ठाणे- : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्याचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करुन नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी खासदार राजन विचारे, मिनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, ठाणे शहरप्रमुख रमेश वैती, ठाणे विधानसभा संघटक हेमंत पवार, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक राम रेपाळे, युवा सेना विस्तारक राहूल लोंढे, महिला आघाडीच्या स्मिता इंदुलकर, यांच्यासह ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख व ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
23 ऑगस्ट रोजी महाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर व्देषापोटी बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचा निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आज नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घटनात्मक पदाचा अवमान केल्याबद्दल त्यांना तातडीने अटक व्हावी अशी मागणी करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये संघर्ष व तणावाचे वातावरण निर्माण होवू नये तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला असल्याने आम्ही गुन्हा दाखल करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांचा मोर्चा घोषणा देत जात असतानाच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मोर्चा अडविला, यावेळी शिवसैनिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली,त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिकांनी संयमानी हा मोर्चा विसर्जित केला.
0 टिप्पण्या