ठाणे - निर्बंध शिथील करताना ठाण्याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घेईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं शासनाप्रमाणेच निर्बंधांमध्ये सूट दिली. मात्र यामध्ये उपहारगृह व्यावसायिकांना कोणतीच सूट मिळाली नाही. ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी यातून उपहारगृह व्यावसायिकांना सूट न देण्यात आल्यामुळं उपहारगृह व्यावसायिकांनी येत्या सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.पूर्वीप्रमाणेच उपहारगृह ५० टक्के क्षमतेनं ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. ठाणे महापालिकेनंही यामध्ये कोणताच बदल केलेला नाही. शासनाच्या निर्णयामुळे उपहारगृह व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. यामुळं आता उपहारगृह व्यावसायिकही एकत्र आले असून या निर्णयाविरूध्द मूक मोर्चा काढला जाणार होता. मात्र जमावबंदी आदेश लागू असल्यामुळं हा मोर्चा रद्द करण्यात आला. पण याबाबत सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास उपहारगृह व्यावसायिकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. राज्य शासनानं उपहारगृह व्यावसायिकांना दुपारनंतर रात्री १० किंवा रात्री १२ वाजेपर्यंत उपहारगृह सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी असा इशारा उपहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेनं दिला आहे.
0 टिप्पण्या