ठाणे महापालिका आगरी समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे का ?

   ठाणे :  ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही आठवड्यापासून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई सुरू असून गावठाण क्षेत्रात देखील पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपूर्वी या कारवाईला विरोध करत भूमिपुत्रांना आंदोलन देखील छेडले होते, मात्र अद्याप कारवाई सुरू असल्याने भूमिपुत्रांनी सोमवारी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. ठाणे महापालिका आगरी समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे का ? असा सवाल करत अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर ती बांधकाम व्यावसायिक करत असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची तोडावीत अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.  तसेच स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर कारवाई करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अनधिकृत बांधकामे संदर्भात अनेकवेळा पालिका प्रशासनावर आरोप होत असताना डान्स बार नंतर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या. त्यानंतर अनेक प्रभागात या अधिकाऱ्यांनी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली, त्याचबरोबर शहरात असलेल्या कोळीवाडा - गावठाणात देखील बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे भूमिपुत्रांनी झोप उडाली असून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.  आता जी बांधकामे सुरू आहेत त्यावर कारवाई न करता भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.  मंडळाचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, गुलाब वझे,अर्जुन बुवा चौधरी, गंगाराम शेलार, रोहिदास मुंडे, दशरथ भगत, डॉक्टर राजेश मढवी, मोतीराम गोंधली आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA