्यातच वैऱ्यांनी तिला बेसावध टिपले. 

        सभांमधून सफाईदार हिंदीत सहजतेने ती तमाम शोषितांची कैफियत मांडी. तिच्या शब्दांत आपसूकच तिच्या जगण्याचा अंगार ओतप्रोत असे. तिचे आत्मकथन पुस्तक रुपात आले. सिनेमाच्या पडद्यावर तिची कहाणी झळकली. पण तेवढ्याने वास्तवातील फुलनदेवी पूर्णपणे उमजली असे होणार नाही.        देवी फुलन, तुझ्या डोळ्यातील ठिणगीला सलाम !

- किशोर मांदळे, पुणे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA